ईद का 🐅


#JungleVibes

ईद का 🐅

साधारणत 1992-93 सालची गोष्ट असेल त्यावेळी मी विश्व प्रकृति निधी या संस्थेचा सक्रिय कार्यकर्ता होतो. संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत असे.  वर्षभर लहान लहान वाइल्डलाइफ सहली होत असत पण मला प्रतिक्षा होती ती उन्हाळ्यात आयोजित होत असलेल्या मोठ्या वाइल्डलाइफ टूरची.  जानेवारी महिना उजाडला आणि संस्थेचे शिक्षणाधिकारी सुनिल करकरे सरांनी यावर चर्चा सुरू केली.  मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अशी नावे चर्चेत होती.  शेवटी सर्वानुमते ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निवड करण्यात आली.  माझ्यासह सुशिल मिराशी, भाऊ सुर्यवंशी, संजय करकरे यांची स्वयंसेवक म्हणून तर रत्नप्रभा मुरचुटे हीची महिला स्वयंसेवक म्हणून निवड झाली होती.  आम्ही सर्व खुप खुश होतो.
त्यापुर्वी मी आंबा, आंबोली, दाजीपूर, दांडेली, चांदोली, कोयना इ ठिकाणी भरपूर फिरलो होतो परंतू आयुष्यात अद्याप जंगलचा राजा वाघ प्रत्यक्षात बघितला नव्हता.  वाघ फक्त ठसे आणि विष्ठेतूनच अनुभवला होता.
आता मला प्रत्यक्षात वाघांच्या नंदनवनात जायची संधी मिळत होती.  शिबिराची जाहिरात करण्यात आली आणि थोड्याच दिवसात शिबिर फुल्ल झाले.  जवळपास चाळीसच्या वर शिबिरार्थीं संख्या होती व सहा-सात स्वयंसेवक असे पन्नास जण झालो.  महाराष्ट्र एक्सप्रेसची जवळपास एक बोगीच बुक केली होती.
दुपारी एक वाजता कोल्हापुरातून सुटनारी एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी बारा वाजता वर्धा येथे पोहोचणार होती. तेथून चंद्रपुर पुढे ताडोबा अश्या प्रवासासाठी व पुढील संपुर्ण शिबिर कालावधीसाठी टाटा सुमो व टेंम्पो- ट्रॅक्स चंद्रपुर येथेच बुक करण्यात आले होते.
या शिबिरासाठी दहा वर्षांपासून ते अगदी साठी गाठलेल्यांनी पण आपले नाव नोंदवले होते.  त्यात अधिकतर कोल्हापुरातील नावाजलेले डाक्टर्स, आर्किटेक्चर, इंजीनियर, उद्योगपती होते त्यामुळे त्याचे स्वयंसेवकांसह आयोजकांवर खुप प्रेशर होते.
शिबिर शुल्क साधारणत तीन हजारच्या आसपास होते. गमतीची गोष्ट म्हणजे त्यावेळी सोने 2500 रूपये तोळा होते
म्हणजेच आमची ट्रीप सव्वा तोळ्याची होती.
आम्हा स्वयंसेवकांसह आयोजकांच्या बैठकी वारंवार होत होत्या.  सुनील सर तेथील कडक ऊन, रेलवे-स्टेशनवर पाणी कसे भरायचे, पाणी थंड कसे राखायचे, उन्हे लागुन तब्बेत कशी बिघडते त्यासाठी काय उपाय-योजना करायच्या इ इ सुचना वारंवार करत होते, तयारी जोरदार सुरू होती. कमफ्लाज कपडे, दुर्बिण, टोपी, बुट, पाण्याचे कापडी पिशवी इ  सर्व जुळवाजुळव केली.  उन्हाच्या झळांमुळे लू लागु नये म्हणून डोके व कान पुर्णपणे झाकले जातील असे मोठे रुमाल आवर्जुन घेतले.  मोठी सॅक एका मित्राची मागुन आणली.
बघता बघता तो दिवस उजाडला सर्वजण रेल्वे-स्टेशनवर पोहोचले.  सरांनी हजेरी घेतली, रेल्वेची बोगी शिबिरार्थींनीच भरून गेली होती.  अनेकांनी भांडून विंडो सीट पकडली. त्यात काही वयस्कर पण आघाडीवर होते.  आम्ही स्वयंसेवक सामान उचल, पाण्याच्या कापडी पिशव्या भरून रेल्वेच्या खिडक्यांना बांध इ कामे उत्साहाने करत होतो. बरोबर दीड वाजता रेल्वे सुटली, मजल दरमजल करत निघाली. सातारा, पुणे, दौंड, मनमाड असा आमचा वाईवरून सातारा प्रवास होता.  संध्याकाळी एका स्टेशनवर रेल्वे पाचच मिनिटे थांबत असल्याने त्या पाच मिनिटात सर्व शिबिरार्थींना चहा देने ही आमच्यासाठी तारेवरील कसरतच होती.  चहा सोबत बिस्कीट पुडे, मॅगझीनस् असली पण मागणी व्हायची.  शिबिरार्थींनी अजिबात खाली उतरायच नाही अशी त्यांना ताकीद होती.  सगळ्यांना जेवण व्यवस्थित मिळाल्यावरच आम्ही जेवत असू.
खरी मज्जा दुसऱ्या दिवशी सुरू झाली, ऊन जस जसे वाढु लागले तस तशी सगळ्यांची तगमग सुरू झाली. अंगाची लाही लाही होत होती.  कितीही पाणी प्यायले तरी घश्याची कोरड काही कमी होत नव्हती, तहान भागने तर दूरच.  रेल्वे थांबत असलेल्या प्रत्येक स्टेशन्स वर उतरून पटापट पाणी भरने हा स्वयंसेवकांचा एकमेव कार्यक्रम होता.  आम्ही सगळेच थकत होतो पण वाघाच्या ओढीने सर्व काही आनंदाने करत होतो.  एवढे करूनही काही शिबिरार्थीं असमाधानी होते.  आमच्या बाबतीत सरांकडे तक्रार करत होते.
दुसरे दिवशी दुपारी भर बारा वाजता रेल्वे वर्धा स्टेशन वर पोहोचली.  विदर्भातल्या भयानक रखरखत्या उन्हात खाली उतरलो. आम्हास न्यायला टाटा सुमो व टेम्पो ट्रॅक्स तयारच होत्या. पटापट सगळ्यांचे सामान त्यात भरले आणि थेट ताडोबाला निघालो.
ताडोबा येथे लेक साईडला असलेली डाॅरमेटरी आणि रूमचे  सर्व बुकिंग आधीच केले होते.
आमच्या गाड्या सुसाट सुटल्या ते मोहर्ली गेट वर सोपस्कार पुर्ण करून चार वाजे पर्यंत थेट ताडोबा कॅम्प साईटवर पोहोचलो.  संध्याकाळचा ट्रेल करायचाच या इरादायाने शक्य तेवढ्या लवकर साहित्य रूम, डाॅरमेटरीत टाकले आणखीन पटकन तयार होऊन कॅन्टीन जवळ जमलो.  सुनिल सरांनी झटपट आठ-आठ जणांचे पाच गट केले आणि पाच गटप्रमुख करून अभयारण्याची तिकीटे काढून चार गटांना गाड्यात बसायला सांगितले. मला ज्या गटाचा प्रमुख बनविले होते त्यात सगळे वयस्कर लोकच होते. सोबत सुप्रसिध्द वाइल्डलाइफ फोटोग्राफर अनिल वेल्हाळ होते. आम्हास एरिया दिला होता "वसंत बंधारा" तो कॅम्प साईटपासून जवळच होता, तेथे चालतच जायचे होते.  इतर गट गाडीने ससा रोड, लेक राऊंड रोड, कालाआम, पांढरपौणी, आंबटहीरा, जामुनबुडी, पंचधारा या वाघाचे हमखास दर्शन होणारच अश्या दूरच्या ठिकाणी रवाना झाले.  त्यामुळे मी थोडा हिरमुसला झालो होतो.  माझा सर्वांनी मिळून गेम केला असे क्षणभर वाटले होते.
अंधार पडण्यापुर्वी कॅम्प साईट वर परतने बंधनकारक असल्याने सर्व गट वेळेत परतले होते.  आम्हास थोडा उशीर झाला होता त्यामुळे मला फैलावर घ्यायच्या तयारीतच सगळे बसले होते.
सर्व गट परतल्यानंतर प्रत्येक गटातील एक व्यक्तिने त्यांना आलेला अनुभव, सफारी मधे जे जे प्राणी पाहिले असतील त्याची माहिती सर्वांसमोर द्यायची असे आधीच ठरले होते.  कॅन्टीन समोरच असलेल्या हाॅल मधे चहा घेत घेत एक एक जण सफारीची माहिती देत होता.  कुणी भरपूर गवे पाहिले होते तर कुणाला सांबर, चितळ, नीलगाय, चौसिंगा, भेकर अश्या भरपूर प्राण्यांचे दर्शन झाले होते.  एका गटाला तर मगर सुद्धा दिसली होती.  सर्वजण खुश होते प्रत्येक गटातील व्यक्ती रंगवून चढवून सांगत होती.  टाळ्या पडत होत्या, हुर्रे होत होती.
सर्वात शेवटी आमची बारी होती.  अनिल वेल्हाळ आमच्या तर्फे बोलायला उभारले. यांचे आता काय ऐकायचे असे काहीसे तुच्छ भाव होते सगळ्यांच्या चेहर्यांवर.
वेल्हाळांनी सुरवात केली  " आज बकरीद ईद आहे आणि फारूक हा त्याचा सर्वात मोठा सण सोडून आपल्या बरोबर आलाय,  त्याला आणि आमच्या गटातील सर्वांना ईद ची गिफ्ट मिळालीय."  वेल्हाळांची बोलायची ढब, त्यांची देहबोली बघून बाकी गटातील लोकांची उत्कंठा अधिकच वाढली. आमच्यातील जाणकार मंडळी काय समजायचे ते समजून गेले.  मग अनिल कॅन्टीनचा मालकाकडे बघून जोरात बोलले "खानसाब सबके लिए कोल्डरींक लाओ" हे ऐकताच सर्वत्र एकच हल्लाकोळ माजला.  आमच्या गटातील लोक इतरांना V खुण दाखवून खिजवू लागले. 
सफारीवर निघण्याआधी जेव्हा गट तयार केले तेव्हा असे ठरले होते की ज्या गटाला वाघ दिसेल त्या गटाने इतर सर्वांना कोल्ड्रींक द्यायचे.
अनिल पुढे बोलू लागले "तुम्ही आम्हास चालत पाठवून निघून गेलात, आम्ही बापडे आपले चालत चालत जवळच्याच वसंत बंधारा येथे निघालो.  सर्वात पुढे फारूक आणि स्थानिक गाईड दिपक मागे मी स्वतः आणखीन आमचा शेवटचा मेंबर शंभर फुट मागे अशी आमची रेल्वे गाडी डुलत डुलत चालली होती.  अनेक वेळा सुचना देऊनही काहीजण बोलतच होते जरा देखील शांत बसत नव्हते.  इतक्या कोलाहलात चिटपाखरूही दिसनार नाही याची मला खात्री होती त्यामुळे मी आपला जंगलाचे फोटो काढत चाललो होतो.  फारूक आणि गाईड मात्र डोळ्यात जीव आणून जंगल निहाळत सावधपणे चालले होते.  बराच वेळ चालत गेल्यावर वसंत बंधारा जवळ पोहोचणार इतक्यात फारूकने हातानेच खुण करून मागील सर्वांना थांबायची सुचना केली.  मी पटकन मागे फिरून सगळ्यांना थांबवले व फारूक जवळ हळूच गेलो.  तो बोलला दादा समोरून जस्ट एक वाघ आडवा गेलेला मी पाहिलाय !!! गाईड पण आता सावध झाला बोलला तस असेल तर तो वाघ पाणी पिऊन नक्की याच वाटेने परत जाणार !!!
मी मग खुण करून सगळ्यांना एकत्र केले शांत बसायला सांगून समोरून वाघ आडवा जाणार असल्याचे सांगितले. जंगलात भयान शांतला पसरली. (अनिल हे सांगत असताना देखील कॅम्ट साईटवर पण अशीच भयान शांतता पसरली होती.)  अर्धा तास असाच गेला काहीजण पुन्हा चुळबुळ करू लागले होते. एवढ्यात गाईड व फारूक दोघांना झाडीत पुन्हा वाघ दिसला.  त्यांनी खुणेनेच सांगितले वाघ येतोय सर्वजण पुन्हा चिडीचुप.  दमदार पाऊले टाकत एक देखना वाघ आमच्या समोरील रस्त्यावर आडवा आला, क्षणभर थांबला, हलकेच मान वळवून त्याने आमच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि आरामात रस्ता ओलांडून जंगलात दिसेनासा झाला"
आता आमची रेल्वेगाडी आकसून टाटा सुमो झाली होती अजून थोडावेळ तसेच शांत राहीलो.  नंतर आम्ही सगळे धडधडत्या अंतःकरणाने वसंत बंधारा पहायला गेलो.  सर्व जण आता सुपर एक्साइटेड होते.  जेथे वाघाने रस्ता ओलांडला होता तेथे त्याचे ठसे उमटले होते.  इतके ताजे ठसे प्रथमच बघत होतो, एका चागल्या ठस्याभोवती दगडे रचून ठेवली.  बंधार्यात थोडेफार पाणी शिल्लक होते. तेवढ्यात आंबटहीरा परिसरात गेलेली आमचीच एक गाडी आम्हास क्राॅस करून गेली.  गाडीतील सर्वांनी आम्हास हात(वाकुल्या) दाखवले.  नंतर आम्ही पुन्हा त्या रस्त्यावर आलो, तेथे गाईडने आम्हास एका मोठ्ठ्या अर्जुनाच्या बुंध्यावर वाघाने केलेले नख्यांचे ओरखडे दाखवले.  चांगले सात-आठ फुट उंचावर होते ते! काही ओरखडे अगदीच ताजे होते त्यातून डींक पाझरत होता.  जवळच दुसऱ्या एका उंच झाडावर अस्वलाचे अगदी वर पर्यंत गेलेले ओरखडे दाखवले, त्या झाडावर मधमाश्यांची असंख्य पोळी होती.  फारूकने गाईडला विचारले वाघ जंगलात इतका आरामात फिरतोय परंतू एकाही सांबर चितळ यांचा आलार्म काॅल नाही, माकडांचा, वानरांचा गोंगाट नाही हे कसे काय.  गाईड म्हणाला "ही वाघीण असून हा तिचा इलाका आहे, ती येथेच आहे गेली काहीएक वर्ष.  तिने नक्कीच दोन-तीन दिवसांपुर्वी ताजी शिकार केली असेल त्यामुळे ती आरामात फिरतेय, पोट भरलेले असेल तर वाघ उगाचच दुसरी शिकार करत नाहीत.  त्यामुळेच या परीसरातील इतर प्राणी सद्या बिनधास्त आहेत."  मग गाईड आम्हास घेऊन एका मोकळ्या जागेत गेला तेथे एके ठिकाणी काळ्या रंगाच्या भरपूर विष्ठा होत्या.  त्या अगदीच ताज्या वाटत होत्या, त्यातून भयानक दुर्गंधी येत होती.  गाईड म्हटला या वाघीणीच्याच विष्ठा  आहेत.  कोणतरी म्हटला तिचे पोट बिघडलय का?  गाईड म्हटला 'नाही जेव्हा वाघ शिकार करतो तेव्हा तो भरपूर खाऊन घेतो न जानो पुढील शिकार कधी मिळेल,  त्यामुळे त्याला अशी संडास होते.' आमच्यासाठी ही अगदी नवीनच माहीती होती.  वाघीण जवळपासच असणार, आपण जर वाघाने केलेल्या शिकारीच्या फार जवळ गेलो तर वाघ आक्रामक होतात. आपण केलेल्या शिकारीचे वाघ प्राणपणाने रक्षण करतात.  असे गाईडने म्हणताच सगळ्यांचे धाबे दणाणले, ऐकमेकांना खेटूनच सगळेजण तेथून पटकन  रस्त्यांवर आलो.
अभयारण्याची वेळ संपत आली होती म्हणून आम्ही झपाझप पावले टाकत कॅम्प साईटवर पोहोचलो.
मला फैलावर घ्यायचा विचार करनार्यांचा राग आता पुर्णपणे मावळला होता आता ते माझे कौतुक करू लागले.  मी आता हिरो झालो होतो नंतर जेवणाच्या वेळेस अनेक जण मला भेटून उद्या तुच आम्हास ग्रुप लीडर पाहिजेस, आम्हाला वाघ दाखवायचाच असा आग्रह करू लागले.  माझ्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखे वाटत होते.
आता ताडोबा येथे टुरिझमवर खुप बंधने आलेली आहेत. लेक साईटवर असलेली डाॅरमेटरीत व रूम्स आता पर्यटकांना पुर्णपणे बंद झालेत. इतकेच काय तर संपूर्ण ताडोबा व्याघ्र प्रकल्पात कोठेही आपण चालत फिरू शकत नाही   तेथे कोणतेही खाजगी वाहन आत घेऊन जाता येत नाह.  वनविभाग मान्यताप्राप्त वाहणांत बसूनच त्यांनी नेमुन दिलेल्या मार्गानेच जायचे, वहाणांतून खाली उतरायला पुर्ण बंदी आहे.

ताडोबा लेकसाईटवरील संपूर्ण पर्यटन संकुल आता मोहर्ली गेट वरच शिफ्ट करण्यात आलय. वसंत बंधारा, कालाआम, आंबटहीरा, पंचधारा इ ठिकाणी आता कोणालाच जाता येत नाही ते आता अति संवेदनशील भाग म्हणून घोषित करण्यात आलेत. अश्या या स्वर्गीय परिसरात आम्ही चालत, गाडीने भरपूर फिरलोय, मचाणावर बसून खाली पाणवठ्यावर पाणी प्यायला आलेला वाघ देखील पाहिलाय !!!
त्याकाळात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन आजच्यासारखे सहज होत नव्हते. सलग पाच सहा वर्ष सकाळ संध्याकाल दहा दहा दिवस जंगल सफारी करूनही गाडीने, पायदळी जंगलाचा चप्पा चप्पा फिरूनही वाघ न पाहिलेले लोक होते.  अश्या या वाघांच्या नंदनवनात मी माझ्या आयुष्यातला पहिला वाघ पाहीला तोही पायदली चालत !!!


Faruk Mhetar 

Kolhapur 

90 28 81 60 60 

Comments

Popular posts from this blog

महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways

कारवी' एक नैसर्गिक चमत्कार

Myristica Swamp