Orchid
ऑर्कीडस वाचवा
ऑर्कीडस
वनस्पती जगतातील सर्वात प्रगत, उत्क्रांत वनस्पती प्रजाती म्हणजे ऑर्कीडस !!!
या एकदलीय सपुष्प वनस्पती जगभरात फक्त अंटार्कटिक खंड सोडून सगळीकडेच सर्व खंडात आढळतात. परंतू आर्द्र आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात या अधिक जास्त संखेत आढळून येतात.
ऑर्कीडस् ची विभागनी तीन प्रकारात केली आहे.
1 इपिफाईटीक ऑर्कीडस
2 टेरेस्ट्रियल ऑर्कीडस
3 मायकोहेटेरोट्राॅफीक ऑर्कीडस
इपिफाईटीक ऑर्कीडस इतर वृक्षांवर वाढतात तर काही दगडांवर देखील वाढतात.
टेरेस्ट्रियल ऑर्कीडस जमीनीवर वाढतात.
मायकोहेटेरोट्राॅफीक ऑर्कीडस हे व्हॅस्कुलर वनस्पतींच्या मुळांवर वाढणाऱ्या बुरशी पासून आपले अन्न मिळवतात.
बहुतांश ऑर्कीडस हे भुपृष्ठीय, लिथोफायटीक आणि इपिफाईटस् आहेत.
ऑर्कीडस हे लहान झुडप वर्गीय असून काही वेलींप्रमाणे वाढतात. इपिफाईटीक ऑर्कीडस इतर वृक्षांवर वाढतात. त्यांना मांसल जाड मुळे असतात, या मुळावरील स्पंजा सारखे आवरण (Velamen) हवेतून आर्द्रता शोषून घेते. ऑर्कीडस इतर वृक्षांवर फक्त आधारा करीता अवलंबून असतात, त्यांचे अन्न ते स्वतःच तयार करतात.
जगभरात ऑर्कीडसच्या जवळपास 25000 प्रजाती आहेत काही प्रजाती तर अगदी आर्कटिक प्रदेशात आणखीन वाळवंटात सुद्धा आढळल्या आहेत. समुद्र सपाटीपासून ते 15000 फुट उंची वर देखील ऑर्कीडस वाढतात. काही ऑर्कीडस सावलीत वाढतात तर काहींना भरपूर सुर्य प्रकाश लागतो.
ऑर्कीडस ची फुले विविध आकाराची आणखीन सुवासिक पण असतात. परंतू सर्व ऑर्कीडसच्या फुलांचे एक वैशिष्ट्य असते ते म्हणजे ती bilaterally symmetrical असतात
ऑर्कीडसच्या प्रत्येक फुलाला 3 Petals, 3 Sepals and 1 Column असते .
सर्वात खालची पाकळी ही मोठी आणि आकर्षक रंगाची असते, ती मुख्यतः परागीभवनासाठी किटकांना आकर्षित करण्याचे कार्य करते.
ऑर्कीडस चे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक ऑर्कीडस किटकांना आकर्षित करण्यासाठी मिमिक्री चा वापर करतात, या ऑर्कीडस ची सर्वात खालची पाकळी फुलपाखरू, भुंगा इ प्रमाणे दिसते.
ऑर्कीडस किटकांना आकर्षित करण्यासाठी विविध वासांचा देखील वापर करतात. अगदी कुजलेले मटण, व्हेनीला, मध, दालचीनी इ इ.
ऑर्कीडसच्या बिया खुप लहान आणि शुष्क असतात. या बीजांचा प्रसार वार्यामार्फत होतो.
ऑर्कीडसनी मानवाला अनादि काळापासून भुरळ घातलीय
यांचा वापर औषधीय गुणधर्म असल्यामुळे खुप वर्षांपासून औषधात होतोय.
शोभिवंत म्हणुन ऑर्कीडस ची रोपे अनेक जण आपल्या बागेत लावतात. इनडोर आणि आउटडोर ऑर्कीडसच्या अनेक हाइब्रिड व्हरायटीज आज उपलब्ध आहेत.
भारतात तब्बल 1250 प्रजातींचे ऑर्कीडस आढळून येतात पैकी जवळपास 390 प्रजाती प्रदेशानिष्ठ (endemic) आहेत, पैकी 125 प्रजाती फक्त पश्चिम घाट प्रदेशानिष्ठ आहेत.
या 1250 पैकी जवळपास 750 प्रजाती इपिफाईटीक आहेत ज्या उंच झाडांवर वाढतात.
ऑर्कीडस उंच आणखीन मोठा बुंधा असलेली झाडांवर जास्त करून लवकर वाढतात.
सद्या सगळीकडेच रस्ता रूंदीकरण, नवीन घाट रस्ते, रस्त्यांचे दुपदरीकरण, चौपदरीकरण अशी कामे खुप जोरदार पणे महाराष्ट्रभर चालू आहेत.
कोल्हापूर जिल्ह्या आणि कोंकणात जवळपास सर्वच मोठ्या रस्तांचे रूंदीकरण सुरू आहे वा प्रस्तावित आहेत.
पुणे-बेंगलोर हायवे, संकेश्वर-आंबोली रोड, कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-रत्नागिरी रोड येथे सद्या रूंदीकरणाचे काम चालू आहेत. या रस्तांच्या दुतर्फा अनेक मोठी झाडे आहेत जी एकतर कापली जात आहेत वा लवकरच कापली जातील.
या वृक्षांवर अनेक ऑर्कीडस आहेत जी वृक्षांच्या कटाई नंतर नष्ट होत आहेत. शेकडो वर्षांचा हा ठेवा क्षणात नष्ट होत आहे. या रस्त्यांकडील झाडां व्यतिरीक्त अशी ऑर्कीडस असलेले वृक्ष जिल्ह्यात इतरत्र फार कमी आहेत.
या ऑर्कीडस मधे मुख्यतः Aerides crispa, Rhynchostylis retusa, Aerides maculasa या ऑर्कीडसचा समावेश आहे.
या रस्त्यांच्या कामांमुळे बाधित होणाऱ्या अनेक ऑर्कीडस मधे खालील 14 प्रमुख प्रजातींच्या ऑर्कीडसचा समावेश आहे.
1 - Aerides crispa - द्रौपदी पुष्प - Vulnerable - Endemic to Western Ghats
2 - Rhynchostylis retusa - सीतेची वेणी
3 - Aerides maculasa - गुलाबी द्रौपदी पुष्प - Endangered - Endemic to Peninsular India
4 - Porpax reticulata - ग्रामोफोन आमरी
5 - Smithsonia maculata - फोंडाघाट आमरी - Endangered - Endemic to Western Ghats
6 - Dendrobium microbulbon - लघुकंद - Endangered - Endemic to Western Ghats
7 - Dendrobium ovatum - हरित आभा - Endangered - Endemic to Western Ghats
8 - Dendrobium herbaceum - शरद आमरी - Endemic to Western Ghats
9 Smithsonia viridiflora - हरीकांता - Endangered and Endemic to Western Ghats
10 - Porpax jerdoniana - फुलपाखरू - Endemic to Western Ghats
11 - Acampe praemorsa - वाघरी
12 - Habenaria crinifera - बाहुली हुबेआमरी
13 - Conchidium filiforme - फिका शिंपला - Near Threaten - Endemic to Western Ghats
14 - Conchidium microchilos - तारा - Vulnerable - Endemic to Peninsular India
या ऑर्कीडसच्या पानांवर वर ऑर्कीड-टीट या सुंदर फुलपाखरांच्या अळ्या आपला जीवनक्रम पुर्ण करतात.
अशी ही वैशिष्ट्यपुर्ण, प्रगत, दुर्मिळ ऑर्कीडस नष्ट होण्यापासून रोखणे आवश्यक आहे.
तुम्ही कामा निमित्त वा फिरायला जर या रस्त्यांवरून जात असाल आणि जेव्हा जेव्हा तुम्हास अशी तोड झालेली झाडे आढळतील, तेव्हा तेव्हा कृपा करून आपली गाडी जरा बाजूला थांबवून या तुटलेल्या झाडांचे निरीक्षण करा. जर तेथे तुम्हास ऑर्कीडस जमीनीवर पडलेल्या झाडांच्या फांद्यावर आढळून आली तर काळजीपुर्वक ती काढून घ्या. आणि शक्य तेवढी तुमच्या गाडीत घालून आणा.
ही आणलेली ऑर्किडस तुम्ही तुमच्या घरांतील वा गल्लीतील मोठ्या वृक्षांवर काथ्या वा सुतळी वापरून उंचावर लावू शकता अथवा जर तुमचे वा मित्रांचे शेत किंवा फार्म हाउस असेल तर तेथील वृक्षांवर नक्कीच लावू शकता. ऑर्कीडसना पाणी घालावे लागत नाही तसेच फारशी देखभाल सुद्धा करावी लागत नाही. ऑर्कीडस स्वतःच हवेतील आर्द्रता शोषून घेतात व पानांद्वारे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. त्यांच्यामुळे तुमच्या वृक्षांना कोणताही धोका नाही. ऑर्कीडस परजीवी बांडगुळ नाहीत. फक्त आधारा साठी ते वृक्षांचा सहारा घेतात. अशी वृक्षांवर योग्य उंचीवर पुनर्रोपण केलेली ऑर्कीडस् हमखास जगतात. त्यांना नवीन मुळे फुटतात आणि त्यांना लवकरच खुप सुंदर फुले सुद्धा येतात. काथ्या वा सुतळी वर्षभरातच कुजून जाते आणि ऑर्कीडस स्वयंपुर्ण होतात. फक्त लावते वेळी शक्यतो खडबडीत खोड असलेले वृक्ष निवडावेत अगदीच गुळगुळीत खोड (उदा पेरू) असलेल्या वृक्षांवर ही ऑर्कीडस फारशी जगणार नाहीत.
जर तुम्हास शेतांवर वा फार्म हाउस वर जायला वेळ लागणार असेल तर काही चिंता नको. ही काढून आणलेली ऑर्कीडस योग्य ठिकाणी ठेवल्यास बरेच दिवस टिकतात.
ही ऑर्कीडस तुम्ही जवळपासच्या उद्यान, बागेत वा वनीकरण केलेल्या वृक्षांवर पण लावू शकता फक्त स्थानीय प्रशासनाला त्याची कल्पना द्यावी. जर स्थानीय प्रशासन यात सहभागी झाले तर फारच चांगली गोष्ट आहे.
वनविभागाने यात पुढाकार घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील एखाद्या ठिकाणी ऑर्कीडस गार्डन Orchidarium उभे करावे.
कृपाकरून उगाचच कोणत्याही झाडांवरून ऑर्कीडस तोडून आणू नका, मिळालेल्या माहितीचा दुरूपयोग करू नका ही नम्र विनंती. भारतीय वन्यजीव कायद्यानुसार बहुतांश ऑर्कीडस के संरक्षित आहेत.
Habenaria crinifera Doll orchid
बाहुली हुबेआमरी -
खरंतर ही हॅबनेरीया या टेरेस्ट्रियल म्हणजेच जमीनीवर वाढणाऱ्या ऑर्कीडस मधील एक दुर्मिळ प्रजात आहे. परंतू ही एकमात्र अशी प्रजात आहे जी वृक्षांच्या खोडावरील माॅस, शेवाळ मधे वाढते. म्हणजेच ही इपिफाईटीक ऑर्कीडस आहेत. या ऑर्कीडसना ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात पांढर्या रंगाची बाहुली सारखी दिसणारी फुले येतात. जेव्हा वारा सुटतो तेव्हा वार्यावर डोलणार्या या शेकडो बाहुल्या खुप चित्ताकर्षक दिसतात.
फक्त पश्चिम घाट आणि श्रीलंका येथील सदाहरित जंगलात ही ऑर्कीडस आढळतात. कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यांवर मलकापूर ते आंबा या 15 किलोमीटरच्या रस्त्यावर दुतर्फा असलेल्या काही मोजक्याच मोठ्या वृक्षांच्या खोडावर या ऑर्कीडसच्या वसाहती आहेत आणि दुर्दैवाने ही सर्व झाडे रूंदीकरण मधे तुटणार आहेत. या ऑर्कीडसना वाढण्यासाठी जी झाडे लागतात, ती खुप मोठी असावी लागतात आणि त्यांच्या खोडावर शेवाळ, गवत इतर लहान झुडप उगवून एक climatic climax (म्हणजे परीसंस्थेचा परमोच्च बिंदू - परिपूर्ण ) परीसंस्था बनलेली असावी लागते. त्यामुळे ही ऑर्कीडस उपटून इतरत्र लावल्यास मरण्याची शक्यताच जास्त आहे. त्यांचे पुनर्रोपण करणे फार कठीण काम आहे. त्यासाठी अश्या ऑर्कीडसच्या वसाहती असलेले वृक्ष मुळासकट काढून इतरत्र त्यांची लागवड हा एकमेव पर्याय आहे.
कोल्हापूर- रत्नागिरी रस्ता रूंदीकरण मधे शेकडो वृक्ष तुटणार आहेत त्यापैकी या काही महत्त्वपूर्ण वृक्षांचे पुनर्रोपण करने नक्कीच शक्य आहे. यासाठी आवश्यक तो सनदशीर मार्ग अवलंबावा लागेल. प्रसंगी आंदोलन सुद्धा करावे लागेल. पण ही झाडे नक्की वाचवावीच लागतील.
कोल्हापुरात सद्या जे रस्ते रूंदीकरण होत आहेत त्या व्यतिरीक्त इतरत्र जर कोठेही रस्ता रूंदीकरणा करिता वृक्ष कटाई होत असेल. तर त्याबाबतीत नक्की कळवा यासाठी फेसबुक, व्हाटस्अप, इन्टा इत्यादी सोशल मीडियावर पोस्ट करा वा तुमच्या ओळखीच्या निसर्गप्रेमींना जरूर कळवा.
कोल्हापुरातील निसर्ग प्रेमी, संस्था, शाळा, काॅलेज इ इ जर हे ऑर्कीडस वाचवण्याचे कार्य करण्यात इच्छुक असतील तर त्यांनी नक्कीच यात पुढाकार घ्यावा. आणखीन हा निसर्गाचा अनमोल ठेवा जपण्यास हातभार लावावा. त्यांना योग्य ते मार्गदर्शन मी नक्कीच करीन !!!
गेली अनेक वर्ष हे कार्य मी, कोल्हापूरचे ऑनररी वाईल्डलाईफ वाॅर्डन आणि वन्यजीव अभ्यासक रमण कुलकर्णी आणि अराईज या संस्थेचे पदाधीकारी प्रवीण देसाई, शीतल जाधव-देसाई आणि माझे मित्र करत आहोत. कोकणातील आमच्या मित्राच्या फार्म हाउस मधील वृक्षांवर आम्ही अशी पडलेली ऑर्कीडस गेली बरीच वर्षे लावतोय आणि त्यापैकी जवळपास 70-80 टक्के ऑर्कीडस जगलेली आहेत. काहींना तर फुले सुद्धा येत आहेत.
रस्ते हे होणारच, त्यांना आपण रोखु शकत नाही. वृक्षांबाबत दुखः नक्कीच वाटतय परंतू आपण हतबल आहोत. फक्त हळहळण्या पलीकडे फारसे काही करू शकत नाही.
परंतू या वृक्षांवरील अमुल्य अशी ऑर्कीडस आपण नक्कीच वाचवू शकतो, त्यांना जीवनदान देऊ शकतो.
ऑर्कीडस हे एका परिपूर्ण आणि चांगल्या आरोग्यदाई परीसंस्थेचे लक्षण आहे. झपाट्याने कमी होत असलेले जंगल, अवैध वृक्ष कटाई, प्रदुषण इ कारणांमुळे जगभरात ऑर्कीडस वर आधीच खुप मोठे संकट आले आहे, अनेक ऑर्कीडस दुर्मिळ, संकटग्रस्त झाले आहेत अनेक ऑर्कीडस नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अश्या ऑर्कीडसचे संरक्षण आणि संवर्धन होणे फार गरजेचे आहे.
ऑर्कीडस झाडांवर लावण्यासाठी फक्त सुतळी वा काथ्याचा वापर करा, ऑर्कीडसच्या मुळांखाली माॅस, नारळाच्या शेंड्या वा तत्सम वस्तु वापरू नका कारण त्या वस्तु कुजतात व ऑर्कीडस् मरू शकतात. ऑर्कीडस् ना कालांतराने स्वतःची मुळे फुटतात जी वृक्षांना घट्ट पकडतात.
चला तर मग शामिल व्हा या ऑर्कीडस वाचवा मोहीमेत - तुम्ही स्वतः, मित्र, संस्था, शाळा, काॅलेज इ मार्फत.
मग आपणही आपल्या नावा मागे वसुरक्षक, वसुंधरा मित्र, निसर्ग मित्र इ इ बिरूद अभिमानाने लावूया.
आपला विनीत
फारूक म्हेतर
फुलपाखरू, पक्षी, वन्यजीव अभ्यासक, कोल्हापूर
9028816060
farukarise@gmail.com
Comments
Post a Comment