Firefly काजवा
काजवे पृथ्वीवर अनादि काळापासून आहेत मानवाच्या उत्क्रांती आधीपासून ! गेली काही वर्षांपासून पावसाळा जसा जवळ येईल तसा काजवा हा किटक एकदम प्रकाशात येतो. सर्व प्रसार माध्यमे रकानेच्या रकाने भरून बातम्या देतात त्यात भर म्हणून टीव्ही सोशल मिडिया यांच्या माहिती ने ओसंडून वाहन लागतात. जेथे जेथे काजवे असंख्य प्रमाणावर दिसतात तेथे निसर्गप्रेमींची पाऊले आपोआपच पडू लागतात. या अनुशंघाने काही संस्थांनी काजवा महोत्सव आयोजित करायला सुरुवात केली.
मे महिन्याच्या सुरवातीस काजव्यांना मिलनाचे वेध लागतात, हजारो लाखोंच्या संखेने काजवे बाहेर पडतात आणि लुक लुकू लागतात. जस जसा मे महिना पुढे जाऊ लागतो तसा यांच्या संखेत भर पडू लागते. रात्र पडू लागताच यांचा एक प्रकारे डान्सच सुरू होतो, एकाच वेळेस लाखो काजवे चमकू लागतात. त्याच्या चमकण्यात एकसुत्रता लयबद्धता असते आणि असे वाटू लागते की झाडेच चमकताहेत. जंगलात आकाशगंगा अवतरित झाली आहे फार विहंगम दृश्य असते हे!काजवे शक्यतो दाट जंगलातील दमट जागा किंवा नदी नाले ओढे यांच्या कडेला असलेल्या वृक्ष वेलींवर जमतात आणि आपला मिलन डान्स करतात.
अगदी दहा पंधरा वर्ष पुर्वी पर्यंत काजवे अगदी शहरा जवळील झाडी झुडपांवर पण आढळत. जसजशी शहरे वाढू लागली तशी झाडी संपत गेली, काजवे तसेच इतर अनेक जीवांचा आसराच नष्ट झाला. आता काजवे शहरांपासून दुर होत गेले, वर्षे सरत गेली शहरांबरोबरच खेडी सुद्धा प्रगतिशील होत गेली, जंगले झाडी झुडपे नष्ट होत गेली काजवे व इतर जीव आणखीन आत आत जंगलात जाऊ लागले.
जस जसे माणसाचे राहणीमान बदलत गेले तस तसे शेती ची पद्धत बदलली, शेती अगदी जंगलाला भीडली. किटकनाशक, तणनाशक, रासायनिक खते यांचा बेसुमार भडीमार सुरू झाला, भरीस भर म्हणून साखर कारखाने, शहरातील औद्योगिक वसाहतीतील कारखाने यांचे प्रदुषण हवेत पाण्यात मोठे बदल करत गेले. जमीन बर्याच जीवांसाठी विषारी बनली, हवा प्रदुषित होऊन अॅसिड रेन पडत आहे त्यामुळे पुन्हा जमीन नदी नाले विषारी बनत आहेत. हजारोंच्या संखेत मासे मरत आहेत. या सर्वांमुळे काजव्या सारख्या संवेदनशील जीवांवर विपरीत असर होत आहे.
हे सर्व बदल घडत असुनही काजवे आपले अस्तित्व टिकवून होते परंतु जेव्हा पासून एलइडी लाइट्स चा वापर सुरू झाला तेव्हा मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि हाच बदल काजव्यांना खरा मारक ठरला. खेडोपाडी एलइडी लाइट्स लागल्या, अति दुर्गम वाड्या वस्त्यांवर देखील या लाइट्स लागल्या तेथील रस्तांवर देखील लाइट्स लागल्या, घरांतील लाइट्स साधारणत रात्री उशीरा बंद होतात परंतू रस्तांवरील लाइट्स मात्र रात्रभर चालू असतात. एलईडी लाइट्स प्रखर आणि directional व polarised असतात. एलइडी लाइट्स चा हा प्रकाश काजव्यांना विचलित करतो आणि याचाच फार मोठा विपरीत परिणाम काजव्यांवर झाला.
पुर्वी शहराबाहेर थोडे अंतर गेले तरी अंधकार असायचा, आता अगदी दुर्गम आणि दूरवर घाटात गेले तरी पुर्ण अंधार असलेली जागा सापडणे मुश्किल झाले आहे. या बाबतीत आकाश निरिक्षण करणारे पण आपले मत मांडू शकतील. त्यांना सुद्धा आकाश निरिक्षणाकरिता अति दुर्गम भागात जावे लागतय.
या सर्वांचा परिणाम काजव्यांवर झाला, ते दुर्गम अति दुर्गम भागात विस्थापित होत गेले आणि काजवा महोत्सव करणारे नेहमीच अश्या दुर्गम जागांच्या शोधात असतात. आणि पर्यटकांना या संवेदनशील जागी घेऊन जाण्याचा अट्टहास आटापीटा करत असतात.
काजवा महोत्सव करण्यात आता जन जागरण, अभ्यास कमी व पैसा, प्रसिद्धी अधिक महत्वपूर्ण बनली.
आणि हेच काजव्यांच्या मुळावर उठले, पर्यटनाबरोबरच काजवा महोत्सव मधे गोंगाट, प्रखर टाॅर्च लाइट्स, प्रखर हेडलाइटस् असलेल्या बेसुमार गाड्या, कर्कश संगीत, कराओके, डान्स पार्ट्या, कवी संमेलने, कथाकथन, कॅम्प फायर, जेवणावळी इ इ नानाविध प्रकार आणखीनच भयंकर होत गेले आणि बिचारे काजवे आकसतच गेले.
नेमका हा काळ काजव्यांच्या मिलनाचा काळ असल्यामुळे त्यांची संख्या वर्ष दर वर्ष झपाट्याने कमी होत गेली याचा या महोत्सव आयोजकांना ना खेद ना खंत. प्रयत्न फक्त जास्तीत जास्त पर्यटक कसे गोळा होतील यासाठी यांचा अट्टहास. यात पैसा ओघाने आलाच.
जेव्हा हा प्रकार फारच उद्दाम आणि भयानक स्वरूप धारण करू लागला आणि त्याचा विपरीत परिणाम काजव्यांवर होतोय हे काही पर्यावरण व निसर्ग प्रेमींच्या लक्ष्यात आल्यावर त्यांनी या बाबतीत आवाज उठवण्यास सुरवात केली. काजव्यांवर शास्त्रीय अभ्यास करून लेख लिहीले. आणखीन जोरदार जन-जागरण सुरू केले. नेहमी प्रमाणे त्यांना या महोत्सव आयोजकांकडून जोरदार विरोध झाला. त्यांनी महोत्सव समर्थनार्थ लेख लिहवून प्रसिद्ध केले. परंतु सत्य फार काळ लपून राहू शकत नाही. अनेक जण मग या महोत्सव विरोधात समर्थन करू लागले आणि वनविभाग ला यात लक्ष्य घालावे लागले. त्यांनी काही संवेदनशील ठिकाणी बंदी घातली तर काही ठिकाणी कडक नियम व अटी घालून परवाना दिला.
याला प्रतिसाद म्हणून अनेकांनी काजवा महोत्सव रद्द किंवा बंद केले काही जणांनी सर्व नियम पाळून आयोजन केले. वनविभागाने सुद्धा संवेदनशील भागात महोत्सव आयोजनास बंदी घातली.
हा निसर्गाचा विजयच आहे परंतू अजूनी बर्याच ठिकाणी चोरी छुपे हे प्रकार घडतच आहेत.
असले प्रकार जर काही ठिकाणी चोरीछुपे घडत असतील तर जागरूक नागरिकांनी त्याबाबत नक्कीच आवाज उठवला पाहिजे वनविभागला कळविले पाहिजे तर आणि तरच आपल्या पुढील पिढीस काजवे पाहायला मिळतील. अन्यथा विनाश अटळ आहे !!!
@ जागरूक निसर्ग पर्यटन @ निसर्ग संवर्धन !!!
Comments
Post a Comment