पहिला धडा - निसर्ग ज्ञान
#JungleVibes पहिला धडा - निसर्ग ज्ञान सांगली जिल्ह्यातील तासगाव आमचे मुळ गाव, तेथे आमचे वडलोपार्जित शेत होते. लहानपणी आम्ही दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत आमच्या शेतात जात असु, माझे काका काकी तेथेच रहात असत. फार सुंदर असे शेत होते आमचे ! त्यात मका, ज्वारी, गहू, हरभरा, ऊस इ पीके निघत शिवाय केळी, सिताफळ, रामफळ, कवठ यासारखी फळझाडे पण खुप होती. शेजारील शेतात द्राक्षाचे मळे होते. घरासमोरील जागेत वांगी, टोमॅटो, पावटा, अंबाडी, मेथी, गवारी, पोकळा इत्यादी भाजीपाला पिकत असे. तेथे आमचे एक तीनपाकी दगडी कौलारू घर होते. घराजवळच छोटेसे खळे होते आणि घरामागे बांधीव विहीर होती. विहीरवर रहाट होती. तेथे दुष्काळ पाचवीलाच पुजला असल्याने उन्हाळ्यात विहीर पुर्णपणे आटायची पण दिवाळीच्या दरम्यान हमखास टम्म भरलेली असायची. विहीरीवर बसवलेल्या पंपाचे पाणी पाटाने संपुर्ण शेतात फिरवले होते. त्या थंडगार पाण्यात पाय सोडून बसणे स्वर्गीय आनंद द्यायचे. घरावर हमखास दुधी भोपळ्याचा वेल सोडलेला असे, फार चवीष्ट लागायची त्या दुधीची भाजी. अंगणातच काही लिंबू, इडलिंबू, शेवगा, पेरू, कढीपत्त्याची झाडे हो...