पहिला धडा - निसर्ग ज्ञान

#JungleVibes

पहिला धडा  - निसर्ग ज्ञान

सांगली जिल्ह्यातील तासगाव आमचे मुळ गाव, तेथे आमचे वडलोपार्जित शेत होते. लहानपणी आम्ही दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत आमच्या शेतात जात असु, माझे काका काकी तेथेच रहात असत.
फार सुंदर असे शेत होते आमचे !  त्यात मका, ज्वारी, गहू, हरभरा, ऊस इ पीके निघत शिवाय केळी, सिताफळ, रामफळ, कवठ यासारखी फळझाडे पण खुप होती. शेजारील शेतात द्राक्षाचे मळे होते. घरासमोरील जागेत वांगी, टोमॅटो, पावटा, अंबाडी, मेथी, गवारी, पोकळा इत्यादी भाजीपाला पिकत असे.
तेथे आमचे एक तीनपाकी दगडी कौलारू घर होते.  घराजवळच छोटेसे खळे होते आणि घरामागे बांधीव विहीर होती. विहीरवर रहाट होती.  तेथे दुष्काळ पाचवीलाच पुजला असल्याने उन्हाळ्यात विहीर पुर्णपणे आटायची पण दिवाळीच्या दरम्यान हमखास टम्म भरलेली असायची. विहीरीवर बसवलेल्या पंपाचे पाणी पाटाने संपुर्ण शेतात फिरवले होते.  त्या थंडगार पाण्यात पाय सोडून बसणे स्वर्गीय आनंद द्यायचे.
घरावर हमखास दुधी भोपळ्याचा वेल सोडलेला असे, फार चवीष्ट लागायची त्या दुधीची भाजी. अंगणातच काही लिंबू, इडलिंबू, शेवगा, पेरू, कढीपत्त्याची झाडे होती.
शेतातील बांधावर नारळ, बाभुळ, विलायती चिंच, आंबा, चिंच, कडुलिंब इ वृक्ष होते.  काही बोरीच्या व बाभळीच्या जाळ्या होत्या.  अश्या या परिपूर्ण शेतात जायला मी एका पायावर तयार असे.
मी साधारणत आठवीत असेन, आम्ही सर्व भावंडे दिवाळीच्या सुट्टीत तासगावच्या आमच्या शेतांवर रहायला गेलो होतो.  दिवसभर आम्ही शेतात हुदड्या मारत फिरत असु.  सकाळ सकाळी विहीरीत मस्त पोहणे, शेतातून हरभर्याची भाजी काढून आणने, बांधावरून पातळीची पाने, घोळची भाजी शोधून खुडून आणणे, पेरू, सिताफळे, रामफळ काढणे ही कामे दिवसभर करत असू.
काकांनी दोन शेळ्या पाळलेल्या होत्या, त्यांना प्रत्येकी दोन गोंडस पिल्ली होती.  एक खच्ची केलला बोकड पण होता. सकाळी आणि संध्याकाळी त्यांना चरायला सोडणे, त्यांच्यामागे फिरने, पिकांत तोड घालू नये म्हणून बांधाबांधानेच त्याना फिरवने मोठे जिकीरीचे काम असायचे. पिल्लांच्या करामती तर दीलखेचक असायच्या. चहा हा शेळीच्याच दुधाचा बनायचा. स्वयंपाकघरात चुल होती, चुलीवरील टमटमीत फुगलेली खरपूस भाजलेली भाकरी, झुणका, वांग्याच भरीत, उसळ, मटकी बरोबर खाण्यात जे सुख असायचे ते फाईव्ह स्टार हाॅटेल मधील पंचपक्वानांना पण नाही.
काकीने हौस म्हणून काही कोंबड्या पाळलेल्या होत्या. कोंबडा भल्या पहाटे बांग देऊन आम्हास उठवायचा.  एखादी कोंबडी खुडुक बसलेली असायची जी कोणीही जवळ गेल की कुरकुर करायची तर दुसरी अंड्यावर बसलेली असायची ती अंड्याच्या रक्षणार्थ फार दक्ष असायची, अंगावर धावून यायची. एका कोंबडीने रवण उबवलेली होती.  ती दहा बारा पिल्लांसोबत अंगणातच दाणे टीपत असायची.  तेथे मुंगुस पण यायचे.  मुंगुसाच्या तावडीत पिल्ली सापडू नयेत म्हणून आमची तेथे ड्युटी लावलेली असायची. तरीही एखाद चुकार पिल्लू आजूबाजूस गेल की मुंगुस, घारी चटका करायचे मग काका काकींचा ओरडा ठरलेला असायचा.  दररोज सकाळी खुराड्यातून कोंबड्या बाहेर काढणे आणि रात्री पुन्हा खुराड्यात कोंबणे मजेदार काम असायचे.  रात्री खळ्या जवळच मस्त शेकोटी पेटवून त्यात मक्याची कणसे भाजने, हुरडा भाजणे, हरभरा भाजून खाने असले अविस्मरणीय प्रकार चालायचे.  
काकांनी पाळलेले मांजरी पट्टीची शिकारी होती, दिवसभर दुधभात खाऊन आळसावलेले मांजर रात्री फार अॅक्टीव्ह व्हायचे.  अंगणातल्या दिव्याला आकर्षित होऊन आलेले भले मोठे नाकतोडे, शेणकिडे पटापट उड्या मारून पकडून खात असे.  कधीकधी सापाचे पिल्लू, पक्षी, बेडुक पण पकडायचे.
मला मात्र तेथील पक्षी, फुलपाखरे, किडे इ मधे खुप इंटरेस्ट असे.  त्यामुळे मी संपूर्ण शेतभर बांधा-बांधावरून फिरत असे.
तेथे मोरांची संख्या खुप होती.  संध्याकाळ झाली की मोर उंच झाडांवर बसून केकारव करायचे.  फार फार सुंदर दिसायचे ते दृश्य !  मी अगदी अंधार पडे पर्यंत हे दृश्य पाहात बसायचो.
माझी ही आवड काकांना माहित होती. त्यांना पण माझ्या या वेगळ्या छंदाचे कौतुक असायचे.
एकदा सकाळी लवकर मला काका म्हटले 'फारूक चल तुला एक गंम्मत दाखवतो " मी एका पायावर तयार!  मला घेऊन काका शेताच्या एका टोकावर गेले, तेथे एक बोराची जाळी होती.  काकांनी हळूच बोरीच्या काही फांद्या बाजूला केल्या आणि मला म्हटले बघ. मी टाचा उंचावून आत बघितले तर काय तेथे तीन-चार काड्या एकमेकांत गुंतवून त्यावर जेमतेम बसवलेली तीन इवलीशी अंडी होती.  काका बोलले ही होला या पक्ष्याची अंडी आहेत.  मी खुप उत्साहित झालो होतो पण काकांनी मला तेथे फार वेळ थांबू दिले नाही.
दुपारी मी हळूच कोणालाच न सांगता त्या बोरीकडे गेलो.  जवळपास पोहोचणार इतक्यात फडफड आवाज करत होला पक्षी तेथून उडाला आणि जवळच असलेल्या झाडावर जाऊन बसला.  मी फांद्या बाजूला करून अंडी निरीक्षण केले व परतलो.
तदनंतर सकाळ-दुपार-संध्याकाळ माझा हाच उपक्रम चालू होता.  प्रत्येक वेळेस त्यातून होला बाहेर उडायचा आणि जवळ्याच झाडावर जाऊन बसायचा.  मग मी लांबवर जाऊन शेतातच बसत असे.  जवळपास तास दीड तासा नंतर होला हळूच परत येऊन बोरीत शिरत असे.  मग मी फिरत फिरत घरी परत यायचो. 
काका बोलले होते की त्यांनी अंडी पाच दिवसांपुर्वीच पाहिलीत.  अंड्यातुन पिल्ली कधी बाहेर येतील, ती कशी असतील इ नाना तरेच्या आशा मी लावून बसलो होतो.  तीन एक दिवस झाले असतील माझे नियमित घरटे निरीक्षण चालू होते.
एकदा असाच घरटे बघायला गेलो फडफड करत त्यातून होला बाहेर उडाला.  मी अंडी बघितली आणि माघारी फिरलो.  दहा बारा पाऊले चाललो असेल इतक्यात मला मागे पक्षी उडण्याचा आवाज आला.  इतक्यात होला कसा परतला म्हणून झटकन मागे वळून पाहतो तर काय एक कावळा बोरीच्या झुडपावर बसला होता आणि त्याने पटापट एकेका घासात तीनही अंडी मटकावली.  मी कोणतीही प्रतिक्रिया करण्यापुर्वी त्याने आपला कारभार उरकला होता.  माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले उदास होऊन घरी आलो.  काकांना रडवेल्या तोंडाने सगळ सांगितल.  ते म्हणाले कावळ्यासारखे जीव फार चिकित्सक असतात.  तु रोज तेथे जाऊन काय करतोय या चिकित्से पोटी कावळ्याने डाव साधला.
माझ्यासाठी हा फार मोठ्ठा धडा होता नंतर आयुष्यात खुपदा जंगलात, निसर्गात गेलो. भरपूर अभयारण्ये, राखीव वने फिरलो. कित्येकदा फिरता फिरता अचानक पक्ष्यांची घरटी दिसायची, झुडुपातुन पक्षी फडफडत उडायचे मी समजून जायचो की तेथे त्याचे घरटे आहे.  माझ्यासोबत अनेकदा शिबिरार्थीं, मित्र असायचे पण चुकुनही मी कधी त्या घरट्यांकडे ढुंकुणही पाहीले नाही वा कोणाला घरटे दाखवले देखील नाही.
पक्ष्यांना आणि त्यांच्या अंडी व पिल्लांना सर्वात जास्त धोका हा घरट्यातच असतो. पक्ष्यांच्या घरट्यांना मानवी हस्तक्षेपामुळे फार मोठा फटका बसतो हे आता सिद्ध झाले आहे.  म्हणूनच जगभर सगळीकडेच नेस्ट फोटोग्राफरी निषिद्ध मानली जाते. वापरात असलेले घरटे, पिल्ली, पिल्लांना अन्न भरवतानाचे फोटो जागतिक स्तरीय मॅगझिन्स मधे छापण्यात येत नाहीत. फोटोग्राफी स्पर्धेत सुद्धा असले फोटो स्विकारले जात नाहीत बक्षिस तर दुरच !
घरट्यांच्या, पिल्लांसोबतच्या फोटो काढण्यामुळे घरट्यावर परभक्षींची नजर पडते.  कावळा, भारद्वाज, गरूड, मुंगुस, मांजर, वानर, माकड, घोरपड यांसारखे परभक्षी जीव फार चिकित्सक असतात.  अनेकदा लोक नेस्ट फोटोग्राफी करून परत जातात पण काही स्थानीय लोक हे हेरून पिल्लांना नुकसान पोहोचवतात.  त्यांची हत्या करतात वा तस्करी पण होऊ शकते.  गावातील टारगट मुले लक्ष ठेऊन मज्जा म्हणून पण घरटी उध्वस्त करतात.

खुप वर्षांपूर्वी एका जंगलात स्थानीय वाटाड्या बरोबर फिरत होतो.  एके ठीकाणी तो थांबला आणि म्हटला येथे थोडे आडवाटेने आत गेलो की एका गरूडाचे घरटे आहे बघायचे काय?  मी विचारले आता तेथे अंडी/पिल्ली काय असतील?  तर बोलला आता मोकळेच असणार, सिझन संपलाय म्हटल चला जाऊया !  वाटाड्या आम्हास घेऊन आत मधे गेला.  उंचच उंच झाडे असलेला अदभुत परीसर होता तो !  थोड्याच वेळात आम्ही एका भल्या मोठ्या वृक्षाखाली पोहोचलो.  वाटाड्याने खालूनच आम्हास त्या वृक्षावरील भली मोठी डोली दाखवली, खाली जमिनींवर काही पीसे, रानजायफळाची अर्धवट खालूनच फळे पडलेली होती.  ते ग्रेट हाॅर्नबिल(महा धनेश) चे घरटे होते.
अनेक ठिकाणी हाॅर्नबिलला गरूड म्हणतात.
तदनंतर त्या जंगलात खुपदा जाणे झाले पण त्या झाडाकडे अजिबात फिरकलो नाही.  काही वर्षांनंतर तो वाटाडा मला भेटला, विचारपुस झाल्यानंतर मी त्याला गरूडाच्या घरट्या बद्दल विचारल तर काहीसा उदास होऊन म्हटला 'आता काय सांगायच सर तुम्हाला !  तुमच्या सारख्या आणखीन दोघांना मी ते घरटे दाखवले आणि चुक झाली सर !
त्या लोकांनी निसर्ग सहलीच न्यायला सुरवात केली की ओ तेथे !!!
ईस-पंचवीस लोक चक्क त्याच झाडाखाली बसून डब्बे खाऊ लागले नुस्ता धडाका लावला ट्रीप्सचा !
गरूड घाबरून घरटच सोडुन गेले बघा !   आता दो वरीस झाल, घरट रिकामच हाय !
मन विषन्न झाल ऐकुन ! फार खोदून खोदून विचारल्यावर वाटाड्याने त्यांची नावे सांगितली.  ऐकून धक्काच बसला,
अजूनही ते लोक स्वतःला निसर्गपुत्र, निसर्ग संशोधक, निसर्गमित्र म्हणूवून फिरताहेत समाजात !
सर्व निसर्ग फोटोग्राफर्सना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी संशोधना व्यतिरीक्त नेस्ट फोटोग्राफी बिल्कुल करू नये. घरट्यांपासून सुरक्षित अंतर राखावे.
थोड्याफार लाईक्ससाठी, काॅमेंट्ससाठी निकाॅन गीयर, कॅनन गीयर, हॅन्ड हेल्ड इ इ विशेषण लावून आपले नेस्ट फोटोसेशन सोशल मीडियावर तर अजिबात शेअर करू नका !  प्लीज !!! 😔

फारूक म्हेतर
कोल्हापूर 

Comments

Popular posts from this blog

महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways

कारवी' एक नैसर्गिक चमत्कार

Myristica Swamp