विनाशाची कहानी
विनाश विनाश
विनाशाची कहानीहे बघा,
जमीनी विकून कोकणी खूश.
त्या जमिनींवर रबर, अननस प्लॅन्टेशन करून केरळी खुश.
बेडूक दाखवून आंबोलीकर खूश.
काजवे दाखवून राधानगरीकर खूश.
मेलेले मासे पक्ष्यांना खायला घालून भिगवणकर खूश. त्या पक्ष्यांचे फोटो काढून फोटोग्राफर खूश.
हे सर्व एंजाॅय करून शहरी लोक खूश.
वाघ दाखवून सफारीवाले खूश.
वाघाचे फोटो काढून फोटोग्राफर खूश.
समुद्री कासवांचे महोत्सव करून रत्नागिरीकर खूश.
त्या कासवांच्या पिल्लांसोबत फॅमिली फोटोसेशन करून शहरवासी खूश. मादी कासव बहुतांशी अंडी घालायला रात्रीच समुद्र किनाऱ्यावर येते आणि बहुतांश पिल्ली सुद्धा रात्रीच घरट्यातुन बाहेर पडतात आणि चमचमत्या समुद्राच्या पाण्याकडे धावत सुटतात रात्री दिवसाच्या तुलनेत परभक्षींची संख्या कमी असते तसेच परभक्षी रात्री कमी सक्रिय असतात तसेच समुद्र किनाऱ्यावरील वाळू दिवसा फार तापते व ती नवजात पिल्लांना धोकादायक ठरू शकते
यामुळेच पुर्वी कासव महोत्सव रात्रीच भरायचे परंतु रात्रीचा हा सोहळा पाहुन खूश होणार्यांची संख्या कमी असायची फक्त संवेदनशील वन्यजीव प्रेमीच यायचे परंतु जास्तीत जास्त लोकांनी खुश व्हायला पाहिजे ना, हौसे, गवसे आणि नवसे पण यायला पाहिजेत ना खुश वाहायला मग हे महोत्सव सोहळे दिवसा भरू लागले घरट्यातुन बाहेर आलेल्या इवल्याश्या पिल्लांना एकत्र जमा करून, किनाऱ्यावर भरपूर खुर्च्या लावून त्यावर स्थानापन्न होणार्यांना अधिक खुशहाल होण्यासाठी त्यांच्या खान-पान ची सोय करून अनेक ठिकाणी भर दिवसा कासव महोत्सव आयोजित होऊ लागले मग काय भरपूर पर्यटन भरपूर आर्थिक उलाढाल सब तरफ खुशहाली का माहोल अरे व्वा कासवांची पिल्ली दिवसा समुद्रात जाऊन जगली काय वा दिवसा सक्रिय असलेल्या परभक्षींच्या भुकेला बळी पडली काय कोणास काहीएक फरक पडत नाही लोकांनी खुशहाल होणे महत्वाचे
परदेशात काही ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरील लाईटस् मुळे कासवांची पिल्ले दिशाभ्रष्ट होऊन समुद्रात न जाता उलट दिशेने जाताहेत हे लक्ष्यात आल्यावर या पिल्ली बाहेर येण्याच्या काळात किनाऱ्यावरील लाईट्स स्वैच्छिक बंद केल्या जाताहेत तर काही ठिकाणी तसा कायदाच केला आहे
सापवाल्यांचं तर काय विचारूच नका, स्वतःचा जीव गेला तरी बेहतर पण स्टंट करणार म्हणजे करणार. चार लेकुरवाळ्या किंचाळल्या पाहिजेत. चार पोरी फिदा झाल्या पाहिजेत. पब्लिक खूश झालं पाहिजे.
वनस्पतिशास्त्राचा काडीमात्र गंध नसलेले व 'मी फक्त स्वदेशी वृक्षच लावतो' असं म्हणून सोशल मीडियावर बिनदिक्कत विदेशी वृक्ष लावतानाचा फोटो अपलोड करणारे वृक्षमित्र खूश तर त्यांची पोस्ट लाइक करणे वा त्यावर काॅमेंट करणे म्हणजेच मी खरा देशभक्त असा आव आणणारे नेटकरी खूश. इकोफ्रेंडली बाइक राइड करून पर्यावरण बचावचा संदेश देणारे बाइक राइडर्स खूश. राइडर्सच्या मागे तंग कपड्यात थोडक्यात निसर्ग अवस्थेत बसलेल्या ललना खूश. त्यांना बघणारे प्रेक्षक तर खूशच खूश.
सगळीकडे खुशी ही खुशी है,
फिर टांग अडानेवाले आप कौन?
अरे हां, पावसाळा जवळ आलाय जाणार ना रानभाज्या खायला महोत्सवात?😜
दुर्मिळातील दुर्मिळ रानभाज्या सगळ्या रानावनातून शोधून काढायच्या. ओरबाडुन आणायच जेवढे सापडेल तेवढ. संपवायचं संपवायचं सगळंच. रानभाज्या ओळख शिबिर भरवायच, झुंडीच्या झुंडी घेऊन रानावनात रानभाज्या शोधत फिरायच. गंमत म्हणजे गोरगरीब आदिवासी, वनवासींना जळावू लाकुड, एखाद गवताचा भाराही घ्यायला मनाई करणारा आणि त्यांना दमदाटी करणारा वनविभाग सुद्धा या रानभाज्या उत्सव आयोजित करण्यात आणि रानभाज्या संकलनात हिरीरीने सहभागी होतोय.
आपल्याला अगदी आभाळसुद्धा कमी पडलेलं आहे. रानभाज्या खाणारे खूश आणि त्यांचा आनंद बघून महोत्सव भरवणारे खूशच खूश.
आणि हे रानभाज्या महोत्सव भरवणारे समाजात निसर्गमित्र, हरितगुरू, अरण्यमित्र, वसुरक्षक, निसर्गपुत्र इ इ स्वयंघोषित पदव्या लावून फिरत असतात.
अमक्या भाऊंचा वाढदिवस कर वृक्षारोपण, तमक्या दादांचा जन्मदिन लाव झाड, काळ नाही बघायचा वेळ नाही बघायची चालले झाडे लावायला. कसले झाड लावतोय, कुठ लावतोय काहीएक माहित नाही, ते झाड तेथे जगेल काय, त्याला पाणी कोण घालणार त्याचा पत्ताच नाही, फेपरात नाव आल म्हणजे झाल. कडक उन्हाळा बघायचा नाही की हिवाळा बघायचा नाही चालले आभाळ पेलायला.
आणि ते बीजगोळे विसरलोच.
वनस्पतिशास्त्राचा, इकाॅलाॅजीचा काडीमात्र अभ्यास नसलेले, आपण कसल्या बिया, कुठं लावतोय, त्याचा खरोखरच फायदा आहे की नुकसान काही माहित नाही. गवताळ प्रदेश बघायचा नाही की जमीनीचा, हवामानाचा अंदाज नाही. कुठली झाडे कुठं वाढतात माहित नाही, कोणत्या बिया कधी रुजतात कधी खराब होतात माहित नाही. चालले आभाळ बडवायला. हे बीजगोळे करणारे मस्त प्रसिद्धी मिळाली म्हणून खूश तर जिथंजिथं बीजगोळे टाकलेत तिथं भरपूर झाडे उगवून पृथ्वी हिरवीगार होणार म्हणून बीजगोळे फेकणारे खूश.
आणखी एक जमात आहे जी समजते की खरं निसर्ग काॅन्झर्व्हेशन आम्हीच करतो. योग्य शाॅटसाठी काहीही करायची तयारी असते यांची. मग साप हाताळणे असो, पक्षी घरट्यावर असो, प्राण्यांनी पोज द्यायला त्यांना डिवचणे, ढकलणे, प्रसंगी दगड मारणे सगळंच योग्य असतंय यांच्यासाठी. कारण ते काॅन्झर्व्हेशनिष्ट फोटोग्राफर समजतात ना स्वतःला
जेवढा चांगला फोटोग्राफर तेवढा महान काॅन्झर्व्हेशनिष्ट,
मग काय सोशल मीडियावर फोटो अपलोड. आॅसम, निकाॅन गियर, कॅनन गियर, हॅन्डहेल्ड इ. विशेषणं लावून, ५०० लाईक्स मिळाले की हे खूश आणि वाॅव, एक्सलंट, सुपर्ब असे काॅमेंट करून यांचे पंखे खूश
अजून एक गट फार जोमाने उदयास येतोय तो म्हणजे स्वदेशी वृक्षप्रेमींचा गट. स्वदेशी वनस्पतींचा यांना एवढा पुळका की सर्व विदेशी झाडे विषारी असतात, ऑक्सिजन देत नाहीत, पक्षी या विदेशी झाडांची फळे खातच नाहीत, यांवर घरटी बांधतच नाहीत, फुलपाखरांच्या अळ्या फक्त स्वदेशी वनस्पतीच खातात अशी एक ना अनेक अशास्त्रीय विशेषणे विदेशी वनस्पतींना लावून एक प्रकारचा वृक्षदुजाभाव या तथाकथित देशभक्त लोकांनी निर्माण केला आहे. मग या देशी तज्ज्ञांच्या फाॅलोअर्सनी विषारी ब्लॉगचे ब्लॉग लिहून टाकलेत सोशल मीडियावर. मग हे तज्ज्ञ आणि ब्लॉगर्स दोन्हीही आपल्या देशभक्तीवर खूश.
बाजार मांडलाय नुस्ता, प्रत्येक गोष्टीचा बाजार, नवीन भाषेत इव्हेन्ट.
सब तरफ खुशी का माहौल है!
आणि काहीजण विनाश विनाश म्हणून गळे काढताहेत. छ्या छ्या छ्या!
या आणि इतर असंख्य गोष्टींमुळे विनाश अटळ आहे का? नाही. नक्की नाही. आपली पृथ्वी समर्थ आहे हे सगळं झेलायला. परंतु या गोष्टीमुळे आपण आपलंच जगणं दुभर, त्रासदायक करून घेत आहोत.
क्लायमेट चेंज, ग्लोबल वार्मिंग, सुनामी, सायक्लोन, भूकंप अशी नानाविध अस्त्रे आहेत वसुंधरेकडे आणि ती त्यांचा यथोचित वापर करत आहे.
मग हे सगळे प्रकार अजिबात करायचे नाहीत का?
करा जरूर करा, मनसोक्त करा पण प्रेमाने, मर्यादेत राहून करा. निसर्ग नियमांचे पालन करून करा, निसर्गात शिकण्यासारखं खूप आहे. जरूर शिका वसंधरेचा मान, आब राखून शिका.
लोकहो कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्याआधी, कोणताही कार्यक्रम, उपक्रम करण्याआधी वा त्यात सहभागी होण्याआधी सारासार विचार करा. सद्सद्विवेक बुद्धी वापरा. झुंड निघाली म्हणून आंधळेपणाने झुंडीत सामिल होऊ नका. झुंडीत फायदा कमी आणि नुकसान, हालअपेष्टाच अधिक होते. सर्वच कार्यक्रम चुकीचे नाहीत तर ते राबविण्याची पद्धती चुकीची आहे. फार थोडेजण योग्य पद्धतीने हेच उपक्रम राबवतात. अशांचा शोध घ्या. त्यांच्याशी बोला उपक्रम समजुन घ्या आणि बिनधास्त सामिल व्हा. निसर्गाचा आस्वाद घ्या अभ्यास करा. जे खरे आहेत ते कधी प्रसिद्धी करत नाहीत. खोट्यांनाच खोटी चमक घेऊन चमकावे लागते हे पक्के लक्षात ठेवा. नंतर पश्चाताप करून काही उपयोग नाही. आणि एवढं सगळं होऊन, समजूनही जे या झुंडीत सामिल होतील त्यांच्यासाठी एवढंच म्हणेन- 'विनाशकाले विपरीत बुद्धी'.
-फारूक म्हेतर, कोल्हापूर
Comments
Post a Comment