Climate Change
Climate Change
'नेमिची येतो मग पावसाळा...'
वर्षानुवर्षे ऋतूमागून ऋतू येतात आणि जातात.
दरवर्षी पावसाचे आगमन होते. कधी तो लवकर येतो तर कधी उशिरा! एकंदरीतच वरील ओळीतून आपल्याला हा अर्थ बोध होतो.
या वर्षी जुन महिन्यात प्रत्येक आठवड्यात एकदा तरी जंगलात जाणे झालेच. तसे ते दरवर्षी होतेच परंतू करोना मुळे गेल्या दोन-तीन वर्षात या मधे खंड पडला होता.
जूनचा पहिला आठवडा
पहिल्या आठवड्यात जंगलात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. पक्षी आपापल्या जोड्या जमवण्यात मग्न होते, त्यांच्या मधुर कोर्टशीप काॅल्सनी आसमंत भरून गेला होता. सुंदर सुंदर फुलपाखरे नुकतीच कोशातून बाहेर पडून जोडीदाराच्या शोधात भिरभिरत होती.
जंगलात बहुतांश ठीकाणी उतारावर, मोकळ्या रानात कारवी ही दर सात-आठ वर्षांनंतर फुलणारी झुडपी वनस्पती भरपूर प्रमाणात होती. ती मार्च पासूनच पूर्णपणे निष्पर्ण झाली होती.
खुपश्या झाडा झुडपांना मोहक पालवी फुटत होती. जंगल सरड्यांच्या नरांना गळ्या भोवती भड़क रंग आले होते व त्यांची मादीला रिझवण्यासाठी पळापळी, द्वंद युद्ध सुरू होते. कसलेल्या पैलवाना सारखे नर ऐकमेकांना भिड़ होते धोबी पछाड देत होते. सिकाड्यांचा तार स्वर तर अगदी गगनास भिडला होता. लवकरच पाऊसाला सुरवात होणार या आशेत निसर्ग सज्ज होत होता.
रात्रीचे जंगल तर अजूनी वेगळेच रूप सादर करत होते. सर्वत्र काजवे चमचमत होते. गेल्या पाच दहा वर्षांच्या तुलनेत काजव्यांच्या संखेत खुपच घट झालेली आहे. परंतू तरीही उर्वरित काजवे आपला वंश पुढे वाढवण्याची तयारी करत होते, त्यांचे चमकण्याचे सिक्रोनायझेशन अप्रतिम दिसत होते. एका मागोमाग एक वृक्ष त्यांच्या चमकण्याने उजळून निघत होते.
हरणटोळ सारखे झाडांवर राहणारे साप झुडपाभोवती स्वतःला लपेटून भक्ष्याच्या प्रतिक्षेत निपचीत घात लावून बसले होते. काही वृक्ष बेडूक पावसाची वाट पहात विविध आवाज करत होते. रातकिड्यांनी वेगळाच ठेका धरला होता. संपुर्ण उन्हाळाभर येणारा रातव्यांचा आवाज आता शांत झाला होता. त्यांचा विणीचा हंगाम संपला होता.
जूनचा दुसरा आठवडा
दुसऱ्या आठवड्यात मृग नक्षत्र सुरू होऊन देखील पाऊस अजूनही दृष्टिक्षेपात नव्हता. एखाद दुसरा चुकार आणि टुकार ढग नभात तरंगत होता. उन्हाची तीव्रता आणखीन वाढली होती. अंगाची लाही लाही होत होती. थोडेसी चढाई देखील घामटे काढत होती. थांबत थांबत मार्गक्रमण करावे लागत होते.
काही प्रजातींच्या पक्ष्यांची घरटी बांधायची लगबग सुरू होती. सिकाडा अजुनही तार स्वरातच होते. सरड्यांचे मिलन झालेले होते. विजयी नर सरडे एखाद्या उंच ठिकाणावरून परीसरातील माद्यांची टेहळणी करत होते तर पोट फुगलेल्या माद्या जमीनी लगतच थांबून होत्या. त्या॔ना प्रतीक्षा होती ती पावसाच्या सरींची जेणेकरून माती थोडी भुसभुशीत होईल व ती उकरून त्यात आपली अंडी घालता येतील.
फुलपाखरांच देखील असेच होते, मादी फुलपाखरे त्यांच्या खाद्य वनस्पतींच्या शोधात होत्या. त्यांनी नवीनच धुमारे फुटलेल्या पालवी वर अंडी घालण्यास सुरवात केली होती.
आता जंगलात काही प्रजातींच्या वनस्पतींना फुलोरा आलेला होता, त्यात दिंडा ही वनस्पती आघाडीवर होती. या वनस्पतींच्या फुलोर्याला असंख्य मधमाश्या, भुंगे, फुलपाखरे लगडलेले होते. मधमाश्या तर इतक्या उतावळ्या झाल्या होत्या की त्यांनी न उमललेल्या कळ्यांना आपल्या पायांनी उघडायचा प्रयत्न सुरू केला होता.
रात्रीच जग खुप सक्रिय झाले होते. काजवे अजूनही टीमटीमत होते परंतू पावसा अभावी मादी काजवे कीडे अजून बाहेर पडले नव्हते. विंचू देखील बाहेर येऊन सक्रिय झालेले होते, काही विंचू माद्यांच्या पाठीवर त्यांचे बिर्हाड होते. रात्री सक्रिय असणारे कोळी आता सगळीकडे दिसू लागले होते.
जूनचा तिसरा आठवडा
मृग नक्षत्राचा उत्तरार्ध
जंगलात आता थोडा थोडा पाऊस पडत होता. मौसमी वारे सुटले होते. आभाळात ढग दाटून आले होते. उन अजिबात नव्हते. वातावरण एकदम आल्हाददायक होते. जंगल धुक्यात न्हावून निघालो होते.
गवताला आता नवीन पाती फुटु लागली होती त्यामुळे परिसर हिरवट दिसू लागला होता. काळी मुसळीची पिवळीधमक फुले जागोजाग फुलली होती. रानहळदीची फुले पण सर्वत्र उमललेली दिसत होती. भुईफोड ही अळींबी काही मोकळ्या रानात इतस्ततः उगवलेली होती. थोड्याफार झाडीत मोठ मोठ्या आकाराच्या अळंबीच्या छत्र्या उगवल्या होत्या, त्यांचा सडलेल्या मांसा सारखा उग्र दर्प नाकात भसकन जात होता. निष्पर्ण कारवीला आता लालसर रंगाचे फुटवे येऊन ती फारच सुंदर दिसत होती. या वर्षी बहुतांश ठीकाणी कारवी फुलांवर येणार असल्याने तिचे खोड काही जागी विषेशतः मैदानी भागात एखाद्या वृक्षा सारखे जाडजूड झाले होते. त्यातून मार्ग काढणे म्हणजे हत्ती गवतात हरवण्या सारखे असते.
सड्यांवर परिस्थिति खुपच वेगळी होती, जागोजाग पाण्याची खळगी भरली होती. तेथे माती नगण्य असल्यामुळे आणि कठीण कातळ असल्याने पाणी लगेचच लहान लहान झरे बनून उताराच्या दिशेने झुळझुळू वाहू लागले होते. कडे कपारीत उगवनारे क्रायनम या प्रजातींच्या कंदांना कळ्या लागल्या होत्या. सगळीकडे लाल भडक व पिवळ्या रंगांची खेकडी इतस्ततः पळत होती. संपूर्ण सडा विविध प्रजातींच्या बेडकांनी भरून गेला होता. हा बेडूक आणि खेकड्यांच्या मिलनाचा, प्रजननाचा काळ होता.
जंगलात आता चावरे सुटले होते म्हणजे सोंड्या डास. हे या काळात खुप मोठ्या संखेत बाहेर पडतात. हे डास रक्तपिपासू असतात जेव्हा हे डास मोठ्याप्रमाणात बाहेर पडतात तेव्हा स्थानीय लोक चावरे सुटले असे म्हणतात. हे डास जनावरांना चावून चावून हैरान-परेशान करतात. पाळीव जनावरे, माणसे कोणीही यांच्या तावडीतून सुटू शकत नाहीत. माणसाला वा जनावरांना चावल्यानंतर तेथून रक्ताचा ओघळ येतो, वेदना देखील होतात. अश्या वेळीस पाळीव जनावरे जंगलात जात सुद्धा नाहीत. वन्य प्राण्यांचा मात्र नाईलाज असतो. अश्या वेळेस त्यांना सहारा असतो तो फक्त सड्यांचा. सड्यांवर वारे खुप वेगात सुटलेले असते आणि या चावर्या डासांना सुसाट वार्यात नीट उडता येत नसल्याने ते सड्यांवर जनावरांना फारसा त्रास देऊ शकत नाहीत. याच कारणा मुळे पहाटे व संध्याकाळी जंगलात चराई करून दुपारी जेव्हा चावरे डास अधिक सक्रिय असतात तेव्हा जंगलातील सड्यांवर गवे, सांबर, भेकर इ प्राणी येतात. सड्यावर पाणी असेल तर गवे दिवसभर तेथेच आपला वेळ घालवतात.
ऐके ठिकाणी पावसामुळे पाण्याची काही डबकी निर्माण झाली होती. त्या डबक्यावर असलेल्या वृक्षांवर भर दिवसा मलाबार ग्लाइडिंग फ्राॅग जोड्या जोड्यांनी बसलेले होते. नरांनी मादीच्या पाठीवर घट्ट मांड घातली होती. माद्या आपले मागील पाय ऐकमेकांवर घासून व आपल्या शरीरातून चीकट स्राव सोडून त्यापासून फेस तयार करून वृक्षांची पाने त्यात घेऊन मस्त पांढरीशुभ्र घरटी करण्यात मग्न होत्या. पाऊस फारसा नसल्याने पाण्याची डबकी कमी प्रमाणात साचली होती. त्यामुळे दोन-तीन जोड्या मिळून एकच घरटे तयार करत होते. असे दृश्य जागोजाग दिसत होते.
जंगलात एका ठिकाणी अस्वलाच्या विष्ठेतून जंगली वनस्पतीच्या अखंड बिया बाहेर पडल्या होत्या. पावसात भिजल्याने आणि अस्वलाच्या पोटातून बाहेर पडल्यामुळे त्या त्वरित रूजायला सुरवात झाल्या होत्या.
खरतर मुखातून चांगले जंगल हे कधीच मानव निर्मित असू शकत नाही. जंगलाचे निर्माते, संरक्षक आणि संवर्धक हे नेहमीच प्राणी, पक्षी, किटक इ निसर्गाचे शिल्पकार असतात.
रात्री थोडे फार काजवे चमचमत होते. बरेच सर्प आता बाहेर पडले होते. त्यांना उत्सुकता होती जोड़ीदार मिळण्याची, त्या लगबगीत अनेक सर्प बेधुंद होऊन रस्त्यांवर येऊन भरधाव गाड्यांखाली चिरडलेले जागोजाग दिसत होते. तीच अवस्था विंचू, सेंटीपेड (गोम), बेडूक इ निशाचर जीवांची होती. जे थोडेफार पाण्यांची डबकी साठली होती तेथे बेडकांची शाळाच भरली होती. त्यांचा कर्णकर्कश आवाज तेथील आसमंत भरून आणि भारून टाकत होता. एक-दोन ठीकाणी सिसिलियन हे दुर्मिळ उभरचर सरपटणारे जीव ओलसर रस्त्यांवर आले होते.
वाळवी या सामाजिक कीटकांसाठी पावसाळ्याची सुरूवात खास महत्वपूर्ण असते. पावसाच्या पहिल्या सरीं बरोबर वारूळात असलेले असंख्य पंखधारी नर आणि मादी वाळवीचे कीडे वारूळातून बाहेर येऊन हवेत उड्डान करतात. वारूळातून वाळवी बाहेर पडतानाचे दृश्य फार मनमोहक असते एखाद्या ज्वालामुखिय उद्रेकातून लाव्हा बाहेर पडावा तश्या या वाळवीच्या झुंडीच्या झुंडी वारूळाच्या मुखातून बाहेर पडतात. त्यांचे हवेतच मिलन होते. जमीनीवर पोहोचल्या नंतर त्यांचे पंख गळून पडतात. लवकरच नर किडे मरून जातात तर फलीत झालेल्या माद्या वारूळासाठी योग्य जागा शोधतात. येथूनच नवीन वारूळाची सुरूवात होते. वारूळातून बाहेर आलेल्या पैकी बहुतांश किडे पाली, सरडे, पक्षी, प्राणी यांच्या भक्ष्यस्थानी पडतात.
जंगलात फिरत असताना अनेक वारूळांजवळ लाखोंच्या संखेत वाळवी किड्यांचे गळून पडलेले पंख दिसत होते. म्हणजे वाळवी चे वारूळ यंदाही उठले होते आणि त्यांचे हवेत उड्डान, मिलन वगैरे झाल होत.
जुनचा चौथा आठवडा
पावसाने थोडीफार हजेरी लावून पुन्हा दडी मारली होती. मृग नक्षत्र जवळजवळ सगळाच कोरडा गेला होता.
धरणांनी तर पार तळ गाठला होता. जंगलात आता चारा आणि पाणी दोन्हींची कमतरता भासत होती.
ऐके ठिकाणी टपरी वर चहा पीत पीत आमची गव्यांबाबत चर्चा चालू होती. हे एक गावकरी लक्ष्य देऊन ऐकत होता. त्याने आम्हास विचारले 'जंगलात गव॔ बघाय चाललायसा का?' म्हटलो 'व्हय' असे उत्साही आणि जंगलाची माहिती असलेले लोक आम्हास नेहमीच आवडतात. खुप छान आणि उपयोगी माहिती मिळते त्यांच्याकडून. तर तो म्हणाला 'जंगलात कशापाई जातासा? समदं गव शेतातच हैत की !!! ' दोन मिनट आम्ही स्टन झालो. जंगलात जीव तोडून फिर फिर फिरलो तरी एकपण जनावर का दिसत नाही याचा क्षणात उलगडा झाला.
जंगलात वातावरण एकदम तंग होते. सर्व प्राणी, पक्षी, कीटक एवढच काय वनस्पती देखील हैराण होत्या हे पदोपदी जाणवत होते.
मलाबार ग्लाइडिंग फ्राॅगच्या जोड्यांनी गेल्या आठवड्यातील पावसात डबकी साचलेल्या वृक्षांवर फेस तयार करून त्यात अंडी दिली होती. ही सर्व घरटी आता पावसा अभावी सुकून गेली होती. काही घरट्यातून अंडी, अर्धवट तयार झालेली पिल्ली खाली बीन पाण्याच्या डबक्यात पडून नष्ट झाली होती. त्यांना मुंग्या लागल्या होत्या. अश्या प्रकारे एका नवीन पिढीचा सर्वनाश झाला होता !!
गेल्या आठवड्यात तुडुंब भरलेली डबकी आता आटली होती आणि बेडकांनीही तेथून काढता पाय घेतला होता. वृक्ष बेडुकही पुन्हा त्यांच्या ढोलीत गायब झाले होते.
पक्ष्यांचा गुंजारव थंड झाला होता, त्यात मरगळता स्पष्ट जाणवत होती. फुलपाखरे सैरभैर झाली होती. त्यांनी दिलेल्या अंड्यातुन अळ्या बाहेर येऊन त्यांनी संपूर्ण नवीन पालवी संपवली होती आणि नवीन पालवीच्या शोधात त्या इतस्ततः भरकटत होत्या.
सरडे आता गायब होते बहुदा माद्यांची ओलसर जमीनीत अंडी घालून झाली होती. पण आता ती जमीन कोरडी होऊन तीला भेगा पडू लागल्या होत्या. अश्या प्रकारे यांची ही नवीन पिढी नष्ट व्हायची शक्यताच जास्त होती.
रस्ते कोरडे ठाक झाले होते. रात्रीची कसलीच हालचाल नव्हती. काजवे आता तुरळकच होते कदाचित पावसा अभावी माद्याच बाहेर न पडल्यामुळे नर काजवे कंटाळून गेले असावेत. आधीच विविध कारणांमुळे धोक्यात आलेल्या काजव्यांची नवीन पिढी या वर्षी तयारच होणार नाही की काय? अशी परीस्थिती निर्माण झाली होती.
हताश निराश होऊन घरी परत येत असता एका गावाजवळील पाणंदीतून दहा-बारा गव्यांचा कळप घाई घाईने आमचा रस्ता क्राॅस करून गेला. कोणत्या तरी शेतकर्याच्या पिकांवर / तरवांवर ताव मारून जंगलात वापस जात असावा. आम्हास त्या टपरी वरील गृहस्थाचे बोल आठवले!!
" क्लायमेट चेंज " " क्लायमेट चेंज " हे गेली अनेक वर्ष ऐकत होतो आता प्रत्यक्ष अनुभवतोय. मानवी चुकांचे दुष्परिणाम साक्षात समोर आले आहेत.
आपल्या कर्माचे फळ इतर जीवांना भोगावे लागताहेत याचे अतीव दुःख होत होते.
स्तब्ध आणि निःशब्द होऊन भगवान / अल्लाह / ईश्वर कडे प्रार्थना / दुआ करत घरी परतलो.
" माणसाला सुबुद्धी दे "
फारूक म्हेतर
वन्यजीव अभ्यासक
कोल्हापूर
90 28 81 60 60
Comments
Post a Comment