जंगल, चकवा आणि वाघ

जंगल, चकवा आणि वाघ

          साधारणत साल 2006 मधील घटना असेल मी त्याकाळात दाजीपूर अभयारण्यात वरचेवर जात असे अभयारण्यातील चप्पा चप्पा फिरलोय मी.  दरवर्षी प्राणी गणना उपक्रमात सहभागी होने हा माझा नियमित कार्यक्रम असायचा.  बुद्ध पोर्णिमेला मचाणावर बसून प्राणी गणना करने म्हणजे एक पर्वणीच असायची.  अभयारण्यातील मोक्याच्या मचाणावर बसण्यासाठी मी नेहमीच विषेश प्रयत्न करत असे.  वन्यजीव विभाग मधील अनेक कर्मचारी ओळखीचे असल्याचा हा फायदा होता.
          एकदा असाच नेहमीप्रमाणे बुद्ध पोर्णिमेला वन्यजीव विभागच्या ऑफिसवर तोंडी कल्पना देऊन दाजीपूर मधील भोपळीची सरी नाव असलेल्या ठिकाणी बनवलेल्या मचाणावर प्राणी गणनेसाठी जाऊन बसलो.  दुपारी बारा वाजता मचाणावर चढलो आणि लवकरच सेट होऊन प्राण्याची चाहुल घेत बसलो. दुपारी भेकराची एक जोडी पाणी पिऊन गेली.  सायंकाळी पाच वाजता पाठीमागून खसखस आवाज येऊ लागला.  तसे कान टवकारून डोळे फाडून त्या दिशेस बघू लागलो.  आवाज वाढतच गेला तशी आमची उत्कंठा पण.  थोड्याच वेळात एक मानवी आकृति दिसू लागली आणि आमचा भ्रमनिरास झाला.  तो रामदास होता.  वन्यजीव विभागातील हर हुनर्या व्यक्ती.  मचाणाखाली येऊन म्हटला 'साहेब आलेत'  'तुम्हास बोलवलय चला'
जरा नाराजीनेच खाली उतरलो व त्याच्या सोबत चालू लागलो.  रस्त्यांवर पोहोचलो,  वनक्षेत्रपाल साहेब गाडीत बसले होते.  आम्हास बघताच आमच्यावर जाळच काढला.  पुर्व कल्पना न देता,  नोंद न करता मचाणावर बसलातच कसे? ' चला बसा गाडीत'  गुमान गाडीत बसलो, गाडीत इतरही लोक होते.  त्यांना सांबरकोंड, सावराईचा सडा, आंब्याचे पाणी  इ मचाणावर सोडून आम्ही माघारी फिरलो.  आता गाडीत फक्त आम्ही दोघे, साहेब, रामदास आणि ड्राइवर इतकेच उरलो.  सगळेच चिडीचुप होते शेवटी रामदासनेच कोंडी फोडली आणि आमच्याविषयी थोडी माहिती साहेबांना दिली.  मग मी ही हळुहळु साहेबांशी संवाद साधायला सुरवात केली.  अभयारण्याबाबत आम्हास असलेले ज्ञान बघून साहेब थोडे शांत झाले.  म्हणाले 'तुम्ही ज्या मचाणावर बसला होता तेथे मी बसणार होतो, पण आता तुम्हीच बसा'  असे बोलून आम्हास पुन्हा त्याच ठिकाणी सोडले आणि दुसऱ्या दिवशी ऑफिस वर भेटायची ताकीद देऊन निघून पण गेले.
          साहेबांनी स्वतः साठी निवडलेले भोपळीच्या सरी वरील मचाण आहेच मुळी भन्नाट.  वाघाचे पाणी या ठीकाणाहुन थोडे पुढे सांबरकोंडच्या दिशेने गेले की घनदाट अरण्यातील ही वाट(सरी) खाली पाट्याचा डंग या घनदाट अरण्यात उतरते.  बोरबेट, पदमसती येथुन येणारे वाघ, बिबळ्या, सांबर, गवे इ प्राणी हीच सरी धरून वरती दाजीपूर अभयारण्यात ये जा करत असतात.  मुख्य सरी पासून थोडे आडवाटेला बेचक्यात एक बारमाही झरा आहे.  त्याच्या पासून सुरक्षित अंतरावर प्राणी गणनेसाठी तात्पुरते मचाण बनविलेले असते.  हा झरा गव्यांसाठी योग्य नसला तरी वाघ, बिबळ्या सारख्या प्राण्यांसाठी अगदी परफेक्ट ठिकाण आहे.  ती रात्र मचाणावर जागून काढली सांबर, भेकर, साळींदर इ प्राणी आणखीन भरपूर पक्षी बघून दुसरे दिवशी संध्याकाळी ऑफिस वर पोहोचलो. 
          'संजीवन चव्हाण' वनक्षेत्रपाल अशी पाटी लावली होती त्यांनी नुकताच चार्ज घेतला होता.  अत्यंत कडक, बाणेदार, शिस्तप्रिय आणि वन्यजीव विषयी प्रचंड आत्मीयता असलेले साहेब गप्पाच्या ओघात आमचे सर आणि मित्र कधी झाले कळालच नाही.   तदनंतर जेव्हा जेव्हा दाजीपूरला गेलो तेव्हा आमचा मुक्काम सरांच्या रूम वरच असायचा.  अनेक रात्री आम्ही सरांच्या सोबत अभयारण्याबाबत चर्चा करत जागविल्या.  वर्ष कसे संपले कळलेच नाही. 
          यंदा दर दहा वर्षांनी होणारी विषेश प्राणी गणना होती.  सरांनी या साठी खास मेहनत घेतली होती.  संपूर्ण स्टाफला खास ट्रेनिंग दिले होते. 
एक दिवस मचाणावर आणि पुढील दहा दिवस पायी फिरून प्राणी गणना, अशी भरभक्कम मेजवाणी होती आम्हाला.   वेळात वेळ काढून मी आणि धनंजय जोशी (धन्या) एक दिवस आधीच गेलो होतो.  नेहमी प्रमाणे मुक्काम सरांच्या रूम वरच.  सरांनी यावेळी विषेश तयारी केली होती.  प्राणी गणनेची खास करून वाघाची नोंद महत्वपूर्ण होती.  तशी चाहूलही लागली होती   गेल्या काही महिन्यात सतीचा माळ, निदाणखण-पावनेश्वर या मार्गावर वाघाचे ठसे उमटत होते तसेच झांझूचे पाणी ते बोरबेट या पट्यात पण वाघाची चाहुल लागली होती.  सरांनी वाघांचे ठसे नीट उमटावेत म्हणून जंगलात जागोजागी पायवाटांवर मोक्याच्या जागी मऊ मातीचे पॅड बनविले होते. वाघ, बिबळ्या इ मांजर वर्गीय प्राणी जंगलातील मळलेल्या पायवाटाच वापरतात.  पायाची गादी नाजुक असल्याने शक्यतो हे प्राणी काट्याकुट्यात घुसत नाहीत. 
          संपूर्ण मोहिमेची सविस्तर माहिती घेत रात्र जागवली.  दुसऱ्या दिवशी मचाण गणनेसाठी खुप जण आले होते त्या सगळ्यांची नोंद ठेवत त्यांना निश्चित मचाणावर पोहोचवत आम्हास संध्याकाळ झाली.  मग आमची रवानगी जवळच्याच माळवाडी धरणाकाठी बांधलेल्या मचाणावर झाली.  तेथे फक्त गवेच दिसत म्हणून जरा नाराजीनेच मचाणावर रात्रभर बसलो.   गव्यांच्या एक दोन कळपा व्यतिरीक्त काहीच आले नाही पाण्यावर.  दुसरे दिवशी ऑफिसवर रिपोर्टिंग करून सर्वांचे अनुभव ऐकत बसलो.  रात्री बोलता बोलता मी सरांना सांगितले की उद्या ठक्याचा वाडा - झांझूचे पाणी, गडगड्याचा ओढा  - पाट्याचा डंग - भोपळीची सरी  - वाघाचे पाणी - हडक्याची सरी  ते ठक्याचा वाडा असा आमचा भ्रमंतीचा प्लॅन आहे.  तसे सर म्हणाले तुम्ही आत्ताच ठक्याचा वाडा येथील चौकीवर मुक्कामास जा.  उद्या पहाटे शीवगड परिसरातील जंगल फिरा.  तेथे झांझूच्या पाण्याजवळ वाघाची हालचाल असल्याचे कळाले आहे.  शिवगडच्या पायवाटेवर वाघाच्या ठस्यांसाठी मातीचे पॅड बनविले आहे,  तेथे जरा बघून मग तुमचा प्लॅन करा. मग काय जेवण करून मी आणि धन्या असे दोघांनी रात्रीच ठक्याचा वाडा गाठला.  या ठिकाणी वन्यजीव विभागाची चौकी आहे.  तेथे वन्यजीवचे गेट असते, पुढे प्रवेश फक्त दिवसा तेही तिकीट काढून.  या ठिकाणी जवळपास बाबू कोकरे या धनगराचे एक घर सोडले तर मानवी वस्तीच नाही.  त्यावेळी या चौकीत  वनविभागाचे लोक देखील मुक्काम करण्यास कुचराई करत असत.   येथील मुक्काम जंगलाचा फिल देतो.  पुर्वी सुद्धा अनेकदा तेथे मुक्काम केला असल्याने बिनधास्त होतो.   चौकी उघडून तेथेच दिली ताणून.  चौकीत फक्त आम्ही दोघेच होतो.  चौकी भोवती वीसएक गुंठे जमीन सपाट आहे.   तीला काटेरी झुडुपाचे कुंपन आहे.  खुपदा संध्याकाळी, रात्री गवे या कुंपनात उडी मारून चरायला येत असत. रात्रीत एक-दोन वेळेस उठून अंगणात टाॅर्च मारून बघितले काही दिसते का.                  दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून शिवगडकडे कुच केली.  हा परिसर गवताळ कुरणांनी भरलेला आहे.  त्यामुळे तेथे गवे, भेकर भरपूर दिसतात.  तासाभरातच जेथे मातीचे पॅड बनविले होते तेथे पोहोचलो.  सरांनी फारच मोक्याची जागा निवडली होती.  येथे एक पठार आकसत जाऊन दुसऱ्या पठारावर जायला चिंचोळी वाट शिल्लक राहते व दोन्ही बाजूस खोल दरी.  तेथेच माती पाखडून, वस्त्रगाळ करून दहा बारा फुट लांब असा मऊ मातीचा पॅड बनविला होता.  काळजीपुर्वक तो पॅड निहाळत आमचे ठसे उमटनार नाहीत याची काळजी घेत बाजूच्या झाडीस अंग घासत पुढे गेलो.  आदल्या दिवशीच संध्याकाळी वन कर्मचारींनी तो पॅड नीट स्वच्छ केला होता.  रात्रीत एक सांबर हरीण सोडून कोणीच तो पार केला नव्हत. 
          तेथून पुढे शिवगडच्या दिशेने थोडे अंतर गेलो तसा धन्या म्हणाला काल आपल पहिले ठरल्या प्रमाणे पाट्याच्या डंगातच जाऊया.  म्हणून परत फिरलो परत यायला ती एकमेव वाट होती पुन्हा मातीच्या पॅड जवळ आलो.  दुरूनच काहीशी माती विस्कटलेली दिसली जवळ गेलो आणि दोघे ताडकन उडालोच.  त्या मऊ मातीत चक्क वाघाचे पंजे उमटले होते.  चांगले सहा सात इंचाचे ते ठसे नर वाघाचे होते आणि तो वाघ झांझूच्या पाण्याकडून शिवगडच्या दिशेने आला होता.  म्हणजे स्वारी आमच्याच मागावर होती तर, दरदरून घाम फुटला दोघांना.  वाघाचे अस्तित्व आपल्या जवळपास आहे ही जाणीवच धडकी भरवणारी असते. आणि हा तर आमच्याच मागोमाग चालत होता.
          प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि शिकारी जीम काॅर्बेट आपल्या पुस्तकात लिहतो " जेव्हा जेव्हा तुम्ही वाघाच्या शोधात पायी जंगलात फिरत असता आणि तुम्ही वाघाला एकदा पाहता तत्पुर्वी वाघाने तुम्हास किमान दहादा तरी पाहिलेले असते "
पटापट जवळपास चे दगड गोळा करून त्यातील काही चांगले ठसे झाकुन ठेवले.  विचार केला पुन्हा शिवगड परिसरातील जंगलच फिरायचे.  यापुर्वी मी ताडोबा मेळघाट, नागझिरा येथे वाघ पिहिले होते.  अगदी वाघाच्या मागोमाग बराच अंतर चाललो सुद्धा होतो.  वाघास "जंटलमन ऑफ जंगल" असेही म्हटले जाते.  वाघ नैसर्गिकरित्या कधीच मानवावर हल्ला करत नाहीत.
          हा वाघ बघायचाच असा मनाचा हिय्या करून पुन्हा शिवगडची वाट धरली पण यावेळी थोडा वळसा घालून जाऊया म्हणजे आपण वाघाचा पाठलाग करतोय असे त्याला वाटू नये म्हणून डावीकडील दुसरी पायवाट धरली.  जी पुढे जाऊन माळवाडी गावात उतरत होती.  अर्धा एक तास जंगलातून चालल्या नंतर उजवीकडे घुसलो, जेणेकरून आपण थेट शिवगड जवळ पोहचू असा कयास होता.  ते पठार मोठ मोठ्या दगडांनी भरलेले होते. त्यामुळे झटपट चालने अशक्यच होते.  त्यात तेथे शिकाकाईची काटेरी झुडपे खुप होती.  संपूर्ण खडकाळ प्रदेश जागोजाग उदमांजर, साळींदर यांच्या विष्ठेने भरलेला होता.  हा परिसर नवखा असला तरी एका बाजूला माळवाडी आणि दुसऱ्या बाजूस शिवगड असल्याने बिनधास्त होतो.  पण दोन तीन तास चालून सुद्धा ना शिवगड दिसत होता ना माळवाडी.  जाऊ तेथे मोठाले खडक आणि काटेरी झुडपे, पुनःपुन्हा एकाच ठिकाणी परतून येत होतो. दाजीपूरच्या जंगलात चकवा होण्याची ही माझी दुसरी वेळ होती. अनोळखी प्रदेश वर वाघाचे सावट,  भटकून भटकून कंटाळलो, आता थोडी भिती पण वाटू लागली होती.  सुर्य डोक्यावर आला होता त्यामुळे कोणती दिशा धरायची हेच समजत नव्हत.  उन्ह आग ओकत होते पण जंगलात असल्यामुळे फार त्रासदायक नव्हत.  जवळे पाणी संपले होते थोडेफार अल्पोपहार केला होता.  आम्ही आता वाघ असलेल्या ओळखीच्या पण फसव्या जंगलात अडकलो होतो.  डोके काम करत नव्हत.  काहीएक सुचत नव्हत.  आता एकच वाट धरायची अजिबात वळायच नाही. अगदी नाकासमोर बघून चालायच,  कोठेही गेलो तरी आपण ओळखीच्या ठीकाणीच बाहेर पडू असा ठाम निश्चय करून थेट जंगलात घुसलो आणि काय आश्चर्य अगदी अर्ध्या तासात आम्ही एका मोकळ्या पठारावर आलो. समोरच शिवगड चे दर्शन झाले आनंदाने उड्या मारल्या.  
          शिवगड जवळ गेलो, आमच्या आणि शिवगड मधे फक्त एक छोटीशी दरी होती तिच्या काठाकाठाने थोडाच पुढे गेलो असेन तोच  खालून हलकेसे गुरगुरने ऐकु आले.   थोड सावध होऊन पढे चार पांच पावले टाकली असतील तोच पुन्हा गुरगुरने ऐकु आले.  आता मात्र आमची पंचाईत झाली.   ऐकमेकांना खेटून उभे होतो.  हळूहळू माघारी फिरायच ठरवल तोच आमच्या खालच्याच दरीतून वाघाची एक जोरदार डरकाळी ऐकू आली.  जागेवरच थीजलो, सर्वांगावर काटे आले, दरदरून घाम फुटला.  आता काय आपले खर नाही असे एक क्षण वाटून गेले.  वाघ महाशय आम्ही उभे होतो त्याच्या बरोब्बर खालील जंगलात होते.  पहाटे ते आमच्या मागोमाग चालत होते पण आम्ही जेव्हा माघारी फिरलो तेव्हा ते बाजूच्या झाडीत घूसून आम्हास पहात होते.  आम्ही त्याला क्राॅस करून गेल्यावर ते पुन्हा वाटेवर येऊन सरळ पुढे शिवगडच्या वाटेने खाली उतरून तेथेच आराम करत होते. 
          आम्ही त्याला दुसऱ्यांदा त्रास देत होतो.  त्यामुळे तो नाराजी व्यक्त करत होता.  मग हळूहळू दरीकडेच तोंड ठेवत उलटे पाय चालत मागे मागे आलो.  पुन्हा एक जोरदार डरकाळी ऐकु आली.   सुरक्षित अंतरावर आल्यावर झपाझप पावले टाकत  माघारी आलो.  वाटेत मातीच्या पॅड वर गव्यांच्या पायांचे खुपसे ठसे उमटले होते पण आम्ही झाकुन ठेवलेले ठसे मात्र सुरक्षित होते. आम्ही झांझूचे पाणी येथे परतलो.  तेथे थोडा अल्पोपहार करून ठरल्या प्रमाणे पाट्याच्या डंगात जायचा निर्णय घेतला.   वाटेत पेरूची बाग लागते तेथे आम्हास फाॅरेस्टचे लोक भेटले.  त्यांना वाघाच्या ठस्यांबाबत बोलून पुढे निघालो.  हा रस्ता म्हणजे एका बाजूस उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूस खोल दरी मधे सपाट भाग,  तो ही काही ठिकाणी अरूंद तर काही ठिकाणी भरपूर रूंद असा.  ही वाट येथील घनदाट जंगलातून जाते.  मधे मधे लहान लहान गवताळ कुरणे आहेत.  त्यांना स्थानीय भाषेत पळंज असे म्हटले जाते.  या गवताळ कुरणांत हमखास गव्यांचे दर्शन ठरलेले असायचे.  आम्ही अंदाज घेत घेत निघालो होतो.  वाटेत एका मोठ्या गवताळ कुरणाजवळ उंबराच्या झाडाखालून बारमाही झरा वाहतो.  त्यास उंबराचे पाणी म्हणतात.  तेथे मातीचे लांबलचक पॅड बनविले होते.  त्यावर वाघाची सलग पावले उमटली होती.  येथून पुढे पाट्याच्या डंगा पर्यंत दोन तीन लहान लहान ओढे लागतात.  शेवटी भला मोठा गडगड्याचा ओढा लागतो, तो पार केला की तुम्ही पोहोचता एकदम वेगळ्याच विश्वात.  म्हणजे अति घनदाट जंगल असलेल्या, सुर्याची किरणे देखील जमीनीवर न पोहचू शकणार्या पाट्याच्या डंगात. या जंगलातून शाहू कालीन शिकार रस्ता अगदी पदमसती पर्यंत जातो.   आता तो खुप ठिकाणी फार खराब झालाय.  फक्त काही जुणे जाणकारच या जंगलात फिरायचे धाडस करतात.  या शिकार रस्त्यांवरूनच दोन-तीन किलोमीटर गेल्यावर उजवीकडे डोंगरात एक पायवाट जाते.  तीच भोपळीची सरी. 
          उंबराच्या पाण्यापासून पुढे निघालो पहिला ओढा पार केला दुसरा ओढा जसा जवळ येईल तस तसा मांस कुजलेला वास येऊ लागला.  नाकाला फडके बांधून ओढ्यात आलो.  तर एका अवघड जागी वाघाने गव्याची शिकार केलेली होती.  अर्थातच ती खुप जुनी होती, संपूर्ण मांस खाल्ले होते.  फक्त हाडेच शिल्लक होती.  तेथून पुढे निघालो,  वाटेत जेथे जेथे मऊ माती होती तेथे तेथे वाघाच्या पावलांचे ठसे उमटलेले होते.  वातावरण एकदम गंभीर होते.  पुढच्या ओढ्यात आलो तर तेथे जमीनीवर भरपूर झटापट झाल्याच्या खुणा होत्या.  रक्त सांडले होते.  गव्याचे मोठ-मोठे शेणाचे पो पडले होते.  एका पो वर तर चक्क वाघाचा ठसा उमटला होता.  अनेक जागी वाघाची पण विष्ठा पडली होती.  मांस, गव्यांचे शेण, वाघाची विष्ठा इ मिळून एक वेगळाच वास आसमंतात भरून गेला होता.  ओढ्यातील घसटलेल्या खुणांचा माग काढत जरा आत मधे गेलो तर तेथे एका नुकताच मारलेल्या गव्याचे शव होते.  मध्यम आकाराचा मादी गवा होता, ओढा ओलांडते वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्याची शिकार केली होती.  पोटाकडील थोडेफार भाग खाल्लेला होता.  पोटातील आतड्या, जठर लांबवर न्हेवून टाकले होते.  नक्की वाघानेच ही शिकार केली होती आणि महाराज आपल्या हद्दीची गस्त घालायला शिवगडला गेले होते.
         आता वाघोबा नक्कीच पुढील काही दिवस येथे पुन्हःपुन्हा येऊन आपली भुक मिटवणार होते.  वाघ केव्हाही शिकार खाण्यासाठी परतण्याची शक्यता होती.  ज्या वाटेने आम्ही परतणार होतो त्याच वाटेने तो आमच्या समोर येऊन ऊभा ठाकू शकत होता.  म्हणून फार रिस्क न घेता, पुढे पाट्याच्या डंगात न जायचा निर्णय घेऊन माघारी फिरलो.  झपाझप पावले टाकत ठक्याचा वाडा गाठला.  तेथील वन्यजीव विभागातील लोकांना संपुर्ण कल्पना देऊन दाजीपूर गाठले.  तेथे चव्हाण सरांना घडलेला प्रकार सांगितला त्यांनी ताबडतोब ठस्यांचे प्लॅस्टर कास्ट काढायला गार्ड पाठवले.  त्यानंतर कितीतरी दिवस ते प्लॅस्टर कास्ट कोल्हापुरात बिंदु चौक येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात ठेवले होते.

फारूक म्हेतर
वन्यजीव अभ्यासक
कोल्हापूर
90 28 81 60 60

Comments

Popular posts from this blog

महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways

कारवी' एक नैसर्गिक चमत्कार

Myristica Swamp