तुला नं मला, घाल कुत्र्याला ...

तुला नं मला, घाल कुत्र्याला ...

दरवर्षी परतीचा पाऊस सुरू झाला की निसर्गाचा करिश्मा बघायला सहकुटुंब एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जायच, मनमुराद भटकायच असा आमचा कार्यक्रम ठरलेलाच असतो.   यंदा आंबोलीत जायच ठरवल.  कारणही तसेच होते. या वर्षी माझा खास वन्यजीव मित्र काका भिसेने पार्टनरशिप मधे एक रिसोर्ट चालू केलय.  खुप आग्रहपूर्वक बोलवत होता. म्हणायचा 'फारूक एकदा येऊन बघच, तुला नक्कीच आवडेल'.  तसा काका मला नेहमीच वेगवेगळी निसर्गरम्य ठिकाणे सुचवत असतो आणि ती खरोखरच फार सुंदर, गर्दी गोंगाट पासून दूर असतात.  हे तर त्याचे स्वतःचे ठिकाण.
दोन रात्र तीन दिवस असा प्लॅन ठरला.  ठरल्या प्रमाणे सकाळी लवकर कोल्हापूर सोडले. नेहमीचा निपानी, गडहिग्लज हा मार्ग न धरता गारगोटी मार्गे निघालो.  जाता जाता नितवडे दोनवडे येथील धबधबे बघायचे व पुढे आंबोलीत संध्याकाळ पर्यंत पोहोचायचे असा काहीसा प्लॅन होता. सर्वात आधी सवतकडा धबधब्याला जायच म्हणून तेथे पोहोचलो तर सगळे सुनसान होते, तेथे कोणीच नव्हते.  गाडी पार्क करून धबधब्याला खाली उतरून गेलो.  थोडीफार फोटोसेशन केले तोच मागून वनग्राम समितीचे लोक ओरडत आले. 'अहो धबधबा अपघात झाल्यामुळे बंद आहे' झाल पुढचे धबधबे पहायच रद्द !
सगळ्यांचा मुड खराब झाला.  गुमान गाडी परतून आंबोली कडे निघालो.  भरपूर वेळ असल्याने थांबत थांबत, फोटोसेशन करत, जंगल बघत आंबोलीत पोहोचलो.  तेथे दुपारचे जेवण करून नांगरतासवाडी धबधबा, महादेवगड पाहून संध्याकाळी रेसाॅर्ट वर पोहोचलो.  रेसाॅर्टचे अप्रतिम लोकेशन, प्रशस्त रूमस्, रस्टीक अॅम्बियन्स, साफ-सफाई बघून मंडळी खुश झाली.
"मंडळी खुश तर आपुन खुश"
काका वाडीस गेला होता (इथ वाडी म्हणजे सावंतवाडी, कोल्हापुरात वाडी म्हणजे नरसोबाची वाडी).  तो रात्री परत आता तोच सरळ रिसॉर्ट वर.  कडकडून गळाभेट झाल्यानंतर आमच्या लांबलचक वाइल्डलाइफच्या गप्पा सुरू झाल्या.  आमच हे नेहमीचेच असल्याने घरचे रूम मधे आराम करत पडले होते. रात्रीचे जेवण हलके फुलकेच केले.
दुसरे दिवशी सकाळी आंबोलीचा जगप्रसिद्ध धबधबा, चौकुळ रोडसाईड जंगल बघून दुपारी दिपक हाॅटेल मधे मस्त सुरमई फ्राय वर ताव मारला.  दोन दिवस खुप धावपळ चालली होती म्हणून संपुर्ण संध्याकाळ कावळेसाद पाॅइन्ट वर निवांत घालवायची असे ठरवल आणि लगेचच निघालो.
साधारणतः 4 वाजले असतील, हळूहळू गाडी चालवत, आंबोलीचे सौंदर्य बघत, भात शेती पहात निघालो.  मुख्य रस्त्यांवरून कावळेसाद पाॅइन्टला जायला वळलो.  दोन्ही बाजूस हिरवीगार भात शेती फारच मनमोहक दिसत होती.  त्यावर सुर्याची किरणे तिरपी पडत असल्याने एक वेगळीच चमक दिसत होती.
थोड्याच अंतरावर नदी वर एक लांबलचक पुल लागला.  नदीला पाणी तसे भरपूरच होते. पुलाजवळ गाडी थोडी स्लो करायला सांगितली,
इतक्यात एक करूण किंकाळी ऐकू आली.  आवाज खाली पाण्याजवळून येत होता.  एका मागोमाग एक किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या तसे पटापट गाडीतून सगळे खाली उतरलो आणि आवाजाच्या दिशेने रोखून पाहू लागलो.
एवढ्यात आम्हास पाण्यात दोन सांबर पोहताना दिसले.  ते एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जात होते.  त्यांच्या मागून एक कुत्रा पण पोहत आला.  दोन्ही सांबर समोरील किनाऱ्यावर पोहोचणार ऐवढ्यात त्या किनाऱ्यावर एक व्यक्ति हाकर्या घालत असलेला दिसला.  त्यामुळे दोन्ही सांबरे माघारी फिरली.  ही संधी साधून एका कुत्र्याने पिल्लाला गाठले, तसे ते करूण किचाळू लागले.  या सगळ्या गोंगाटात मादी सांबर पिल्लास सोडून पोहत लांब जाऊन जंगलात पसार झाले. सांबराचे पिल्लू ओरडत नदीच्या किनाऱ्यावर जाऊ लागले तोच तिकडून आणखी एक कुत्रा प्रकट झाला.  दोन्ही कुत्री मिळून पिल्लाला पाण्यात बुडवायचा प्रयत्न करीत होती.  तर पिल्लू जीवाच्या आकांताने ओरडत त्यांच्या तावडीतून सुटायचा प्रयास करत होते.
मी मुलांना सांगितल तुम्ही पटकन नदीच्या कडेकडेने जा आणि कुत्र्यांना हुसकवा.  मी त्वरीत काका भिसेला जो सद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वाइल्डलाइफ वाॅर्डन आहे, फोन लावून प्रसंगाची कल्पना दिली.  तो ही लगेच आलोच बोलला.
मी पुलावर उभा राहून परिस्थितीचा अंदाज घेऊ लागलो. कुत्र्यांनी आता सांबराच्या पिल्लाला नदीच्या डावीकडील तीराजवळ न्हेले होते. तेथे केवड्याची दाट झाडी होती. इतक्यात उजव्या तीरावरील व्यक्ति झपाझप चालत पुलावर आली.  त्याच्या एका हातात काठी तर दुसऱ्या हातात खुरपे होते.  मी त्याला हटकले म्हटल 'मामा बरं झाल तुम्ही कुत्र्यांना हाकलल, चला लवकर आता आपण पिल्लाला वाचवूया'  माझ्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करून मामा लगबगीत डाव्या किनाऱ्यावर जाऊ लागले. दरम्यान एक चारचाकी गाडी येऊन पुलावर थांबली, सर्वजण खाली उतरले. पाठोपाठ एका टू व्हीलर वरून दोन युवक आले गाडी पुलावर लावून ते दोन युवक तीरासारखे नदीच्या डाव्या तीराकडे झेपावले तर एक महिला आमच्याकडे येऊन सुफियाशी बोलू लागली. 

मी पुलावर उभारून परिस्थितीचा अंदाज घेत होतो तोच माझा धाकटा चिरंजीव धापा टाकत आला म्हटला 'आब्बा! चला लवकर सांबराच्या पिल्लाला लोकांनी बाहेर काढलय, त्याला पकडून ठेवलय, पण ते लोक काहीतरी वेगळ्याच नादात आहेत'.
मी पुन्हा काका भिसेला फोन लावतच आत घुसलो.  सगळीकडेच दलदल होती. उसाचे क्षेत्र होते पण उसतोड झाल्यानंतर तेथे पुन्हा लागवड केलेली नव्हती.  उसाची खोंबरे चुकवत नदी काठाकाठाने चाललो होतो.  थोडेफार गेल्यावर पाहिले तर काय दोन युवकांनी सांबराला बाहेर काढून पकडून धरले होते.  मी पळतच जवळ गेलो, मोबाइल वर काकाला सर्व सांगत होतो.  पिल्ला जवळ पोहचताच माझा थोरला चिरंजीव महंमदअली बोलला हे सर्वजण सांबराला मारायचा प्लॅन करताहेत.  त्याने त्यांना सांगितले की वनविभागाला फोन केला आहे.  तसे ते स्थानिक लोक म्हणाले आम्हास आता याचा काय उपयोग? असे पुटपुटत एक मामा तेथून  दूर जाऊन उभारला.
मी जवळ गेलो सांबर जमिनीवर पडले होते. जोरजोरात धापा टाकत होते.  त्याच्या डोळ्यात अपार करूणा दिसत होती. एका युवकाने सांबराचे मागील पाय धरले होते तर दुसरा मानेवर पाय देऊन उभा होता.  पैल तीरावरून आलेले मामा हातात खुरपे धरून अॅक्शन मोड मधे होते.  जवळच एक कुत्रे घुटमळत होते.  मिनी पीटबुल सारखे त्याचे तोंड होते, दुसरे कुत्रे जरा लांबवर उभे होते.
मी त्याना बोललो 'तुम्ही हे काय करायलाय मी वाइल्डलाइफ वार्डनला बोलवलय, ते येतीलच येवढ्यात, थांबवा हे सगळे!  तरीही ते मला काहीच उत्तर देत नव्हते.  आमचे संभाषण चालू असतानाच काका भिसे आंबोलीतील दोन तीन मित्रांसोबत तेथे पोहोचला.  त्यांना लांबूनच पाहून त्या दोन्ही तरूणांनी 'आता आम्हाला याचा काय फायदा' असे बोलून सांबराला सोडून दिले.  त्या बरोबर ते पिल्लू झटकन उभारले आणि पळायच्या नादात एकदम माझ्या अंगावर आले.  मी त्यास पकडायचा प्रयास केला पण हे सर्व इतक्या अचानक घडले की ते पिल्लू निसटून ऊसाच्या वावरात पळाले.  लगोलग दोन्ही कुत्री देखील त्याच्या मागे लागली.  थोड्याच अंतरावर कुत्र्यांनी पिल्लास गाठले आणि त्याला जमीनीवर पाडले.  त्या मागोमाग आम्ही पण पळत गेलो.  आमच्या आधी दुसऱ्या मामांनी सांबराला गाठले व त्यास पकडले मी व महंमदअली तेथे पोहचून त्याला पकडणार इतक्यात मामांनी आमच्या मागोमाग आलेल्या काका भिसे आणि मंडळींना बघितले व तात्काळ सांबरास सोडून दिले.  पिल्लू पुन्हा झटकन उभारून नदीच्या दिशेने सुसाट पळाले व क्षणार्धात नदीत उडी मारली, पाठोपाठ दोन्ही कुत्र्यांनी देखील पाण्यात उडी मारली.  त्यास पकडायचे आमचे प्रयत्न विफल झाले.  त्या ठीकाणी नदीत खुप झाडोरा होता.  कुत्र्यांनी लगेचच पिल्ल्ला गाठले.  आम्ही सर्वजण इकडे तिकडे पळत कुत्र्यांना हुसकवायचा प्रयत्न करत होतो.  पण पाण्यात उतरण्यासारखी परिस्थितीच नव्हती.  पिल्लू पुन्हा करूण किंचाळू लागले. काका सोबत आलेले दोघे आंबोलीकर तरूण नदीवर आडव्या वाढलेल्या झाडाच्या फांदीवर चढून काठीने हुसकवायचा प्रयास करत होते.  पण कुत्री खुपच धीट होती.  हळूहळू ते पिल्लास पाण्यात बुडवून धरू लागले.  थोड्या वेळात पिल्लाचा आवाज बंद झाला.  सगळेच संपले होते!  कुत्र्यांनी आपला कार्यभाग उरकला होता.  आता त्या पिल्लाचे कलेवर पाण्यात तरंगत होते.  कदाचित पाण्यात बुडून वा हार्ट अटॅकने त्याचा मृत्यु झाला होता. 
काका भिसेला मी पाण्यात न उतरण्याबाबत छेडले असता तो बोलला वेडा आहेस काय? ही जागा खुप डेजरस आहे.  येथे अनेक जण गाळात अडकून मेले आहेत.  'नशीब भावनेच्या भरात पाण्यात नाही उतरलास '
हे सर्व चालले होते तेव्हा ते सांबर सोडून गेलेले दोन्ही युवक परत आले.  ते आमच्याशी काहीच बोलत नव्हते.  पण सांबर मेल्याचे कळाल्यावर ते लगेच माघारी फिरले. 
मी परतत असताना खुरपे घेतलेले मामा तेथेच उभे राहून सगळा तमाशा बघत होते.  मी हटकल्यावर बोलले 'हा वावर माझा आहे, आम्ही सांबर खात नाही, इतर लहान प्राणी खातो.  माझ्या जागेत जर सांबर मेल तर वनखात्याचे नस्त लचांड माझ्या मागे लागल'.
आता आम्ही पुलावर परतलो.  काका भिसेने वनविभागास फोन लावून सर्व सांगितले.  मग मला बोलला 'फारूक हे आता नेहमीचेच झालय, महिना पंधरवड्यात एखादी अशी घटना घडतेच येथे.  काही वेळा आम्ही जनावर वाचण्यात यशस्वी होतो.  पण अलिकडे गावठी कुत्री फार माजलीत.  दोन-तीन कुत्री मिळून जंगलातील जनावर हेरून ताणत आणतात.  मग ते दमल की ठार मारून मेजवानी झोडतात'. एवढ बोलून तो निघून गेला.

पुलावर सैफअली व सुफिया बेचैन होऊन माझी वाट बघत होते आल्या आल्या सौ बोलली 'अहो हे लोक सांबरास वाचवायचा प्रयत्न नाही करताहेत तर त्यांना हिस्सा हवाय त्यात'. सौ प्रचंड उद्विग्न झाली होती.  तिला शांत करून तिच सर्व ऐकून घेतल.  मग माझ्या दोन्ही मुलांचे पण सर्व ऐकून घेतल आणि माझ्या डोक्यात सगळा घटनाक्रम आला. 
कुत्र्यांनी दोन्ही सांबरांना जंगलातून पाठलाग करत आणले होते.  ही कुत्री यात चांगलीच तरबेज वाटत होती.  जीवाच्या आकांताने सांबरांनी नदीत उडी मारली, त्या पाठोपाठ कुत्र्यांनी पण नदीत उडी मारली.  मागोमाग एक व्यक्ति पण किनाऱ्यावर येऊन त्यांना हुसकु लागला होता. 
जंगलात सुद्धा जेव्हा वाघ, रानकुत्री सांबराच्या मागे लागतात तेव्हा सांबर नदी, नाले, तलाव अश्या पाण्यात उतरतात आणि पोहत पैलतीरावर जातात किंवा खोल पाण्यात उभे राहतात.  येथे सुद्धा त्यांनी असेच केले होते.  पण येथे पैलतीरावर एक व्यक्ति त्यांना हुसकावत होता.  त्यामुळे सांबरे माघारी फिरली, मादी सांबर जीव वाचवून जंगलात पळाले पण पिल्लू मात्र कुत्र्यांच्या तावडीत सापडले.
हा सगळा कालवा ऐकून वा माहित असल्याने दुचाकीवरून आलेले दोन युवक सरळ नदीच्या डावीकडील किनाऱ्यावर धावत सुटले.  त्यांच्या पाठोपाठ सैफअली व महंमदअली देखील गेले व हातात येईल त्याने कुत्र्यांना मारायचा प्रयत्न करत होते. तेव्हा तेथे असलेले मामांनी 'कुत्र्यांना मारू नका, जखमी होतील' असा एकसारखा तगादा लावला होता.  पाण्यात सांबर दृष्टीस पडताच त्यातील एक तरूण सरळ नदीत घुसला आणि त्याने सांबरास ओढत बाहेर काढले.
आता पर्यंत आम्ही सर्व समजत होतो की दोन्ही ग्रामस्थ आणि चारचाकी व दुचाकी तून आलेले सर्व सांबरास वाचवण्यासाठीच प्रयत्न करत आहेत.  पण जसे पिल्लू ताब्यात आले तसे त्याच्या वाट्याची चर्चा तेथे चालू झाली.  तेव्हा सैफअली त्वरित मला बोलवायला माघारी फिरला.  महंमदअली तेथेच थांबला.  तो त्यांना वारंवार सांगत होता सांबराला मारू नका.  आंबोली वनविभागास कळवले आहे, ते येतीलच येवढ्यात. तेव्हा ऐक मामा बोलले की 'हा भाग आंबोली वनविभाग कडे येत नाही त्यांना कशाला बोलवताय'. 
त्याच वेळेस त्या गाडीतील महिला आणि सुफियाची पुलावर चर्चा चालू होती.  सुफियाने सांगितले माझे मिस्टर नॅचरॅलिस्ट आहेत व त्यांचे मित्र आंबोलीतील काका भिसे येथील वाइल्डलाइफ वाॅर्डन आहेत. ते येतीलच इथे आता.  तस ती महिला लांब जाऊन पती सोबत बोलत थांबली. 
सौ पुढे बोलली, तुम्ही सगळेच आत गेल्यानंतर खुप वेळाने ते दोन युवक परतले.  नदीत जाऊन त्यांनी हात पाय स्वच्छ केले.  गाडी जवळ त्यांची चर्चा चालू होती त्यांना ती महिला बोलली 'कुणास ठाऊक खरच ते (आम्ही) नॅचरॅलिस्टस् आहेत का? खरच त्यांनी फाॅरेस्ट वाल्यांना बोलवलय का?  नाहितर तेच सांबरास मारून हिस्सा घेतील!  ही लोक (आम्ही) काय सांबरास वाचवणारे दिसत नाहीत.  तसे ते युवक सहनिशा करायला पुन्हा नदीच्या किनाऱ्याने आत गेले व ती महिला पतीसह गाडीत बसून कावळेसाद पाॅइन्टच्या दिशेस निघून गेले.
या सर्व गदारोळात जवळपास दीड तास गेला.  कावळेसादला जाऊन निवांत बसायचे ठरविल होत.  असो पण या अनुभवातून एक गोष्ट मात्र आमची मंडळी शिकली "दिसत तस नसत"
सांबरास वाचवू शकलो नाही याचे दुखः सर्वांनाच झाल होत.  सैफअली तर जास्तच उद्विग्न झाला होता, बोलला  'मला भेटू देत ती म्हातारी ढकलूनच देतो त्यांना नदीत '
ज्यांना ज्यांना देवदूत समजले होते ते सगळेच यमदूत निघाले.
हताश होऊन आम्ही कावळेसाद पाॅइन्टला निघालो.  आता आम्हास आसपास काही बघायची इच्छाच नव्हती.  कावळेसाद पाॅइन्ट वर बरेच पर्यटक होते.  वातावरण सुद्धा आल्हाददायक होते पण आम्ही ऐकाच ठिकाणी अगदी पार अंधार पडे पर्यंत थंडपणे बसून राहिलो.

मानवी स्वभावाच्या क्षणोक्षणी बदलणार्या अनेक छटा या दिड तासात दिसल्या. 
सांबराचा जीव वाचावा म्हणून धडपड करणारी माझी मुले!
कुत्री सांबराला घेरून त्याची शिकार करत असताना ते आपल्यास कसे मिळेल यासाठी धडपडणारे ग्रामस्थ मामा !
सांबराच्या पाठी लागलेल्या कुत्र्यांना दगड लागू नये म्हणून ओरडणारे ग्रामस्थ मामा !
सांबर आपल्या हाताला लागत नाही असे कळाल्यावर बेफिकीरी दाखवणारे ग्रामस्थ मामा !
सांबराची मेजवानी मिळावी म्हणून जीवाची बाजी लावून धडपणारे युवक !
वाईल्डलाईफवाले आले हे बघितल्यावर सांबरास कुत्र्यांच्या हवाली करणारे युवक !
मेजवानी चुकल्यावर त्रागा करणारे युवक !
सांबराची सागुती करायची इच्छा असलेली महिला व तिचा पती !
हा सगळा प्रकार पाहून भेदरून गेलेली माझी सुन शायना !
या सर्व गोष्टींचा उलगडा झाल्यानंतर प्रथम आश्चर्यचकित झालेली व नंतर भडकलेली माझी फॅमिली !
वनविभागाबाबत ग्रामस्थांना असलेली भिती, त्याच वेळी वनविभागाच्या हद्दी बाबतीत त्यांना असलेले ज्ञान !
ऐन सणासुदीत देखील सर्व कामे बाजूला ठेऊन सांबरास वाचवण्यासाठी त्वरीत धावत आलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वाइल्डलाइफ वाॅर्डन काका भिसे आणि त्याचे मित्र !

इथ मात्र एक म्हण तंतोतंत लागू पडत होती
" तुला नं मला, घाल कुत्र्याला ... "


फारूक म्हेतर
वन्यजीव अभ्यासक
कोल्हापूर


Comments

Popular posts from this blog

महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways

कारवी' एक नैसर्गिक चमत्कार

Myristica Swamp