गजराज

Guess what I'm holding 🤔🤪

गेल्या आठवड्यात श्रुती, नागालैंड गर्ल अचानक घरी भेटायला आली. अनेक विषयांतर चर्चा करना करता अचानक प्रवीण कडे वानोशी फाॅरेस्ट होम स्टे ला जायचच असा हट्ट केली.  म्हटल 'जाऊ या' तस ती  2018 पासून पाठी लागली होती.  वानोशी फुल्ल बुकिंग असल्यामुळे शनिवार-रविवार ऐवजी रविवार -सोमवार ठरले.  तेथे  कॅमेरा ट्रॅप लावायचे असल्याने अमितला सोबत घेतले.

रविवारी पहाटे सहा वाजताच कोल्हापूर सोडले. चंदगडला मस्त पैकी नाष्टा करून पारगड फाट्याला पक्षितज्ञ अजित पाटलांना भेटलो.  थोडेफार पक्षी विषयक चर्चा करून तिलारी गाठले.  तेथे लष्कर पाइंटला साइट सिईंग करून घाट उतरलो.  घाट संपल्यावर सपाट पण वळणावळणाचा रस्ता लागला. 

साधारणत दहा वाजले होते, एका ओढ्याच्या पुलावर थांबलो होतो तेथे प्रवीण सातोसकर हा दोडमार्ग मधील सर्वोत्कृष्ट पक्षी निरिक्षक भेटला.  चर्चा करत असताना तो बोलला या ओढ्यांत थोडे पुढे चालत गेलात की तेथे एका वडाच्या झाडाला फळे लागलीत, खुप प्रकारचे पक्षी आलेत ते खायला.  मग काय घुसलो त्या ओढ्यात!!!  मी, श्रुती, तिची बहीण श्रीया, अमित आणि तिचे आई-बाबा. शंभर एक मीटर वर ओढ्या काठी ते भले मोठे झाड दिसले. खुप सारे पक्षी होते त्यावर, ग्रे हेडेड बुलबुल, फ्लेम थ्रोटेड बुलबुल, बारबेट, फ्लायकॅचरस्,  फ्लाॅवर पेकरस् अक्षरशः तुटुन पडत होते त्या फळांवर.  खाली जमिनीवर त्याच वडाची एक खुप मोठ्ठी फांदी तुटून खाली पडली होती. अगदी ताजी घटना असावी ती कारण त्या फांदी वरील सर्व पाने अजून टवटवीत होती.

ओढ्यात नाना तर्हेची फुलपाखरे भिरभिरत होती.  या ठिकाणी मी खुपदा आलो असल्याने मला त्याची पुर्ण माहिती होती, म्हणून मी ओढ्यात पुढे आत घुसायचा निर्णय घेतला. आई-बाबांना गाडी जवळ थांबायला सांगून माघारी पाठविले.  मग आम्ही चौघे पुढे निघालो.  आत आत फुलपाखरे तसेच पक्षी बघत चाललो होतो.  मुख्य आकर्षण होते 'मलाबार ट्रोगन' या पक्षाचे.  मागील काही ट्रीपस् मधे मी तेथे हा पक्षी पाहिला होता   तसेच नुकताच याचा विणीचा हंगाम झाला असल्याने संपूर्ण फॅमिली दर्शन व्हायची शक्यता होती. 

ओढ्यात भरपुर उलथा पालथ झालेली दिसत होती.  अनेक ठिकाणी जमीन उखडलेली होती.  मनात एक शंका वारंवार येत होती.  मी श्रुतीला तशी कल्पना दिली, तशी ती जरा टेन्स् झाली. तरी पण मनाचा हिय्या करून पुढे निघालो.
ओढ्याच्या दोन्ही बाजूस उंचच उंच अजस्र झाडे, वेली, झुडपे इ इ मुळे घनदाट वन तयार झाले होते.  नाना तर्हेचे पक्षी चिवचिवाट करत होते.  हे सगळेच दिग्मुढ होऊन बघत निहाळत आमचे कुर्म गतीने मार्गक्रमण होत होते. पाण्यातील मासे, वाॅटर बिटल्स, वाॅटर स्कीटर्स, फुलपाखरे, पक्षी, वनस्पती निरिक्षण करत आम्ही चाललो होतो.  जस जसे पुढे जात होतो तस तसे वातावरण गुढ आणि गंभीर होत होते.

साधारणतः 500-700 मीटर गेलो असेन तोच मला ओढ्यात मधोमध मेहंदी कलरचे नारळा पेक्षा मोठे तोफगोळे पडलेले दिसले आणि माझी शंका खरी ठरली.  खाली वाकून त्यातला एक गोळा उचलून घेतला.  अगदी ताजातरीन होता.  तर ते होते गजराजचे शेणगोळे.  आज सकाळीच स्वारी येथून गेली असणार.  ते बघून अंगावर सरकन काटाच आला, मी ताबडतोब श्रुतीला जवळ बोलावून ते दाखविले.  तशी ती पण धास्तावली, भिती स्पष्ट जाणवत होती तिच्या चेहर्यांवर.
अमित आणि श्रीया खुप मागे फोटोसेशन करत येत होते.
माहोल असे झाले होते की अचानक सगळीकडेची झाडे हलताहेत असे वाटू लागले.  चौफेर घनदाट जंगल आणि त्यातून जाणारा भल्या मोठ्या दगडांनी भरलेला हा ओढा, त्यात आम्ही चौघेच, चार पावलेही धड पळू शकणार नाही अशी परिस्थिती.  तात्काळ माघारी फिरायच ठरल म्हणजे दुसरा पर्यायच नव्हता आमच्यासमोर!!!

शक्य तितक्या लवकर दगडा धोंड्यात, पाण्यात धडपडत त्या फांदी पडलेल्या वडाच्या झाडाखाली पोहोचलो.  जरा हायस वाटल.  मुख्य रस्ता आता जवळपासच होता.  मी त्या वडाचे निरिक्षण करू लागलो.  विना पारंबीचा हा वड वेगळ्याच प्रजातीचा होता.  संपूर्ण झाड लहान लहान वाटाण्या एवढ्या आकाराच्या फळांनी लगडलेले होते.  हिरवीगार पालवी नुकतीच फुटली होती.  मग खाली पडलेली फांदी निरखत फिरलो.  ती जोर लावून हत्तीने मुख्य झाडापासून तोडली होती.  पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हत्तीने एकही पान खाल्ले नव्हते.  अधिक निरिक्षण करता आश्चर्याचा दुसरा धक्का बसला त्या फांद्यावर एकही फळ शिल्लक नव्हते.  गजराज महाराजांनी अगदी नजाकतीने वडाची इवली इवली फळे वेचून वेचून खाल्ली होती.  ते ही नाजूक पानांना, फांद्यांना थोडाही धक्का न पोहचवता!!! मला कलेक्शनसाठी काही फळे हवी होती पण एकही फळ मिळाले नाही.  आहे का नाही आश्चर्यकारक? मी जे घडले असेल त्याचा घटनाक्रम समजावून सांगत होतो, अमित आणि श्रीया ते स्तंभित होऊन ऐकत होते.

लगेचच मुख्य रस्त्यांवर आलो. तोच समोर श्रुतीचे वडील चिंताग्रस्त होत गाडीजवळ ऐरझार्या घालत होते.  आम्ही पोहोचताच म्हणाले 'चला लवकर येथुन, मघाशी एक ग्रामस्थ येथे आला होता, तो म्हणाला येथे बिल्कुल थांबू नका गणेश नावाचा तस्कर हत्ती येथेच फिरतोय गेले काही दिवस आणखीन तो खुप अग्रेसिव आहे  मनुष्याला बघताच अंगावर चाल करून येतो'.  एका दमात त्यांनी सगळेच सांगितल.  अमित आणि श्रीयाला आत्ता परिस्थितीच गांभीर्य जाणवल होत.  ते विस्मयचकित झाले होते.
श्रुतीने तिच्या जवळील सॅनिटायझर दिले त्याने हात स्वच्छ केले कारण जंगलात कोणत्याही वन्यजीवांची विष्ठा ग्लोव्हज् न घालता हाताळायची नसते हा एक नियम पाळायचा असतो.  परंतु मी तसे केले नव्हत त्यामुळे सारखी एकप्रकारची अस्वच्छतेची भावना होत होती.

नंतर शक्य तितक्या लवकर गाडीत बसून आम्ही वानोशी फाॅरेस्ट होम स्टेच्या दिशेस प्रयाण केले.

फारूक म्हेतर
वन्यजीव अभ्यासक
कोल्हापूर

Comments

Popular posts from this blog

महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways

कारवी' एक नैसर्गिक चमत्कार

Myristica Swamp