Bioluminescent Mycena (Fungi)
मायसेना क्लोरोफाॅस - Bioluminescent Mycena (Fungi)
वानोशीला रमण, प्रशांत आणि मी पहिली भेट दिली त्याला यावर्षी दहा वर्षे पुर्ण झाली.
तदनंतर अनेकदा तेथे जाणे होतच होते. वानोशी फाॅरेस्ट होम स्टे सुरूवात करून आठ वर्ष झाली. गेल्या आठ-दहा वर्षात वानोशी फाॅरेस्ट होम स्टे एक खुप चांगले असे होम स्टे म्हणून वन्यजीव अभ्यासक, निसर्गप्रेमी इ मधे नावारूपास आले आहे.
सन 2016 ला राॅयल बटरफ्लाई गार्डन या नावाने तेथे फुलपाखरांच उद्यान बनवण्यास चालू केले. ज्यात आम्ही दरवर्षी फुलपाखरांना उपयुक्त अश्या नवनवीन वनस्पतींची भर घालतच असतो.
सुरवातीस ज्या काही वनस्पती लावल्या होत्या त्यातील काही अतिरिक्त वाढून त्रासदायक ठरत होत्या. म्हणून या वर्षी राॅयल बटरफ्लाई गार्डन मधील या वनस्पती काढून तेथे पुन्हा नवीन व विषेशतः स्थानीय खाद्य वनस्पतींची लागवड करायची असे ठरविले होते. त्यानुसार 23 जून रोजी संध्याकाळी तेथे दाखिल झालो. सामान सुमान जागेवर लावून सिटिंग येरीयात स्थानापन्न झालो. थोडक्यात 'सुशेगात' चालू होते.
प्रवीण आणि शितल बाहेर गेले होते. ते परत आले तेव्हा अंधार पडत होता. आल्या बरोबर शितल म्हणाली 'सर तुम्हास आज एक सरप्राइज देणार आहे' मी म्हटल मलाबार ग्लाइडिंग फ्राॅग काय? तर म्हणाली 'नाही थोडा अंधार अजून पडू दे मग जाऊ या'. आठ वाजता आम्ही बाहेर पडलो. रिमझिम पाऊस पडत होता. होम स्टे जवळच एका बांबूच्या बेटा जवळ शितल आम्हास घेऊन गेली. सोबत दोन तीन टूरिस्ट पण होते. तेथे गेल्यावर शितल ने एका बांबूच्या बुडावर टाॅर्च मारून म्हणाली 'सर हे बघा काय आहे इथे' तर तेथे दोन-तीन बुरशीच्या छत्र्या म्हणजेच अळींबी होत्या. आकाराने अर्धा इंच, पांढुरक्या रंगाची ही बुरशी सर्वसाधारण अळींबी सारखीच दिसत होती. तसे बोललो देखील तर शितल म्हणाली 'सर्वांनी आपापल्या मोबाइल चे टाॅर्च बंद करा' सर्वजण टाॅर्च बंद करून स्तब्ध झाले 'आता मी पण टाॅर्च बंद करते' असे बोलून शितलने देखील तिचा टाॅर्च बंद केला आणि काय आश्चर्य ती साधारण दिसणारी बुरशीची छत्री लगेचच रेडियम प्रमाणे चमकु लागली. ते बघून मी अवाकच झालो. सोबत आलेल्यांनी कॅमेरा एडजस्ट करून फोटोसेशन केले. मी पण मोबाइल वर अयशस्वी प्रयत्न केला. शीतल बोलू लागली 'ही बायोल्युमिनसन्स फंगी अर्थात चमकणारी अळींबी आहे'
या पुर्वी मी चमकणारी बुरशी आंबोली, आंबा, तळकट वन उद्यान येथील घनदाट जंगलात पाहिली होती. पण तेथील बुरशी ने झाडांचे अखंड खोडच चमकत असे. ते ही गुप्प-गडद अंधारात खुप वेळ थांबल्या नंतर डोळे फाडून बघितल्यावरच! ती बुरशी वेगळ्याच प्रजातीची आहे असे शीतल बोलली आणखीन ते सरळ सरळ दिसतच होते.
'मायसेना क्लोरोफाॅस' असे या अळींबीचे नाव आहे. भारतात फक्त केरळ, महाराष्ट्र आणि गोवा येथे या प्रजातींचे अस्तित्व आढळून आले आहे. जगभरात दक्षिण अमेरिका, आशिया आणि आस्ट्रेलिया येथे याची नोंद आहे. 'चमकणार्या बुरशीची ही दुर्मिळ प्रजात आहे' शीतल तोंड भरून बोलत होती.
समुद्राच्या खार्या पाण्यात वाढणार्या भाताच्या प्रजातीं वर डाॅक्टरेट करत असलेली शीतल वानोशी फाॅरेस्ट होम स्टे चा ओनर असलेल्या प्रवीणची अर्धांगिनी आहे. अळींबी हा तिचा आवडीचा विषय आहे वेळ मिळेल तेव्हा ती अळींबीच्या शोधात भटकत असते. भविष्यात ती नक्कीच एक अळींबी विशेषज्ञ म्हणून नावारूपास येईल.
आजपर्यंत Bioluminescent Mycena च्या दोनच प्रजाति भारतात आढळल्या आहेत.
पैकी Mycena deeptha जी फक्त केरळ मधे आढळते दुसरी मायसेना क्लोरोफॉस.
ही अळींबी दिवसा सौरऊर्जा शोषून घेते आणि चित्रात पाहिल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी फिकट हिरवा प्रकाश तयार करते. मायसेना क्लोरोफॉसचे जे भुछत्र आपल्यास दिसते ते या बुरशीचे बीजाणूधानी (fruiting body) असते तर मुख्य भाग (vegetative body) हा कुजलेल्या लाकडात वाढत असतो.
या अळींबीच्या भुछत्रीचे (fruiting body) आयुष्य फक्त एक ते दोन दिवसच असते, दर दिवशी नवनवीन भुछत्र उगवतात.
हा ल्युमिनेसेन्स प्रकाश काही किटकांना आकर्षित करतो जे यातील बीजाणूंचा प्रसार करतात. हा प्रकाश बीजाणू पसरवण्यासाठी सकारात्मक फोटोटॅक्सिस कीटकांना आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
सन 2022 मध्ये पहिल्यांदा ही वानोशीच्या परिसरात दिसून आली. त्यानंतर सलग दोन वर्षे ती दिसत आहे. भरपूर पाऊस असने या अळींबी साठी खुप गरजेचा आहे. त्यामुळे जून पासून सप्टेंबर पर्यत ही आढळून आली आहे. जर या दरम्यान पावसाने खुप दिवस ओढ दिल्यास ही अळींबी फुलांवर (फळावर) येत नाही. ही गोष्ट या अळींबीचे दर्शन घेण्यास उत्सुक असलेल्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment