कोंकण - कॅलिफोर्निया की काळा-फोर्निया 🤔

कोंकण  - कॅलिफोर्निया की काळा-फोर्निया 🤔

निसर्ग संपन्न कोंकण सद्या धगधगतय !!!
मग ते रबर प्लॅन्टेशन असो, अननस प्लॅन्टेशन असो, राजापुर बारसू नानार प्रस्तावित रिफायनरी असो,
एनराॅनचा प्रकल्प असो, कळणे येथील मॅगनिजची खाण असो, रेड्डी येथील खाण असो वा जैतापूरचा प्रकल्प असो.
असली राखरांगोळी करणारी सगळी प्रकल्पच आणखीन तेही कोंकणातच का?  याने कोंकणचा कॅलिफोर्निया होणार नाही पण काळा-फोर्निया नक्कीच होईल.
एक काळ असा होता की कोंकण अति मागास होते पण सुखी समाधानी लोक होते.  ज्यांना शिकायचे होते ते शिकले, पुणे, मुंबई, आखाती देशात, अमेरिका, युरोप अगदी जगाच्या कानाकोपर्यात गेले.  पण जे कोंकणातच राहिले ते अजूनही निसर्ग संपन्न जीवन जगताहेत.
कोंकण अजुनही मागास राहिलय या म्हणण्यास आता काहीएक अर्थ नाही.  काळाच्या ओघात कोंकण रेल्वे आली, मुंबई-गोवा हायवे प्रथम दुपदरी नंतर चार पदरी आता सहा पदरी होतोय.   मुंबई, पुणे सारख्या मेट्रोपॉलिटन शहरांशी संपर्क सोपा झाला, आता चिपी विमानतळ देखील सुरू झालाय.
अलिकडे दहा एक वर्षात कोंकणात पर्यटन सुरवात झाली आणि गेल्या पाच सहा वर्षात त्यात भरभराट येतेय.  अगदी दक्षिणेकडील शिरोडा बीच पासून उत्तरेकडे अलीबाग पर्यंत अनेक बीच प्रकाशझोतात आले.  आणखीन बघता बघता पर्यटन हा समुद्र किनाऱ्यावरील अनेक लोकांचा मुख्य व्यवसाय तर शेकडो लोकांचा साईड व्यवसाय झाला. लोकांच्या हातात पैसा खेळु लागला.  गोव्याला लाजवतील असे अनेक बीच आज कोंकणात आहेत.  या सर्व बीचेसना जोडणारा कोस्टल हायवे पण पुर्ण होत आहे.  फक्त कमतरता आहे तेथे आत्याधुनिक सोई सुविधापूर्ण व्यवस्था उपलब्ध करून देण्याची, ज्यात आपले सरकार, प्रशासन पुर्णपणे अपयशी ठरलय.
कोंकणातील हापुस आंबा जगभर प्रसिद्ध आहेच त्यामुळे कोंकणात अनेक लहान मोठे खाजगी आंबा प्रोसेसिंग युनीटस् उभे राहिलेत आणखीन नवीन होतील. पण या दृष्टिकोणातुन एकही शासकीय मोठा प्रकल्प कोंकणात का नाही.  यावर प्रशासन, राजकीय आणि सरकार पातळीवर कोणतीही हालचाल नाही.  हीच उदासिनता गोष्ट काजू, फणस, कोकम या कोंकणच्या रानमेव्या बाबतीत आहे. 
खाजगी तत्वावर कोंकणात फणस, काजू, कोकम इ प्रोसेसिंग प्रकल्प अनेक ठिकाणी आहेत पण त्यांना कोणतीच शासकीय मदत नाही.
कोंकण मसालावर्गीय वनस्पतींसाठी खुप प्रसिद्ध आहे.  काळीमिरी, दालचिनी, तमालपत्र इ मसाल्यांचे खुप उच्च दर्जाचे चांगले उत्पादन होते कोकणात. 
कोकणात पुर्वी झाडांना लागलेले आंबे, फणस, कोकम, जांबुळ इ फळे बहुतांशी तसेच पडून जायचे, सडून जायचे.   पण आता त्या पैकी बरीचशी फळे मार्केटिंग द्वारे संपूर्ण देशभरातील बाजारपेठेत जाताहेत, परदेशात देखील जाताहेत   हा एक प्रकारचा विकासच आहे.  घरोघरी लोक आता याचे सिझनल व्यवसाय करतात.  कित्तेक कुटुंब तर फक्त आंब्याचा चारच महिन्याचा व्यवसाय करून वर्षभराची बेगमी करतात. 
भात शेती तर कोंकणात खुप ठिकाणी होते पण दुबार भात लावणी सुद्धा अनेक ठिकाणी होते.  नारळ, सुपारी तर कल्पवृक्षच आहेत.  त्या अनुशंघाने अनेक पुरक व्यवसाय खाजगी लेवलवर वर्षभर चालतातच पण सरकार व प्रशासन लेवलवर प्रयत्न, प्रयोग शून्य   😔
कोकणाची उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर आहे पण पुर्व पश्चिम रूंदी फक्त 30-40 किलोमीटरच आहे.  आणखीन या रूंदीला छेदणारा मुंबई-गोवा महामार्ग आणि कोस्टल महामार्ग सुद्धा आहे.  तर पुर्व-पश्चिम अनेक घाट रस्ते जे कोंकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडतात.  त्यामुळे कोंकण जगापासून अलिप्त पडलेय, मागास आहे, जगाशी काहीच संपर्क नाही अश्या ज्या गोष्टी पसरवून कोंकणी लोकांच्यात जो न्युनगंड तयार करण्यात आलाय तो फार चुकीचा आणि धोकादायक आहे. या न्युनगंडामुळेच खुपश्या कोंकणी लोकांच्यात इतर जगाशी एक प्रकारचा दुजाभाव, दुरावा, परकेपणा निर्माण झालाय.
आता तर अनेक वाड्या दुर्गम वस्त्यांवर देखील रस्ते पोहोचलेत, लाईटस्, मोबाइल सर्वत्र येताहेत त्यामुळे कोंकणातील लोकांनी स्वतःला एकटे समजू नये.  दोन-तीन तासात तुम्ही घाटावरील मोठ्या शहरात पोहचू शकता तर मुंबई प्रवास तर खुप सहज आणि सुटसुटीत झालाय. 
कोंकण जरी जन्मभुमी असली तरी मुंबई - पुणे अनेक कोंकणी लोकांची कर्मभुमी आहे.  परंतू खुप लोकांची जन्म आणि कर्म भुमी दोन्ही कोंकणच आहे. 
संपुर्ण कोंकण किनाऱ्यावरील लाखों-लाख लोक मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय करतात.  लहान लहान होड्यांमधून दररोज मासेमारी करने आणि ते विकने हा त्यांचा रोजगारच आहे.
जगभर कोठेही जा जे मेट्रोपॉलिटन शहरे असतात तेथेच रोजगार आणि व्यवसायाच्या संधी अधिक असतात.  अश्या शहरातच आसपासच्या लहान लहान गावातील लोक रोजगार, व्यवसाय इ इ साठी जात असतात.  त्यामुळेच शहरे ही मोठमोठी होतच असतात म्हणून प्रत्येक लहान लहान गावा गावांत प्रचंड मोठे प्रकल्प कोठेच उभारले जात नाहीत किंबहुना ते अशक्यच आणि अतार्किक असते. 
छोट्या जागेतून मोठ्या जागेत स्थलांतर सगळेच करतात हा जगाचा नियम आहे.  वाड्या वस्त्यांतील लोक खेड्यात, खेड्यातील लोक गावात, गावातील लोक तालुक्याच्या जागी, तालुक्यातील लोक जिल्ह्यात, जिल्ह्यातील लोक मोठ्या शहरात, मोठ्या शहरातील लोक परप्रांतात वा परदेशात असे स्थलांतर करतच असतात.  यात कमीपणा, न्युनगंड असण्याचे काहीच कारण नाही.

याचे साधे उदाहरण म्हणजे लहान लहान वाड्या वस्त्यांवर अंगणवाडी ते चौथी पर्यंत शाळा असतात.  नंतर या मुलांना पुढे शिकायला थोड्या मोठ्या गावात जेथे पाचवी ते दहावी पर्यंत शाळा असते तेथे जावे लागते.  अकरावी-बारावी साठी वा इतर पुढील शिक्षणासाठी मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.  पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी जवळच्या शहरात जावे लागते.  उच्च शिक्षणासाठी, इंजीनियरिंग, डाॅक्टर होण्यासाठी मोठ्या शहरात जावे लागते.  हा प्रकार सर्वत्र असतो.  प्रत्येकाला त्याच्या गावातच शेवट पर्यंत शिक्षण घ्यायला नक्कीच आवडेल पण म्हणून प्रत्येक गावागावात इंजीनियरिंग, मेडिकल इ शैक्षणिक संस्था काढायचा अट्टहास करणे कसे तर्क शुद्ध आहे किंबहुना ते अशक्यच आहे.  त्याच प्रमाणे प्रत्येकाला आपल्याच गावात उच्च रोजगार मिळावा म्हणून मोठ मोठ प्रकल्प तेथे उभारणे कसे शक्य आहे.
मोठमोठ्या कारखान्यातच काम करायला जाणे म्हणजे रोजगार हे न पटणारे तार्किक आहे.

कोंकण किनाऱ्यावरील लोकांना समुद्र पर्यटन, मासेमारी, आधुनिक मत्स्य शेती, कोळंबी शेती इ इ सागरीय महासागरा एवढे रोजगार आहेत, व्यवसाय आहेत.
मुंबई-गोवा महामार्गामुळे लगतच्या जवळपास सर्वच गावातील लोकांना अनेक व्यवसाय, रोजगार निर्माण झाले आहेत. 
पश्चिम घाटालगतच्या निसर्ग रम्य कोंकणात किंबहुना संपुर्ण कोंकणात निसर्ग पर्यटन, काजू, आंबा, फणस, नारळ, सुपारी इ इ मुळे रोजगार आणि व्यवसाय निर्मिति झालेली आहे. 
परंतू शासकीय, राजकीय उदासीनते मुळे कोंकणी रानमेव्यावर अवलंबित एकही मोठा सरकारी प्रकल्प कोंकणात का उभारला गेला नाही.  ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 
कोंकणात मोठे प्रकल्प नाहीत म्हणून येथे रोजगार नाहीत, व्यापार, व्यवसाय नाहीत असे गेल्या काही दशकात पद्धतशिरपणे बिंबवण्यात आलय.  याला धरूनच एनराॅन, ऑईल रिफायनरी, औष्णिक प्रकल्प, खाणकाम सारखे प्रकल्प कोंकणच्या गळ्यात मारायचा अजेंडा अनेक वर्षे चालू आहे.
एकवेळ हे मान्यही केल आणि प्रकल्प कार्यान्वित झाला तर संपूर्ण कोंकणचा प्रश्न सुटेल काय.  समजा पाच-पन्नास हजार लोकांना रोजगार मिळाला तितक्याच लोकांना व्यापार-व्यवसाय मिळाला तर दोडामार्ग, सावंतवाडी येथील लोकांचा रोजगाराचा, व्यवसायाचा प्रश्न सुटणार आहे का?  कुडाळ, कणकवली, वैभववाडीतील लोकांचे काय ?
या सर्व लोकांनी आपली शेती वाडी सोडून राजापूरला स्थलांतरित व्हायचे काय? का डेली अप-डाउन करायचे ?
रिफायनरी झालेस त्याचे काय दुष्प्रभाव होतील? पर्यावरणाची काय आणखीन किती हानी होईल? जैवविविधतेवर काय वाईट प्रभाव पडेल? लोकांना प्रदुषणामुळे काय परिणाम भोगावे लागतील?  याची जंत्रीच रिफायनरी विरोधकांनी मांडली आहे.  त्यात नक्कीच दुमत नाही.  आता रिफायनरी झालीच समजा तर कच्चामाल म्हणजे क्रुड ऑईल वायु मार्गे वा जमीनीवरून वाहतुक करून तर आणला जाणार नाही, तो येणार समुद्र मार्गेच मोठ-मोठ्या अजस्र जहाजांतून.  आणखीन त्यासाठी या रिफायनरी जवळपासच एक अत्याधुनिक बंदर (पोर्ट) बांधावे लागेल.  याबाबतीत सरकार वा प्रशासन दप्तरी काहीएक उल्लेख नाही आहे.   बारसू नजदीक आंबोळगड हाच भाग बंदर बांधण्यायोग्य ठीकाण आहे.  आता बंदर बांधनार म्हणजे तेथील मच्छीमार लोकांना विस्थापित व्हावे लागणार.  क्रुड ऑईल किनाऱ्यावर पसरून तेथील समुद्रीय जैव विविधता संपुष्टात येणार.  बंदराच्या दोन्ही बाजूस जवळपास वीस ते तीस किलोमीटर समुद्र किनाऱ्यावर हे संकट येणार आहे.  आधीच महाकाय ट्राॅलर्स मुळे पारंपारिक मच्छीमार लोकांची मासेमारी संकटात पडलीय, त्यात या नवीन धोक्याची भर. 
जगभर जेथे जेथे समुद्र किनाऱ्यावर रिफायनरी आहेत तेथे तेथे समुद्र मृतकाय झालेले आहेत.  समुद्रीय मासे, शेवाळ, कोरल, खेकडे, कोळंबी सगळेच नष्ट होते.
वेते बीच, आंबोळगड किनाऱ्यावर तर ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ प्रजातीचे कासव अंडी घालायला येतात दरवर्षी. पहिला फटका या कासवांना बसणार.  इतकेच काय तर अगदी रत्नागिरी पासून देवगड पर्यंतचा सर्व समुद्र किनाऱा नासण्याची शक्यता आहे.   पुर्णगड ते विजयदुर्ग पर्यंतचा समुद्र किनाऱा तर मृतच होणार आहे.
याचा सरळ सरळ फटका शेकडो मच्छीमार बांधवांना होणार आहे.  देवघळी बीच, वेते बीच, आंबोळगड बीच, विजयदुर्ग किल्ला, रामेश्वर बीच येथील पर्यटन व्यवसाय पुर्णपणे उध्वस्त होतील.
कोंकणातील 90% लोक हे पुर्णपणे शेती, शेती पुरक व्यवसाय, मच्छीमारी इत्यादी नैसर्गिक बाबींवर अवलंबून आहेत.  5-10% लोक फक्त रोजगार रोजगार करताहेत.  त्यांच्यासाठी संपुर्ण जग पडलय.  मग 90% लोक ज्यांनी कोंकण राखलय निसर्ग संपन्न ठेवलय त्यांना याची शिक्षा का?
रिफायनरी सारख्या प्रकल्प समर्थकांनी काय रोजगार, रोजगार आणि व्यवसाय, व्यापार चा घोषा लावलाय? ज्या मुंबई-पुणेचा ते हवाला देतात तेथे सगळ्यांना रोजगार, व्यवसाय, व्यापार आहे का ? तेथे सगळे आलवेल आहे का? तेथे बेरोजगार, कर्जबाजारी लोक रोज आत्महत्या करताहेत.  रोजच्या धकाधकीक्या धावपळी मुळे लाखो लोक डिप्रेशन मधे आहेत, त्यांना फ्रस्ट्रेशनयेत आहे.  चोरी चपाटी लुटमार, खुन खराबा तर रोजचाच आहे.  दररोज तीन-चार तास लोकल/मेट्रो मधे लटकत जायच, आठ-आठ तास काम करायच आणि काडेपेटी एवढ्या घरात रहायच.  हेच नशीबी आहे तेथील बहुतांश लोकांच्या.  😔
कोंकणात कोणी आत्महत्या केल्याच कधी एकलय का?   लुटमार, चोरी मारी तर खुप लांबची गोष्ट.  एकदम समृद्ध आणि सुखी जीवन जगताहेत कोंकणातील लोक.  ज्यांना ही समृद्धी नको आहे त्यांनी खुशाल निघून जावे त्यांच्या स्वर्गात   कोण अडवलय ? पण असल्या या समृद्ध, विशाल, खुशहाल कोंकणात जर कोणी रिफायनरी सारखे वीष कालवत असेल तर कोंकणी लोक नक्कीच सहन करणार नाहीत. 
निसर्ग संपन्न कोंकण, सातशेसे किलोमीटरचा समुद्र किनाऱा, तेथील नितांत सुंदर बीच, आंबा, काजू, फणस, कोकम, केळी, चिक्कू, मसाल्याच्या वनस्पती, घनदाट जंगल यावर कोंकण सुजलाम सुफलाम बनलाय.  काही युट्युबरसनी कोंकणचा हा ठेवा जगभर न्हेलाय, त्यात त्यांची सुद्धा प्रगतीच झालीय.  त्यापैकी बहुतांश युट्युबर या मामल्यात गप्प आहेत वा गप्प बसवले गेलेत.
पण आता मी रिफायनरी समर्थकही नाही, विरोधकही नाही, मी रिफायनरीत काम केलय, माझ्यावर काहीच दुष्परिणाम झालेले नाहीत,  असे बोलने, कोंकणात येत असलेल्या विनाशकारी प्रकल्पाबद्दल चुप्पी साधने म्हणजे 'जिस थाली मे खाया उसी मे छेद किया" असे आहे.  रिफायनरी मुळे दहा बारा वर्षे तरी काही दुष्परिणाम होणार नाहीत. रोजगारासाठी, आलिशान राहणीमानासाठी येवढ सहन करायला नको का? असा दृष्टिकोण बाळगने म्हणजे "आपण मेलो जग बुडाल " अशी आत्मकेंद्री घातकी वृत्ती आहे.
सोशल मीडिया आज सगळ्यात जास्त भक्कम भूमिका यात निभावू शकते.  पण ज्या गोष्टीमुळे आपण मोठे झालो ती गोष्ट उध्वस्त होत असताना हे गप्प कसे राहू शकतात? 
कोंकणात मोठ मोठ्या प्रकल्पांची गरजच नाही.  तेथे आवश्यकता आहे अलीबाग पासून दोडामार्ग पर्यंत सातशेपेक्षा जास्त लहान लहान पर्यावरण पुरक प्रकल्पांची, अत्याधुनिक शेती शिक्षणाची, हास्पिटलसची, शैक्षणिक संस्थांची, फळ प्रक्रिया प्रकल्पांची, सागरी अभयारण्यांची, पर्यटन स्थळ विकासाची, अक्वेटोरीयमची, मत्स्य संवर्धन प्रकल्पांची  !!!

फारूक म्हेतर 
वन्यजीव अभ्यासक कोल्हापूर

Comments

Popular posts from this blog

महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways

कारवी' एक नैसर्गिक चमत्कार

Myristica Swamp