महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways
महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways
अग्निपथ या फिल्म मधील व्हीलन डॅनी हिरो बच्चनला मारायचा आटोकाट प्रयत्न करतो पण बच्चन तो हाणून पाडतो. मग डॅनी बच्चनला घरी वाटाघाटी साठी बोलावतो. त्यावेळी त्याचे चमचे आश्चर्यचकित होऊन डॅनीला याचे कारण विचारतात. तेव्हा डॅनी एक बढिया आणि फेमस डायलॉग मारतो.
"जब दुश्मन की उम्र बढ जाए तो उससे दोस्ती कर लेनी चाहिए, अपनी उम्र बढ जाती है। "
यालाच मराठीत शब्द आहेत 'यशस्वी माघार '
हिंदीत 'सर सलामत तो पगडी पचास'
अगदी शब्दशः नाही तरी बर्याच प्रमाणात आजकालच्या घडामोडींना हा डायलॉग लागू पडतोय.
आज विकास त्याच्या परम सीमेवर आहे. तो अंधाधुंद ओसंडून वाहतोय. मोठमोठ्या फैक्ट्री, रिफायनरीज, खाणकाम, महामार्ग इ. इ.
आपला आजचा विषय आहे 'रस्ता' (महामार्ग)
चौपदरी, सहापदरी, अष्टपदरी असे महाकाय रस्ते अक्राळ विक्राळ पणे सगळीकडेच चौफेर बनत चाललेत. गरज असो वा नसो, लोकांची मागणी असो वा नसो, दोन-दोन पर्यायी मार्ग असून देखील धडाधड नवे महामार्ग मंजूर होताहेत आणि ते मार्गीही लागताहेत. यात घरे, दुकाने, व्यवसाय, शेती, जंगल इ इ वर सरळसरळ हातोडा पडत आहे. पर्यावरण, वन्यजीव, मानवाधिकार इ इ सर्व कायद्यांना अगदी उन्मादाने अश्व लावून धाब्यावर बसवले जात आहे.
या रस्त्यांना गावोगावी विरोध होतो. मग उड्डानपुल, बायपास सारखे मार्ग काढून पुढे चाल दिली जाते. घर, दुकान, शेती इ इ ला सरकार तर्फे दुप्पट, चौपट भरपाई दिली जातेय. साम दाम दंड भेद सर्व वापरून सगळ्यांना सरळ केले जात आहे.
परंतू वनजमीनीचे काय? तर जितकी वन जमीन अधिग्रहण केली जाते तितकीच जमीन इतरत्र कोठेही वनविभागाला दिली जाते व फाॅरेस्ट क्लियरेंस घेतला जातो. परंतू त्या जमीनीत असलेल्या झाडाडझुडपांचे, वन्यजीवांचे कोणत्याही प्रकारचे मुल्य मापन योग्यरित्या होत नाही किंबहुना वन्यजीवांना तर गृहितच धरले जात नाही!
रस्ते चौपदरी होतात, गुळगुळीत होतात आणि त्यावरून वाहने सुसाट धावतात. मग वन्यजीव जीव मुठीत घेऊन हा रस्ता ओलांडून जायचा प्रयास करतात. यात कित्येक जीव हकनाक बळी पडतात. वाघा सारखे संवेदनशील प्राणी तर तो प्रदेशच सोडून जातात.
हे रस्ते बनल्यानंतर जो पर्यंत वन जमीनीत जंगल शिल्लक आहे व रस्ता चालू आहे तो पर्यंत वन्यजीवांचे हत्याकांड हे होतच राहणार. विषेशतः पावसाळ्यात तर साप, बेडुक, खेकडे, किटक इ इ च्या रक्ता मांसाचा चिखलच झालेला असतो. वन हद्दीतील रस्त्यांवरील हे फार भयानक वास्तव आहे.
अनेक पर्यावरणप्रेमी नेहमीच या वन हद्दीतील रस्त्यांना अभ्यास पुर्ण विरोध करत आले आहेत. यापुर्वी देखील विरोध करत आले आहेत आणि विरोध करत राहतील. परंतू यापुर्वी अनेकदा काही पर्यावरणप्रेमींनी घेतलेल्या आडमुठेपणामुळे, हेकेखोरपणामुळे, सर्वच पर्यावरणप्रेमींची 'विकास विरोधक', 'सर्वत्र खो घालणारे' अशी प्रतिमा तयार झालीय वा जाणीवपुर्वक बनविण्यात आली आहे. याला कारणीभुत स्वतः काही चमकोगिरी करणारे पर्यावरणप्रेमीच आहेत.
अनेकदा रस्ता रूंदीकरण आवश्यक असते त्यावेळी वृक्षांचा बळी हा ठरलेलाच असतो. रस्त्यांवरील वृक्ष तोडल्या नंतर नवीन रोपे लावून त्यांची योग्य जोपासना करने ही रस्ता महामंडल व कंत्राटदार यांची जबाबदारी असते. यावेळी काही पर्यावरणप्रेमी अनेकानेक अडथळे निर्माण करतात. रस्ता रूंदीकरण करायचेच नाही, एकही वृक्ष तोडायचा नाही, सर्वच्या सर्व वृक्ष पुनर्रोपण केलेच पाहिजेत, हा वृक्ष हेरिटेज दर्जाचा आहे, तो वृक्ष ऐतिहासिक आहे इ इ नाना प्रकारे प्रकल्पाची अडवणूक करतात.
यातील काही अति दुर्मीळ वृक्षांच्या पुनर्रोपण साठी जरूर आग्रह धरला पाहिजे. परंतु हे होताना दिसत नाही. सरसकट सर्व वृक्ष वाचलेच पाहिजेत अशी ताठर भुमिका घेतली जाते.
एखादा रस्ता रूंदीकरणात वृक्षांवर गदा येत असेल तर मोठ्याप्रमाणात पर्यायी वृक्षारोपण हा एक सरळ मार्ग असतो आणि त्याची अंमलबजावणी योग्यरित्या करून घेने, देशी व स्थानीय वृक्ष लागवड करून घेने हे योग्य असते. पण हेकेखोर पर्यावरणप्रेमी सरसकट सर्वच झाडांचे पुनर्रोपण झाले पाहिजेल असा अवाजवी हट्ट धरतात वा रस्त्यालाच तीव्र विरोध करतात. अश्या अवाजवी मागण्यांना मग स्थानिक लोकांचाही पाठींबा मिळत नाही.
मग सरकार, प्रशासन यांच्या प्रस्तावांना सरळसरळ केराची टोपली दाखवून रस्ता रूंदीकरण करून घेते. ते ही फार कमी, निरूपयोगी आणि विदेशी वृक्षांचे एकसुरी वृक्षारोपण करून! यात नेहमीप्रमाणे पर्यावरणप्रेमींच्या तोंडाला पाने पुसली जातात. यातील बहुतांश छोटी छोटी रोपे असतात त्यांची देखभालही नीट होत नाही मग लवकरच बहुतांश रोपे मरून जातात. मग आपली अवस्था "तेलही गेले तुपही गेले, हाथी राहिले धुपाटणे" अशी होते.
अश्यावेळी हळहळ व्यक्त करण्या पलीकडे काहीच करता येत नाही आणि हे सगळे घडल्यानंतर चमको पर्यावरणप्रेमी अचानक असे गायब होतात जसे 'गधे के सर से सिंग'.
आताशा सरकारचा पर्यावरणाबाबत लापरवाही, बेदरकारपणा फारच वाढत चालला आहे. त्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. प्रशासन सुद्धा अश्या प्रकल्पांसाठी फार आग्रही झाले आहे. लाखों-लाख करोडों रूपयांचे कंत्राट निघत आहेत. पाण्यासारखा पैसा ओतला जातोय या रस्त्यांवर व त्याच्या निर्माणावर. म्हणजेच डॅनीच्या डायलॉग नुसार दुश्मन की उम्र बढ रही है. तर अश्या वेळी पर्यावरणप्रेमींनी सरकार, प्रशासन बरोबर योग्य वाटाघाटींचा मार्ग अवलंबिला पाहिजे. पर्याय दिले पाहिजेत.
कोणीही कीतीही विरोध केला तरी रस्ते हे होणारच. त्यामुळे तकलादू, हट्टी, वास्तवाशी फारकत घेणारा, नाकाम विरोध करून अपयश पदरात पाडून घेण्यापेक्षा सरकारशी, प्रशासनाशी तडजोड करून सरसकट सर्व रस्त्यांना विरोध न करता योग्य पर्यायावर सरकारला आणावे लागेल.
जेथे जेथे रस्ते वन हद्दीतून जातात वा घनदाट वनातून जातात. तेथे खास करून घाटातील रस्ते हे पूर्णपणे मुंबईत जसे अखंड फ्लाईओवर बनविले आहेत तसे बनविले पाहिजेत. यासाठी आग्रह धरला पाहिजेल. सरसकट सर्वच रस्त्यांना विरोध करून चालणार नाही, तर त्यासाठी योग्य पर्याय द्यायला हवा.
अखंड फ्लाईओवर हा पर्याय थोडा जास्त खर्चीक आहे परंतू त्याचे फायदे अनगिनत आहेत.
• यामुळे वन्यजीवांची रस्त्यांवर होणारी हत्या जवळपास नगण्य असेल.
• वन्यजीवांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागणार नाही.
• वन्यजीवांचे काॅरीडाॅर (भ्रमणमार्ग) अखंडित राहतील आणि ते मानवी वस्तीत शिरणार नाहीत.
• वाघ, गवे, सांबर तसेच हत्ती सारखे प्राणी देखील या फ्लाईओवर खालूनच आरामात ये जा करतील.
• पावसाळ्यात साप, बेडूक, किटक, खेकडे इ इ जी हत्याकांड होतात ती जवळपास बंदच होतील.
• फ्लाईओवर मुळे जे जुन्या रस्त्यांवर जे पाण्याचे स्रोत अडवून पुल बांधले आहेत ते मोकळे होऊन पाणी विना अडथळा वाहू लागेल. त्यामुळे पाण्यातील मासे, जलचर इ चे आपोआपच संवर्धन होईल.
• फ्लाईओवर सरळसोट असल्यामुळे जंगलात घुसून होणारी चोरटी शिकार, लाकुडतोड इ गोष्टी बर्याच अंशी कमी होतील.
• घाटातील वळने कमी होऊन घाटांची लाबी कमी होईल पर्यायाने वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होईल.
• दरडी कोसळून जे घाट रस्ते दर वर्षी बंद पडतात ते घडणार नाही.
या फ्लाईओवर साठी अधिकचा खर्च हा मुद्दा पुढे केला जाईल परंतू सद्याच्या सरकारी महत्वकांक्षी योजनांसमोर पैसा हा प्रश्न गौण आहे,, नगण्य आहे. उलट पक्षी कंत्राटदार अधिकचे काम मिळाले म्हणून खुश होतील.
आपण लोकांच्या सोईसाठी अगदी समुद्रावर कित्येक किलोमीटर लांबीचे पुल बांधतोय, कित्येक किलोमीटर लांबीचे बोगदे खणतोय मग या पृथ्वीच्या फुफुसांसाठी इतकेसे करू शकत नाही?
प्रस्तावित रस्त्यांमुळे भविष्यकाळात वन, वन्यजीव, पर्यावरण, निसर्ग यांचे आतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे पुढील पिढीला निश्चितच पश्चाताप होईल. त्यापेक्षा आज खर्चीक बाजूचा विचार न करता वन हद्दीत जर फ्लाईओवर बनविले तर आपण स्वतःला खुप चांगले पर्यावरण प्रेमी शाबित करू शकतो आणि त्याचे मानसिक समाधान पण नक्कीच मिळेल .
कोल्हापूर जिल्ह्यातून कोंकणात जायला आंबा घाट, अनुस्कुरा घाट, भुईबावडा घाट, गगनबावडा घाट, फोंडा घाट, आंबोली घाट, तिलारी घाट असे 7 घाट रस्ते सद्या संपुर्ण पणे डांबरीकरण करून तयार आहेत, वापरात आहेत. तर कुंभवडे-खडपडे घाट आणि पारगड घाट हे दोन घाट कच्चे रस्ते तयार आहेत. वन हद्दीतून जात असलेने फाॅरेस्ट क्लियरेंसच्या प्रतिक्षेत आहेत. लवकरच ती मिळेल.
या 9 घाटां व्यतिरीक्त शिवडावचा घाड, काजिर्डा घाट तयार होणार आहेत.
म्हणजेच फक्त कोल्हापूर जिल्ह्यातूनच कोंकणात जायला जवळपास 11 घाट रस्ते आहेत. अजूनही काही घाट विचाराधीन आहेत.
हे सर्व घाट फार सुंदर अश्या घनदाट सदाहरित आणि नीम सदाहरित जंगलातून जातात. यापैकी पहिल्या सात घाटात नेहमीच अनेक वन्यजीव अपघातात मरतात, जखमी होतात. पावसाळ्यात तर तेथे फारच वाईट अवस्था असते.
तसेच ही हत्याकांडे या रस्त्यांवर होतच राहणार आहेत.
जे दोन घाट कुंभवडे-खडपडे घाट आणि पारगड घाट अजून कच्चे रस्तेच आहेत व वनविभागच्या परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत तेथे शक्य तिथे आणखीन जास्तीत जास्त लांबीचे फ्लाईओवर बनविले पाहिजेत. तसा प्रस्ताव वनविभागाने मंजूर करावा. इतर घाटांसारखी परवानगी अजिबात देऊ नये.
भविष्यात जे जे घाट रूंदीकरणात प्रस्तावित आहेत तेथेही फ्लाईओवर हाच पर्याय अवलंबित आणावा. त्याशिवाय रूंदीकरणास वनविभागाने परवानगीच देऊ नये.
या दोन्ही घाटात प्रवाश्यांना अधेकदा वाघाचे दर्शन झाले आहे. अस्वल, रानकुत्री, गवे, सांबर इ अनेक प्राण्यांचा वावर येथे भरपूर आहे.
तसेच या पूर्ण झालेल्या घाट रस्त्यातून आडवे जाणारे जे नाले, ओढे आहेत त्यावर जे पुल बांधले आहेत, बहुतांश ठिकाणी तेथे नळे घालण्यात आले आहेत. ही पद्धत जरी कंत्राटदाराच्या फायद्याची असली तरी जलचर वन्यजीवांसाठी फार चुकीची आहे. ये नळे नाले, ओढे यांच्या तळापासून खुप उंचावर घातलेले असतात आणखीन पावसाळ्यात त्यातून पाणी खुप वेगात वहात असते. जे लहान लहान मासे, खेकडे, बेडूक मासे यांना पार करने अशक्यच असते. त्यामुळे हे जलचर त्यांच्या प्रजनन स्थळा पर्यंत पोहचुच शकत नाहीत. परिणामस्वरूप यांची संख्या दिवसेंदिवस खुप कमी होत आहे. काही प्रजातींचे मासे तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
म्हणूनच वन हद्दीतील नाले, ओढे इ वर पुल बांधताना या ठिकाणी नळे अजिबात घालू नयेत, जुन्या पद्धतीचेच (आर्क) कमान पद्धतीचेच पुल बाधावेत. तशी तरतूद वनविभागाने त्यांच्या मंजूरी प्रस्तावात करावी.
सद्या काही घाट रस्त्यांचे रूंदीकरण व नुतनीकरण चालू आहे तेथे ज्या ज्या ठिकाणी ओढे, नाले इ वर चुकीच्या पद्धतीने नळे घालून पुल बनविण्यात आले आहेत तेथे तेथे शक्य असेल तरआर्क पद्धतीचेच पुल बांधावेत वा योग्य पद्धतीने मोठ्ठे नळे घालूनच पुल बांधण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी पर्यावरण संस्था, निसर्गमित्र, अभ्यासक, वनविभाग यांनी पुढाकार घ्यायला हवा.
उत्तर-कर्नाटक, गोवा आणि तिलारी या परिसरात वाघांचे प्रजनन होतय आणि हे वाघ उत्तरेकडे राधानगरी वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यंत येत असल्याचे अभ्यासातुन सिद्ध झाले आहे. अस्वल, रानकुत्रे, बिबटे देखील असेच स्थलांतर करतात असे आढळून आले आहे. त्यांच्या या स्थलांतरणास हे घाट रस्ते खुप मोठा अडथळा ठरले आहेत. वेळीच योग्य उपाय योजना नाही केली तर हे स्थलांतर बंद होईल. हा आपल्या जैवविविधतेला आणि सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पाला धोका आहे.
वनविभाग, सामाजिक बांधकाम विभाग व महामार्ग महामंडल व संबंधित सर्व विभागांनी वेळीच या समस्येकडे लक्ष्य घालून योग्य ती तरतूद करावी. तसेच सर्व पर्यावरण प्रेमी, निसर्ग प्रेमींनी यासाठी आग्रह धरावा. अनावश्यक रस्त्यांना ठामपणे विरोध करावा. लोक प्रतिनिधिंनी सुद्धा यात विषेश लक्ष्य घालावे.
जर यात आपण नाकाम राहिलो तर निसर्गाची पर्यायाने आपली उम्र नक्कीच कमी होईल !!!!
ही सर्वांना नम्र विनंती.
आपला विनीत
फारूक म्हेतर
वन्यजीव अभ्यासक कोल्हापूर
90 28 81 60 60
PC - Kaka Bhise & Internet.
Comments
Post a Comment