पाठीराखा
#JungleVibes
पाठीराखा
साल 2015 फेब्रुवारीचा महिना असेल मी आणि धन्या (धनंजय जोशी) आंबा जंगलात गेलो होतो, तसे आम्ही वरचेवर तेथे जात असू, खुपदा मुक्काम असायचा पण यावेळी सकाळी लवकर जाऊन रात्रीच परत असा बेत होता. सकाळी आठ वाजता गाडीला किक मारून निघालो तासाभरातच आंबा गावात पोहोचलो. आमचे मित्र कृष्णात दळवी यांच्या टपरीवर मस्त वाफाळलेला चहा व वडा खाल्ला. चार-पाच वडापाव बांधून घेतले. हळू हळू गाडी चालवत जंगलात चाहुल लागते का बघत बघत आंबा ते वाघझर्यापर्यंत गेलो. दो-चार रानकोंबड्या दिसल्या बाकी जंगलात शांतता होती, गाड्यांची वर्दळ अजिबात नव्हती, हवेत चांगलाच गारठा होता त्यामुळे गारठून काकडलो होतो.
वाघझर्याच्या अलिकडे रस्त्याच्या डावीकडे थोड्याफार अंतरावर घनदाट जंगलात दोन मोठे पळंज (गवताळ प्रदेश) आहेत. पुर्वी याठीकाणी संपूर्ण आंब्याच्या जंगलातील वनउपज (तमालपत्री, हिरडा इ इ) एकत्रित केले जात असे. आता वनविभागाने तेथे मोठी वनतळी तयार केली आहेत. या दोन्ही ठीकाणी गवा या प्राण्यांचे हमखास दर्शन होते.
आम्हास आज दिवसभर याच जंगलात फिरायचे असल्याने आम्ही आमची गाडी वाघझर्याजवळ आडोशाला पार्क केली आणि जंगलात निघालो.
या पैकी पहिल्या वनतळ्यात अगदी मार्च पर्यंत पाणी असते म्हणून तेथे प्राण्यांच्या पायांचे ठसे मिळतात का हे बघायला गेलो. खाली मान घालून ठसे पाहात असतानाच धन्या ओरडला "फारूक येथे बघा काय आहे" पळतच त्याच्या जवळ गेलो तर काय तेथे WHITE MISCHIEF या दारूची चपटी, चकण्याच्या दोन पुड्या, आगपेटी, सिगरेट चे पाकीट आणि दोन अर्धे पेग भरलेले ग्लास होते.
प्रचंड राग आला असल्या लोकांचा रागाच्या भरात आम्ही लाथेने सर्व उलथवून टाकले, सिगरेटचे पाकीट, पेग भरलेले ग्लास सर्व उध्वस्त केले, बुटाने कुस्करून टाकले, आगपेटीला आणि बाटलीला लाथेने उडवले आणि दारूड्यांना शिव्याशाप देत जंगलात निघून गेलो.
दिवसभर जंगलात मनसोक्त फिरलो दुपारी जंगलातील एका झर्यावर वडापाव खाऊन थंडगार पाणी प्यायलो.
पक्षी, फुलपाखरे, वनस्पती यांचे निरीक्षण करत फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करत जंगलात खुप आतवर गेलो होतो वेळ कसा गेला कळालेच नाही.
जेव्हा परत गाडीजवळ आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. अंधार पडू लागला होता म्हणून गडबडीत गाडी बाहेर काढायला गेलो. स्टॅन्ड वरून गाडी खाली करताच लक्षात आले की मागील टायर पंक्चर आहे.
क्षणभर डोळ्यासमोर काजवेच चमकले, दिवसभर जंगलात फिरून खुप दमलो होतो आणि पंक्चर काढायला गाडी जवळपास आठ ते दहा किलोमीटर ढकलत न्यायला लागणार होती. तेही घनदाट जंगलातील घाट रस्त्यांवरून, तेवढे त्राण आता आमच्यात नक्कीच नव्हते.
आता काय करायच यावर थोडावेळ चर्चा केली, वेळ फार कमी होता. अंधार झपाट्याने वाढत होता. मुक्कामाच्या तयारीने आलो नसल्याने सॅकमधे तंबू, स्लीपिंग बॅग इ काहीच नव्हते.
एक वडा, दोन बिस्कुटची पाकीटे, छोटी टाॅर्च आणि रिकाम्या पाण्याच्या बाटल्या एवढच होत. झपाझप चालत वाघझरा गाठला. आमची चाहुल लागताच पाण्यावर आलेले गवे जोरजोरात शिंकत जंगलात पळाले. पटकन पाणी भरून वरती आलो. वाघझर्या
पासून जवळच रस्त्यालगतच एक विशाल खडक आहे व तो खडक वरून थोडा सपाट आहे. त्यामुळे आम्ही त्या खडकावरच मुक्काम करायचा निर्णय घेतला. अर्धा अर्धा वडा आणि बिस्कीट खाल्ली व त्या दगडाच्यावर जो थोडासा सपाट भाग होता त्यावर ताणून दिली. वातावरणात चांगलाच गारठा होता. थंडी पण वाजत होती.
सगळीकडे निरव शांतता होती रस्त्यावर जरा सुद्धा वर्दळ नव्हती. फक्त वाघझर्यावर पाणी प्यायला येणाऱ्या गव्यांचा मार्ग या दगडाजवळून जात असल्याने अधून मधून गव्यांच्या हालचालीची माग लागत होती. वाघझर्यावर एकुल गव्याच्या रटींगचा आवाज वातावरणात वेगळीच गंभीरता आणत होता.
फारच उत्कंठावर्धक वातावरण होते. आमच्या समोरील डोंगरातून खाली उतरून गवे रस्ता पार करून वाघझर्यावर पाणी प्यायला जात होते. अधून मधून घुबडाचा घुत्कार ऐकु येत होता.
जस जसी रात्र चढत गेली तस तसी थंडी वाढु लागली. आतापर्यंत सहन होणारी थंडी आता असहनीय होऊ लागली होती. रात्री दहा नंतर जोरात वारा वाहु लागला आणि थंडी प्रचंडच वाढू लागली. आम्ही सॅकचे सर्व कप्पे शोधले पण नेहमीच सोबत असणारी आगपेटी आज सोबत नव्हती. आता आमची पाचावर धारण बसू लागली. अशीच थंडी वाढत गेली तर सकाळ पर्यंत आमची कुल्फीच जमली असती.
काय करावे काहीएक सुचत नव्हते. आमचे दात आता थंडीने कराकरा वाजु लागले होते. उशाला घेतलेली सॅक छातीवर ठेऊन थोडी उब आणण्याचा प्रयत्न केला पण लवकरच तेही असहनीय झाले.
काय करावे काहीएक सुचत नव्हते. दगडांवरून खाली उतरून गाडी बाहेर काढून ढकलत आंबा गावात जाणे हा एकमेव मार्ग शिल्लक होता पण त्यासाठी अंगात अजिबात त्राण उरले नव्हते.
काय करावे असा विचार करत असतानाच मला सकाळचा तो प्रसंग आठवला आणि एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी धन्याला महटले 'धन्या तुला आठवतय काय सकाळी आपण दारूची बाटली, चकण्याच्या पुड्या, पेग इ सगळेच कुस्करून उध्वस्त केलय पण आगपेटी तेवढी फक्त लाथेने उडवीय. ती जर आपल्याला मिळाली तर आपण जिंकलो " धन्या म्हटला "हो चला जाऊन शोधूया" सॅक पाठीला अडकवून हळूहळू दगडावरून खाली उतरलो. आसपास गव्यांची जाग होतीच, छोट्या टाॅर्च च्या उजेडात रस्ता क्राॅस करून त्या वनतळ्याजवळ जाऊ लागलो. जसे आम्ही तळ्याजवळ जाणार तोच आमच्या अगदी जवळच अंधारात उभा असलेला एकुल गवा आमची चाहुल लागताच भौंक करून ओरडत जंगलात पसार झाला. आम्ही नखशिखांत हादरलो. त्याच्या ओरडण्याने वाघझर्यापर्यतचे अनेक गवे जोरजोरात शिंकू लागले. वातावरण एकदम टेन्स झाले, जंगल एकदम जागृत झाल्यासारखे वाटू लागले. आम्ही दोघे एकमेकांचे हात घट्ट धरून शांत उभे होतो. लवकरच जंगलात पुन्हा भयान शांतता पसरली.
मग आम्ही अंदाजाने आगपेटी शोधु लागलो. लवकरच आम्हास ती सापडली, पण दवाने थोडी फार नरम पडली होती.
मग काय, जवळपासच्या जंगलातील वाळून खाली पडलेली काही लाकडे गोळा केली आणखीन ज्या ठीकाणाहुन एकुल गवा आमच्यावर ओरडून जंगलात पळाला होता तेथेच रस्त्याच्या कडेला मस्त शेकोटी पेटवून तिच्या शेजारी दिली ताणून. रात्री एक-दोनदा उठून शेकोटीत लाकडे सारून पुन्हा झोपत होतो. आदल्या दिवशी खुप चालल्यामुळे व रात्रीच्या दगदगी मुळे गाढ झोप लागली होती. सकाळी उठलो तेव्हा चांगलाच उजेड झाला होता. शेकोटी केव्हाच विझली होती. पटकन उठलो, वाघझर्यावर जाऊन फ्रेश झालो. बाटल्या भरून पाणी आणून उरली सुरली धग पुर्णपणे विझवली आणि आंब्याच्या दिशेने गाडी ढकलत निघालो.
जाताजाता चर्चा करत असता धन्या म्हटला "फारूक आपण किती सुदैवी आहोत बघा, काल सकाळी आपण दारूची बाटली, सिगरेटचे पाकीट चकना, पेग चे ग्लास सगळ काही उध्वस्त केल पण आगपेटी तेवढी त्यातून वाचली, नाहीतर आपल काय खर नव्हत !"
मी वर आभाळाकडे बोट करून म्हणालो "आपला पाठीराखा !!! "
Faruk Mhetar
Kolhapur
Comments
Post a Comment