जंगलाचे आरोग्य

जंगलाचे आरोग्य

खुप वर्षांपासून जंगलात जाण्याचा योग आला नव्हता.  जबर इच्छा होती जंगलात चालत फिरायची.  मग काय लावला फोन धनंजयला म्हटल "जंगलात जाऊया चल " तर लगेच तयार झाला म्हटला  "या सोमवारी जाऊया "
कामाच्या नादात मी विसरून गेलो पण रविवारी मॅच संपल्यावर पठ्ठ्याचा फोन "ऊद्या जायच नव्ह? " मी जरा उदासीचेच बोललो "बघू" तर म्हणतय कसा "मी आणखीन दोघांना तयार केलय जर तुम्ही कॅन्सल केल तर तुम्हाला आमच्या संपूर्ण ट्रीपचा खर्च द्यावा लागेल."  मी पैश्याला तसा मुलखाचा चिकट नाईलाजाने म्हटल "येतो उद्या"

सोमवारी सकाळीच तीघे जण दारात गाडी घेऊन हजर, मी विचारल्यावर धनंजय बोलला मुडागडला जायचय. तस मी घाबरतच म्हटल फार चालाव तर लागणार नाही ना? तसा धनंजय बोलला बसा गाडीत दोन-तीन तासाचा ट्रेक आहे, थोडीफार चढाई आहे पण जंगल मस्त आहे.
मी शुज चढवून गुमान बसलो गाडीत.  मजल दरमजल करत बाजारभोगाव मधे पोहोचलो.  तेथे 'गुडलक सोन्या' या नावाचे एक छोटेखानी हाॅटेल आहे.  गेली 25 वर्ष तेथे अल्पोपहार करतोय वडापाव, मिर्ची भजी, मिसळ, कटवडा, कांदापोहे, शिरा.  सगळेच मस्त असतय.  या सर्वांचा मनसोक्त आस्वद घेतला, तृप्तीचा ढेकर देत गाडी पुढे निघाली.

किसरूळ, मानवाड, कोलिक अशी गावे मागे टाकत आम्ही पोहोचलो पडसाळी या गावात.  पंधरा-वीस घरे असलेल पडसाळी लघु धरणाच्या पायथ्याशी असलेल हे सुंदर गाव.  पाणी मुबलक असल्याने सधन गाव.  जवळपास सगळीच घरे सिमेंट कांक्रीटची, कौलारू घर क्वचितच, ऊस शेती अगदी जंगलाला घासून.  नजर पोहोचेल तेथ पर्यंत फक्त ऊसच ऊस, भात शेती मोजकीच, नाचणी, वरी च्या जागी आता ओन्ली ऊस.

पडसाळी गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे गाव तेथून पश्चिमेला जवळच कोकण कडा लागतो.  खालचे कोंकणातील गाव काजिर्डा एक पायवाट पडसाळी ते काजिर्डा जाते.  त्याचे रूपांतरण लवकरच घाट रस्त्यात होणार आहे.  प्रत्येक तालुक्यातून किमान दोन घाट खाली कोंकणात उतरवायचेच असा घाटच घातलाय सरकारने.  जंगलाची  X - X एक करत सगळ्याना फास्टात गोव्याला पोहोचायचे आहे.  पडसाळी गावा पर्यंत रस्ता अगदी गुळगुळीत तयार आहे, मात्र पुढे जंगल खाते असल्याने अजून घाट रस्ता झाला नाहीए.

रस्ता जेथे संपतो तेथेच गाडी लावली आणि पायवाटेला लागलो.  थोड्याच वेळात छान नदी आडवी आली, स्वच्छ थंडगार पाणी होते, बुट भिजू नयेत म्हणून काढले आणि नदी ओलांडून पुढे गेलो.  लगेचच दाट जंगलातील वाट लागली.  वाटेत दोन-तीन लहान लहान ओढे लागले.  दुसऱ्या ओढ्यानंतर चढ सुरू झाला.  आता उनही वर आले होते.  थंडीचा मागसूस देखील नव्हता.  जवळपास अर्धा तास चढच होता.  छातीचा भाता फुलत होता, असे वाटत होते काळीज आता छाती फोडून बाहेर येणार!!! 
मनातल्या मनात स्वतःलाच शिव्या दिल्या कुठुन जंगलात जायची अवदसा सुचली आणि इथ आलो कुणास ठाऊक?
या अर्ध्या तासाच्या चढाईत पंधरा वेळा तरी जमीनीवरच बसकन मारली असेन.  पाणी तर गटगटा पित होतो.

असाच एकदा हाफत बसलो असता वर जंगलातून माणसांच्या बोलण्याचा आवाज आला.  थोड्याच वेळात एक जण वाटेवर आला म्हटला "मुडागडला काय" म्हटल "व्हय" तर विचारला कोणत गाव म्हटल "कोल्हापूर" तो आमच्याकडे बघून हसला आणि आम्हास पार करून खाली गेला.  तेच्या मागोमाग चार जण आले पैकी एकाने जोरदार घोषणा दिली "जय भवाणी " आमच्या छात्या चढून चढून फुटायच्या घाईला आलत्या. " कुठ चाललाय, कोणते गाव" इ विचारून झाल्यानंतर मी विचारले तुम्ही कुठले तर म्हणाला "पुणे" लगेच दुसरा बोलला "जपून जा जाम जंगल आहे, भरपूर वाटा आहेत चुकाल, वाटाड्या का घेतला नाही?" आम्ही बोललो आम्हास माहित आहे तर तिसरा बोलला "इतक्या उशिराने का आलाय, आम्ही तर काल रात्रीतच गावात मुक्कामाला आलोय, आमचे पाच किल्ले झालेत फिरून, हा सहावा " इ इ " वर जंगलात बिल्कुल पाणी नाही पाणी आणलय का? असा आम्हास दम भरवून, पानशेतचे पाणी पाजून, होते नव्हते ते सगळे ज्ञान पेलून ते आले तसे निघून गेले. 

मी धन्याला म्हटल "बघ बाबा, वरती अजिबात पाणी न्हाई"  तसा मानेला झटका देऊन धन्या बोलला "कुणाच ऐकायलाय, चला उठा आता,  अजून अर्धी वाट पण सरली नाहीए, अस बसत बसत चालला तर झालाच आपला ट्रेक "
सगळा जीव पायात आणत दात ओठ खात चालायला सुरवात केली.  थोडेफार चाललो असेन तोच एका बाकदार वळणावर धन्या मळलेली वाट सोडून दुसऱ्या वाटेस लागला म्हटला "चला ही गव्यांची वाट हाय पाण्यावरच जाणार" बघता बघता आम्ही एका स्वच्छ थंडगार पाणी असलेल्या झर्यावर पोहोचलो.  पोटभर पाणी प्यायलो सगळ्या बाटल्या भरून घेतल्या आणि परत फिरलो व मुख्य वाटेला लागलो. 

आता चढ कमी झाला होता पण जंगल घनदाट होते त्यामुळे ऊन्हाचा अजिबात त्रास होत नव्हता.  थोड्याच वेळात बर्‍यापैकी सपाट प्रदेश लागला.  येथे अधून-मधून दाट जंगलातून एकदम मोकळ्या मैदानात येत होतो.  तेथे एक उग्र वासाची वनस्पती भरपूर वाढली होती.  जीवन बोलला "ही बघा कारवी, आमच्या राधानगरीत पण लय हाय"  तसा धन्या ओरडलाच  "अरे कारवी?  ही वनस्पती तर फार दुर्मिळ होत चालली आहे आणखीन महत्वाचे म्हणजे ही गवा या प्राण्याची मुख्य खाद्य वनस्पती आहे"  मी म्हटल "अरे मग आपण नशीबवान आहोत की, इतकी दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण वनस्पती आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळते आहे आणि तेही इतक्या विपुल प्रमाणावर!!!"
तोच अक्षय बोलला "सर याच वर्षी एक गव्यांविषयी पोस्टर प्रदर्शित झालय कोल्हापुरात, यात या गव्यांच्या मुख्य खाद्य वनस्पतीचे संवर्धन व्हावे असा खास उल्लेख करण्यात आलाय" 

मला तर आभाळ ठेंगणे वाटू लागले कधी एकदा कोल्हापुरात परत जातो आणि या आमच्या शोधा बद्दल सगळ्यांना सागतो असे झाले होते.  पण हा फुगा धन्याने पुढच्याच क्षणात फोडला म्हटला "फारूक कदाचित पुढच्याच वर्षी या वनस्पतींना एकदम फुलोरा येईल आणि ही वनस्पतीच मरून जाईल, सप्टेंबरमहिन्यात फुले येतील जानेवारी पर्यंत बिया तयार होतील मग पावसाळ्यात पुन्हा नवीन रोपे येतील, दर सात-आठ वर्षात ही वनस्पती फुलावर येते आणि मरून जाते " मी म्हटल "मला तर आता या वनस्पतीची काळजीच वाटायला लागलीय, चुकुन माकुन जर बिया तयारच झाल्या नाहीत तर? नवीन रोपेच तयार नाही झाली तर? अश्या एक ना अनेक शंका कुशंका येऊ लागल्या, आता गव्यांचे कसे होणार? त्यांना खायला काय मिळणार? वगैरे वगैरे.

पुढे मुडागड पर्यंत असे अनेक मोठ मोठे मोकळे कारवीचे प्रदेश लागले. मी सर्वत्र नतमस्तक होत होतो.  एक दोन ठिकाणी मात्र या कारवीच्या प्रदेशात गवताने अतिक्रमण केल्याचे दिसत होते.  या गवताच्या नावाने दात-ओठ खात, रागा रागाने गवताचा उद्धार करत पुढे जात होतो.

तब्बल तीन तासांच्या पायपीटी नंतर मुडागड वर एकदाचा पोहचलो.  तेथे बसून मस्त जेवलो.  तासभर तेथेच सुस्ताऊन माघारी फिरलो.  पुन्हा तीच कारवीची मैदाने निरखत, गदगद होत परत निघालो.
खुप वर्षांनी जंगलात पायपीट केल्यामुळे माझ्या सगळ्या चेतना चाळवल्या होत्या.  कोकटून चालल्या मुळे सारखी 'बा' आठवत होता.  एका कारवीच्या मैदानात थोडा वेळ बसकन मारली.  पाण्याची एक बाॅटल संपली होती तर दुसरी अर्धी होती. आता लवकरच पोहोचणार असल्याने खळखळून चुळ भरली.  त्या अनाहुत पाण्याच्या शिडकाव्याने आसमंतात मधुर सुवास भारून गेला.  तेथील थोडी लाल भड़क माती हाताला चोळ चोळ चोळली.  उरलेल्या पाण्याने हात धुतले.  हळद धुतल्यानंतर जसे हात पिवळसर होतात तसे हात लालसर झाले होते.

डोंगर उतरताना पाय लटपटत होते.  अंगात अजिबात त्राण शिल्लक नव्हते.  रखडत, खरडत, घासत उसाच्या शेतात परतलो, जरा हायसे वाटले.एव्हाना अंधार पडला होता. 

तसा मी फक्त वाचस्पति, रोड साईड बाॅटॅनिस्ट, रोडसाईड फुलपाखरू, वन्यजीव इ इ तज्ञ.  कधी फारसे जंगलात चालत फिरून माहित नाही. जे काही फिरलो ते गाडीत बसूनच.  मोक्याच्या ठिकाणी जायच आणि आपल इप्सित साध्य करून घ्यायच, यातच सगळ आयुष्य घालवल.  जंगल झपाट्याने कमी होतय या पेक्षा रस्ता रूंदीकरणात वृक्षांवर गदा येतेय याचच दुखः मला जास्त. त्या वृक्षांचे पुनर्रोपण करायचेच हाच माझा हट्ट.  'होऊ दे खर्च सरकार हाय मोठं' हीच माझी धारणा.
रस्त्यांवरून फिरताना नेहमीच वनविभागने रूंदीकरणा करिता तोडलेली, बेणलेली कारवी बघत आलोय.  त्यामुळे कारवी बद्दल अतीव दुःख व्हायचे.  गव्यांचे मुख्य खाद्य असलेली ही वनस्पती वनविभागच सपासप कशी तोडते याचे खुप आश्चर्य आणि खेद वाटायचे. पण आज जीवन, धनंजय मुळे जंगलातील ही विलुप्तप्राय असलेली वनस्पती मुबलक प्रमाणात बघून उर भरून आले.  तरीही भविष्यात या वनस्पतीवर कोणतेही संकट येऊ नये यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. त्यासाठी काहीही करायची माझी तयारी आहे.

जंगल सोडून आता आम्ही कच्या रस्त्यावर आलो होतो, अंधार दाटून आला होता.  ऊसाच्या शेतांमधून हा रस्ता जात होता.  शेताला तारेचे कुंपण होते.  त्यातून चटचट असा आवाज येत होता.  जीवन बोलला या तारेला झटका मशीन जोडले आहे.  जनावराने स्पर्श करताच त्याला करंटचा जोरदार झटका बसतो पण ते मरत नाही.  आमच्या राधानगरीत अनेकांनी शेतांमधून असे झटका मशीन बसवलेले आहे.

इतक्यात समोरून एक वयोवृद्ध ग्रहस्थ पाच-सहा धष्टपुष्ट म्हशी घेऊन आले.  त्याना मी विचारले "मामा कंच गाव? 'हे काय पल्याडच पडसाळी' इति मामा.
मामा हे झटका करंट म्हशींनी ऊसात जाऊ नये म्हणून लावलय का ?
नाही रे बाबा ते जंगली जनावरांसाठी लावलय.
कोण कोणती जनावर हाईत जंगलात?
"गव, डुक्कर मोप हैत. लय नुसकान करत्यात बघ शेतीच"
हे झटका मशीन लावून पण घुसतात का जनावरे आत?
"तर वो! हे बघा!" असे म्हणून मामांनी शेजारील शेतात टाॅर्च मारली "बघा' पार सुपडा साफ केलाय ऊसाचा' हजार किलोच जनावर ते! सहा-सात फुट उंच उडी मारून आत घुसतय आण पार वाट लावतय शेतीची!"
मामा पण जंगलात तर ती कारवी म्हणतायात ती वनस्पती तर मोप हाय की गव्यांना खायला! आणि लोक म्हणत्यात गवा लय आवडीने खातोय कारवी!.
"मुडदा बशिवला त्या कारवीचा! रानाची पार वाट लावून टाकलिया बघा त्या कारवीने!"
मी आश्चर्य चकित होऊन मामांच ऐकत होतो, हे काहीतरी विपरीतच होत.

मामांना बोललो जरा सविस्तर बोलुया का? तस मामा खुलले. त्यांच्या म्हशी आमच्याकडे डोळे वटारून बघत होत्या. मामांनी त्यांना घराकडे ताणल म्हटले "जात्यात आपूनच गुमान"
मग काय रस्त्यांवरच फतकल मारून बसलो आणि  मामांच्या वर प्रश्नांची बरसात केली.
मामा हा घाट रस्त्या हुणार का?
"तर वो हुणार म्हणजे हुणारच!"
मग तटलय कश्यात?
"ते फारेस्ट खात हाय नव्ह! तेन खोड घातलय पर आता हुईल लवकरच."
"तुम्ही जाताय का खाली कोंकणात?"
"तर वो आमची भावकी हाय तिकडं, सणावाराच जाणं येणं हुतय की!"
मामा गवे कस काय येतात जंगलात एवढ त्यांच खाद्य आहे जंगलात तर?
तस मामा उसासा टाकत म्हणाले "हे बघा हे पडसाळी धरण हुण्या अदुगर हीथ पावसाळ्यानंतर पाणी फार कमी असायच. त्यामुळ फक्त पावसाळी भात, नाचणी आणि वरी एवढच पिकवायचो आम्ही. त्या काळात घरटी ईस-पंचवीस गाई गुरं हुती, एखादीच म्हस असायची, ती बी लहान चणीची. पावसाळ्यात गुरं पिकात तोंड घालू नये म्हणून आम्ही त्यास्नी वर डोंगरात चरायला घेऊन जायचो. समद्या गावाची जवळपास दीड-दोनशे गुर चरायला जायची. तेवढीच कोलिक गावची गुर पण यायची चरायला."
मी म्हटल एवढी जनावरे चरायची मग पुरायच का त्यास्नी चारा वर्षभर?
मामा "तुम्ही मुडागडला जाऊन आलाय ना? वाटेत जिथ जिथ कारवीच रान माजलय तिथ तिथ पुर्वी गवताच्या मळ्या होत्या. काही तर खुपच मोठ्या पट्ट्या होत्या. आमची गुर तिथच चरायची. आमच्या हातात कायम पारळी असतेच या मळ्या बेणायच काम सतत चालूच असायच"
"मामा तवा मग गवे नव्हते का रानात? धन्याने विचारले
"हुते तर! कधीमधी गुरांच्यात येऊन पण चरायचे, सांबर, भेडकी पण लय हुते"
तवा गवे शेतात यायचे नाहीत का आमची शंका
"आमची शेती फक्त पावसाळ्यातच तवा समदीकडच हिरवगार खायला असायच, गवं शेतात कुठच यायला आमचीच गुरढोर जंगलात जायाची चराय" - मामा
आणि वर्षभर?
पावसाळ्या नंतर एकडाव सुगी झाली की आमची रानं रिकामीच की, त्या रानातनी थंडीत गवातपाणी उगवायच मग आमची गुरढोरं जंगलात कशापाई न्यायची ती इथच चरायची, दिवसभर आमची जनावर आणि सांच्याला, रात्रभर जंगली जनावरं अस समद बेस चालल हुत बघा
मग बिघडल कुठ?
मामा " धराण झाल तस मायंदाळ पाणी झाल, फक्त पावसाळ्यातच व्हाणारा आमचा व्हाळ वर्षभर वाहू लागला, भात शेतात ऊस लावण सुरू झाली, ज्या डोंगरात नाचणी-वरी पिकायची ते डोंगर बुलडोजर लावून सपाट केले तिथ बी ऊसच लावला, पार फारेस्ट खात्याच्या जंगला पोतुर ऊस लावला
मग पावसाळ्यानंतर गुरांच काय? आमची शंका
मामा  "ऊसामुळ पैका आला, हळुहळु कोलारू घरं जाऊन तिथं कांक्रीटची घर झाली, शेणान सावरणारी जिमिनीवर फरश्या बसल्या,  पार अंगण, पडवीत पण फरश्या लावल्या समद्यांनी, गाई आम्ही शेणापायी पाळायचो, पंधरा-ईस गाई असून शेरभर दुधाला म्हाग हुतो आम्ही, पर शौक हुता जनावरांचा,
गुरढोर ऊसात तोंड घालत्यात म्हणून लोकांनी त्यांना इकून टाकल, गावात दुध संघ आला तस त्यांनी दुधाळ म्हशी दिल्या कर्जान, या म्हशींना दावणीलाच चारा पाणी द्याय लागतय, पशुखाद्य, पेंड, दवापाणी सगळ जागेवरच, जंगलात चढूच शकत नाहीत या म्हशी, फकस्त दिवसात दोनदा पाणी दावायला सोडतोय बघा, आत्ता बी त्यास्नी पाणी दावायच आल्तो"

पर जंगली जनावरांच काय? मी मुद्द्याला हात घातला
मामा "गाई गुर कमी झाली तस आमच जंगलात जाण पण कमी झाल, जंगलातील वाटा मुजत गेल्या गेल्या पंधरा-ईस वर्षात, कारवीला दोन-तीनदा काटा आला दरम्यान "
काटा!?! आम्ही विचारले.
मामा उत्तरले "फुलांवर आली ना ती,  पुर्वी कारवी फकस्त वर डोंगर उतारावर हुती, पर काटा आल्यावर तेच्या बिया गवताच्या मळ्यांत रूजल्या की फास्टात, आयत तयार रानच मिळाल कारवीला मग काय बेभान वाढली की ती समदीकडच"
"मामा पण कारवी गव्याच मुख्य खाद्य आहे अस आम्ही ऐकलय, खरय का हे?"
"कोण भ्हणीचा म्हणतोय तसा? कारवीला पानच नसत्यात उन्हाळात, पावसाळ्यात कारवीवा कवळा फुटला की गवं खात्यात थोडीफार कारवीची पाने आन कवळा शेंडा', पर एकदा का तिची पानं निबार झाली की तोंड बी लावत न्हाईत जनावरं तीला"
"आताश्या आम्ही तर जातच न्हाय जंगलात पर गेल्या पंधरा-ईस वर्षात तीनदा काटा आला कारवीला आन गवताच्या मळ्या पार बुजवून टाकल्या की राव या कारवीनं !!"
अस हाय व्हय धन्या बोलला मग आता गवं जंगलात काही खायला नाही म्हणून येतात तर शेतात!!!
मामा "तर काय गवं इतक धीट झाल्यात बाबानो राखणीला, डब्यांच्या आवाजाला, हाकार्यांना आजाबात घाबरत न्हाईत
" बर झाल ते झटका मशीन आलाय न्हायतर आमचा जनम समदा मचाणीवर राखणीतच गेला असता"
म्हणजे! काय? मामा आमचा प्रश्न
"पुर्वी वर डोंगरात गवं असायचे, रोज सांच्याला चरताना दिसायचे, कधीच आमच्या शेतात नुसकान करायच न्हाईत, आमच जंगलात फिरनं पार बंद झाल, त्यात फारेस्ट खात्यान चराई बंदी आणली मग कशापाई जातोय जंगलात, पर जसा ऊस जंगलाला घासून लावला तस ते शिरल बघा रानात ऊस खायला, गव्यास्नी चरायला ना जंगलात चारा राहिलाय ना जंगला शेजारी चारा राहिलाय, जनावरच ते हिरवीगार आन् ग्वाड ऊस सोडत्यात व्हय!"
मग पावसाळ्यात काय ? आमचा प्रश्न
मामा  " आता कसला पावसुळा आण कसच काय, वरीसभर गवं हाईती शेतात, भाताच तरवं दिखूल सोडत न्हाईत" दिसभर जंगलात लपून बसत्यात रातीच रानात उतरत्यात पीकपाण्याला "
'म्हणजे जंगल नुसतेच नावाला आहे तर' आमचा सवाल
मामा "तसचच समजा बाबानो, नुस्तीच उंच उंच झाड म्हणजे जंगल न्हव त्यात गवात पण पाहिजेल, पाणी बी पाहिजेल, झुडपी रान बी पायजेल तरच जंगली जनावरं शेतात येणार न्हाईती "

तळटीप:- अशीच परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्व जंगलाची आहे. असच चालू राहिल तर जंगलात फक्त झाडे आणि गवे, बिबळे, कोल्हे, रानडुक्कर इ प्राणी शेतात अशी परीस्थिती उद्भवेल! ☺️

तात्पर्य: जंगलांचे स्वास्थ्य बिघडत आहे, हिरव्यागार जंगलाच्या शिरा आकसत आहेत, धमन्या चोक होत आहेत, फुफुसे गुदमरत आहेत आणि काळीज फॅटी होत चाललय!!!

लेखक
अर्थातच
पुस्तकीय कीड़ा 'फारूक म्हेतर '










Comments

Popular posts from this blog

महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways

कारवी' एक नैसर्गिक चमत्कार

Myristica Swamp