दाजीपूर आणि लंगडी गाय

 दाजीपूर आणि लंगडी गाय


साल 1990 मी कैम्ब्रिज (GKG) मधून बारावी सायंन्स पास झालो,  डाॅक्टर मला व्हायच नव्हत आणि इंजिनियरिंग जमणार नव्हत.  दगडा पेक्षा वीट नरम म्हणून माइक्रोबायोलॉजी या विषयासाठी ऑक्सफ़ोर्ड (RCK) मधे BSc साठी प्रवेश घेतला.  मेरीट लिस्ट मधे नंबर लागला रितसर प्रवेश घेतला. पण जवळपास महिनाभराच्या गैरहजेरीने काॅलेजला हजर झालो.  माइक्रोबायोलॉजीच्या वर्गात 35 विद्यार्थी त्यात 28 मुलीच आणि आम्ही सात मुले पैकी एकजण सुदानचा चांगला सव्वा सहा फुट उंचीचा पैलवान गडी.
त्या वर्षी सलमानचा 'मैने प्यार किया' हा चित्रपट रिलीज झाला होता.  तो सुदानी मुलगा फातेही (त्याचे नाव) फार चित्रपट शौकीन.  कळायच काहीच नाही पण एक पिक्चर बघायच सोडत नव्हता तो.  घोगर्या आवाजात म्हणायचा "मैने ब्यार किया"  त्याच्या  अॅसेंन्टवर आणि ब्यार या उच्चारावर सगळे हसायचे.  मला माहित होत की त्याची मदर टंग अरबी आहे आणि अरेबिक मधे 'प' अद्याक्षरच नाही.
सात जणच असल्यामुळे आमची लगेच मैत्री झाली.  दोघे शिवाजी पेठेतील होते, अजय प्रसिद्ध योगगुरू खोत गुरूजींचा मुलगा तर शरद गोसावी जो आज अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे (राज्य मंडळ) आहे.  समीर भादवणच्या डाॅक्टर कारेकरांचा मुलगा, विद्याधर सातोसकर व महेश सरलष्कर हा अवलीया.
मी प्रत्येक रविवारी, सुट्टीच्या दिवशी जंगलात जायचो आणि काॅलेज वर मित्रांना तेथील अनुभव सांगत असे, त्यामुळे सगळे माझ्या मागे लागले की आपण जंगलात जाऊ फिरायला.  लवकरच आम्ही पन्हाळा जाऊन आलो.  त्यांनी कधी जंगल म्हणुन पन्हाळा बघितलाच नव्हता.  आता ते  माझ्यासोबत मोठ्या ट्रीपचा आग्रह करू लागले.  मी म्हटलो 'दाजीपूर जाऊ या काय दोन तीन दिवसासाठी'  सगळे एका पायावर तयार !
तत्पुर्वी मी दोनच वेळा दाजीपूर गेलो होतो.  एकदा MTDC च्या रिसॉर्ट वर राहिलो होतो तर एकदा एक दिवसीय भटकंती होती.
आमच ठरल, दिवाळीच्या सुट्टीत दाजीपूर जायच, फातेही सोडला तर सगळेच तयार झाले.
दाजीपूर ला जंगलात जाऊन टाॅवर वर दोन तीन दिवस रहायच, स्वतः स्वयंपाक करायचा, ट्रेकिंग, हायकींग करायच, प्राणी, पक्षी बघायचे अस सगळ ठरल.  मग काय झाली आमची तयारी सुरू !
बहुतेकांची पहीलीच वेळ असल्याने अगदी कपडे, बुट पासून सुरवात होती, सॅक, वाॅटर बाॅटल, टाॅर्च, इत्यादी साहित्य आपापले खरेदी केले.  स्वयंपाक करायच म्हटल तर भांडी, ताट, वाट्या, चमचे इ साहित्य कुणी काय आणायचे ते वाटून घेतले.  मग पट्टी काढून तांदुळ, पीठ, तुर डाळ, कांदे, बटाटे, रवा, पोहे, शेंगतेल, चटणी, मीठ असे स्वयंपाकातील सर्व साहित्य आणले.  झोपायला सतरंज्या आणल्या अशी जंगी तयारीच केली. 
आमचे दसर्याच्या वेळीच प्लॅनींग झाले होते.  प्रत्येक जण आपापल्या परीने माहीती काढत होता.  अरे तेथे गवे रेडे खुप आहेत, अस्वल, वाघ, बिबटे सारखे हिस्र प्राणी देखील आहेत,  विषारी साप, विंचू खुप असतात जस जशी माहिती मिळत गेली, तस तशी आमची तयारी आणखी घट्ट होत होती.  आग पेटी चे अखंड बंडलच घेतले, ते सर्वात विभागून ठेवले.  हिस्र प्राण्यांपासून बचावासाठी फटाकड्या घ्यायच ठरल.  एकाने टुम काढली की आपल्या जवळ एखाद हत्यार देखील हवे.  मग दोन-तीन रामपुरी चाकू घेतले.
विद्याधरच्या मामाचे लेथ मशीन होते.  मी एक लोखंडी पट्टी पैदा केली.  रोज रात्री मामाच्या वर्कशाॅप मधे जाऊन आम्हीच त्या पट्टीला घासून घासून लांब गुप्ती सारखे हत्यार बनविले.  त्याला लाकडी कव्हर पण बनविले.
बघता बघता दिवाळी आली,  आमची तयारी जवळपास पुर्ण झाली होती.  फटाक्याचे स्टाॅल लागले.  लक्ष्मी तोटे, सरस्वती तोटे, सुतळी बाॅम्ब, फटाक्याच्या माळा अशी भरगच्च खरेदी केली.  फटाके प्रत्येकाच्या सॅक मधे विभागून ठेवले.
शेवटी तो दिवस उजाडला भल्या पहाटे उठून एस टी स्टॅन्ड गाठले.  सगळे जमले पण विद्याधर महाशय प्रकटलेच नाहीत   फोन वगैरेची सोय नव्हती त्याने नेहमी प्रमाणे कोळसा वडला होता !  कोल्हापूर-राधानगरी बस फलाटावर लागली होती, वेळेवर बस सुटली.  सामान सुमान व्यवस्थित चेक करून बसलो.  फारशी गर्दी नव्हती प्रत्येकाने खिडकी जवळील सीट पकडली होती.  आमजाईवहरवडे नंतर घाट सुरू झाला.  बाजूने घनदाट जंगल न्यासाळत दोन-एक तासात निवांत राधानगरीत पोहोचलो. कॅन्टीन मधे मस्त भरपेट नाष्टा केला, तोच कणकवली बस आली.  पटापट सामान त्यात चढवले, आणखीन निघालो.  ऐटदार वळणे घेत दाट जंगलातून बस निघाली.  बरोबर 12 वाजता दाजीपूर येथील नाक्यावर बस थांबली.  सगळे उतरलो सामान पाठीवर लादले आणि निघालो जंगलाच्या दिशेने.  वन विभागाच्या नाक्यावर सुट्टी असल्याने कोणीच नव्हते.
मला एकवेळ शहरातील रस्ते लवकर सापडत नाहीत पण जंगलात मी राजा असतो.  एक दोनदा जाऊन आलो की बास! मग कितीही दिवसांनी गेलो तरी न चुकता मी वाट शोधुन काढतोच. ओलवण गाव दाजीपूर पासून दीड किलोमीटर अंतरावर आहे.  तेथून पुढे डावीकडे वळले की कच्चा रस्ता सुरू तो थेट तीन-चार किलोमीटर वर दाट जंगलातील ठक्याचा वाडा हया ठिकाणी पोहोचतो. येथे वनविभागाची चौकी आणि अभयारण्याचे गेट आहे.  गेट मधून आत गेले की पुढे हडक्याची सरी दोन किलोमीटर अंतरावर आहे.
हडक्याची सरी ही दाजीपूर अभयारण्यातील एक अशी पायवाट आहे जी वन्यजीवांनी बनवलेली आहे. वळणावळणाची ही उभी चढणीची वाट दुतर्फा कारवीने गच्च भरलेली असते.  कधी कोणत्या वळणावर एखादा बलदंड गवा समोर उभा ठाकेल सांगता येत नाही.  ही सरी पार केली की दाट जंगलातील सपाट वाट आपल्यास वाघाचे पाणी या प्रसिद्ध ठिकाणी घेऊन जाते. वाघाच्या पाण्याला जर गाडीने जायचे असेल तर संपुर्ण डोंगराला वळसा घालून जायला जवळपास 15 किलोमीटरचा पल्ला पडतो. हडक्याची सरी ने गेलो की हेच अंतर फक्त 5-6 किलोमीटर इतकेच भरते.  हडक्याच्या सरीची नेमकी एन्ट्रीची वाट शोधने हे एक कौशल्यपुर्ण काम आहे.  जराशी चुक 15 किलोमीटरचा फेरा पाडू शकते.
आम्हास हीच हडक्याची सरी पार करून वाघाचे पाणी येथील टाॅवर वर मुक्काम करायला जायचे होते. तेथे मुक्काम करून गडगड्याचा ओढा, भोपळीची सरी, सांबरकोंड, कोकण दर्शन पाॅईन्ट, सावराईचा सडा ही ठिकाणे फिरायची असा बेत होता.
मजल दरमजल करत आम्ही ओलवण गावाजवळील एका पुलावर आलो.  पावसाळा नुकताच संपला असल्याने ओढ्याला भरपूर पाणी होते.  या पुलाच्या उजव्या बाजूस एक छोटा डोह आहे त्यात पोहायची मजा काही औरच असायची.  आम्ही लगेच त्यात उड्या मारल्या तासभर मज्जा करून बाहेर आलो.  जाम भुक लागली होती दुपारचे जेवण घरातूनच तयार करून आणले होते.  भरपूर जेवलो तो पर्यंत दोन वाजले होते  
वातावरण एकदम आल्हाददायक होते.  सगळीकडे हिरवीगार शेती होती, जंगलातील गवत सुद्धा हिरवेगार होते.  हवेत छान गारवा होता, मस्त सुर्य प्रकाश पडला होता.  कपडे बदलून ओलवण गावाजवळील डावी कडची वाट धरली.  थोड्याच वेळात चढ लागला, वळणा वळणाचा नागमोडी रस्ता आता दम भरवू लागला होता.  प्रत्येकाच्या पाठीवर कमीतकमी  20 किलो साहित्य होते.  हातात सुद्धा जेवणाच्या साहित्याच्या बॅगा होत्या.  चांगलीच दमछाक होत होती.  थोडस चालायच, पाच मिनट बसायच. अस करत करत दोन तास तरी चालत होतो.  संध्याकाळचे चार वाजले होते आणि अचानक आभाळात ढग दाटू लागले.  आकाश काळवंडले.  आम्ही आपल दंगा मस्ती करत चाललो होतो.  पाच वाजता पाऊस सुरू झाला.  सुरवातीस हळूहळू पडणारा पाऊस थोडायाच वेळात धुमाकुळ घालू लागला.  ठक्याचा वाडा जवळच आहे पोहचु लवकरच असा धीर देत मी नेटाने चालत होतो.  आमच्या सॅक वाॅटरप्रुफ नव्हत्या, त्या पुर्ण भिजून अधिकच जड झाल्या.  अंगावरील कपडे चिंब भिजले होते.   आता ऐकेकाचा धीर सुटू लागला होता.  पाय उचलवत नव्हते.  रस्त्यांवर चिखल झाला होता त्यावर पाय घसरत होते.  साडेपाच झाले, पाऊस काय थांबायचे नाव घेत नव्हता, उलट जोरदार पडू लागला, अगदी दहाफुटावरचे सुद्धा दिसत नव्हत.  वारा सुद्धा सोसाट्याचा सुटला.  त्या वातावरणात जंगल अधिकच गुढ आणि भयान वाटू लागले होते.
शरदने तर सरळ देवाचा धावा करायला सुरवात केली. समीर तर गळपटलाच होता.  शरद अजयचा हात सोडायलाच तयार नव्हता.   नखशिखांत भिजल्यामुळे थंडीने दात कडकडू लागले होते. मी बापडा सगळ्यांना धीर देत किल्ला लढवत होतो.  आता अंधार दाटू लागला होता.  रस्ता चुकलो की काय अशी उगाचच शंकेची पाल मनात चुकचुकत होती.  पुलावर पोहत फालतु टाइमपास केला म्हणून मी सगळ्यांना ओरडत होतो. 
आता काय करायच याचा विचार-विमर्श करत असतानाच अचानक एक गाय समोरून रस्त्यांने आमच्या दिशेनेच जोरात पळत आली.  आमच्या जवळ पोहोचताच ती एकदम शांत झाली.  ती गाय एका पायाने लंगडी होती.
समीर म्हटला 'बघा ही गाय लंगडी आहे, जंगलातून बाहेर पडल्यावर आपल्याकडेच जोरात धावत आलीय आणि शांत झालीय नक्कीच हीच्या मागे वाघ लागला असणार'. 
"वाघ नेहमीच असले सावज हेरून शिकार करतो"
झाल समीरचा हा शेवटचा तर्क बाॅम्ब सारखा आमच्यावर अक्षरशः आदळला !!! सगळे जागेवरच थिजले, सगळ्यांना भर थंडीत दरदरून घाम सुटला. 
अजय ने लगेच गुप्ती बाहेर काढली, पटापट सॅक उघडून फटाकड्या बाहेर काढल्या बघतो तो काय सर्व फटाकड्या पावसाने चिंब भिजल्या होत्या. आगपेट्या तर पार  विरघळून गेल्या होत्या. आता आमचा धीर पार सुटला, भितीने गाळण उडाली सगळ्यांची.  शरदची तर पार बोबडीच वळली होती "आयुष्यात परत तुमच्या बरोबर कुठच येणार नाही" अशी भीष्म प्रतिज्ञाच केली त्याने.  समीरचे मिश्कील पण भीती पसरवणारे काॅमेंटस् चालूच होते आता वाघ आला तर काय, गवा आडवा आला तर काय इ. इ.
आता मात्र माघारी फिरण्या शिवाय कोणता पर्यायच नव्हता आमच्यासमोर.  कारण पुढे जावे तर गाय तिकडूनच पळत आली होती मागे जायच तर किमान तीन तास तरी लागणार होते.  आमचे कपडे, अंथरून, पांघरून सगळेच चिंब भिजले होते स्वयंपाक तर दूरच शेकोटी पण पेटवता येणार नव्हती.  कालाय तस्मैय नमः करून माघारी फिरलो. घसटत, खिरडत, कुडकुडत परतीच्या प्रवासाला सुरवात केली.  लंगडी गाय पण आमच्यासोबतच चालत होती, तिच्या सोबतीने धीर पण येत होता तितकीच भिती पण वाटत होती.  खरच हिच्या मागे वाघ लागला असेल तर आपल काय खर नाही आता !!!
पुर्ण अंधार झाला होता टाॅर्च च्या उजेडात धडधडत्या अंतःकरणाने, ऐकमेकांना खेटून आमचा माघारीचा प्रवास सुरू होता.  पाऊस काय थांबायचे नाव घेत नव्हता  
साधारणत आठ वाजता आम्ही ओलवण गावाजवळ पोहोचलो.  ओलवण मधे जायच का पुढे दाजीपूरला जायच असा विचार मी करतच होतो इतक्यात ती गाय आम्हास सोडुन सरळ ओलवण गावाकडे वळली.  म्हटल आता हिच्या मागुनच जायच.  मला एकदम आठवल की ओलवण मधे एक मोठ विठ्ठल मंदिर आहे.  त्याच्या समोर मोठा पंडाल आहे.  तेथे आपण मुक्काम करू शकतो आणि गावकरी आपली मदत नक्कीच करतील. 
गाईच्या मागे मागे गावात पोहोचलो. गावात लाईट्स नव्हते, निरव शांतता होती. लवकरच विठ्ठल मंदिर आले.  गाय सरळ पुढे निघून गेली. रात्रीचे नऊ वाजून गेले होते.   अभयारण्य परीसरातील गावांत शक्यतो भटकी कुत्री नसतात आणि असलीच तरी ती रात्री कधीच भुंकत नाहीत वा अंगावर येत नाहीत.  कारण त्यांना बिबळ्या वाघाची प्रचंड भिती असते.  तसेही त्या काळात आजच्या सारखी भटक्या कुत्र्यांची समस्या नव्हती.  मंदिरात पोहोचलो, पंडाल रिकामाच होता.  गाभार्यात एकमेव पणती तेवत होती.  खुप हायस वाटल. मी गावात जाऊन येता कोण भेटतय का बघतो अस म्हणत महेश सरळ गावात शिरला दहा मिनिटात दोन व्यक्ती कंदील घेऊन आले त्यात महेश एक होता दुसरे गावातील एक सन्माननीय व्यक्ती होती. आम्ही त्यांना सगळी परिस्थिती सांगितली, आमची अवस्था बघून त्यांनी आम्हास त्यांच्या घरी नेले.  पडवीतच छान शेकोटी पेटली होती फार बर वाटल जीवात जीव आला.   सॅक मधील सर्व कपडे भिजून गेले होते म्हणून आमच्या अंगावरील कपडे वाळेपर्य॔त शेकून घेतले.  मग त्यांनी आम्हास जेवण दिले झोपायला घोंगडी आणि चादरी पण दिल्या. पंडाल मधे कंदीलाच्या उजेडात जमिनीवर घोंगडी टाकून त्यावर झोकुन दिले.  कंदीलाच्या उजेडाला किडे, पतंग आकर्षित होऊ लागले त्यांना खायला एक टोड उड्या मारत मारत आला. परत समीरची टकळी सुरू झाली 'रात्री गोम, मुंग्या कानात जातील, विंचू, इंगळी पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात बाहेर पडतात ते आपल्याला चावतील, साप येऊन उबेसाठी आपल्या अंथरूणात शिरतील' ब्ला ब्ला ब्ला
मंदिराच्या पंडाल मधे छान झोप लागत होती पण झोपू देईल तो शरद कसला, त्यात समीरने घाबरवून सोडले होते.  रात्रभर शरद देवळातील घंटा जोरजोरात वाजवत बसला होता.  मध्य रात्री कधी झोप लागली समजलेच नाही.
सकाळी जरा उशीराच उठलो.  पाऊस थांबला होता.  गावात गाई गुरांची चरायला जायची लगबग सुरू होती.  आम्ही त्या सद् गृहस्थांच्या घरी गेलो.  मस्त चहा मिळाला.  त्यांचे मनापासून आभार मानुन तडक दाजीपूर गाठले आणि पहिली मिळालेली बस पकडून कोल्हापूरला परतलो. 
अश्या प्रकारे महिनाभर राबून ठरवलेली तीन दिवसांची आमची ट्रीप एका दिवसातच संपुष्टात आली.  😔

Faruk Mhetar 90 28 81 60 60 Kolhapur 

Comments

Popular posts from this blog

महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways

कारवी' एक नैसर्गिक चमत्कार

Myristica Swamp