घरासमोरील वृक्ष

 घरासमोरील वृक्ष


साधारणतः 10-12 वर्षे झाली असतील,  आमच्या भागात महानगरपालिका द्वारे झाडे लावायचे काम चालू होते.  'जो मागेल त्याच्या दारात झाड' अशी काहीतरी योजना होती.
ऐके दिवशी सकाळीच आमच्या गल्लीत कर्मचारी येऊन 'झाड लावू का? असे विचारत होते.  मी लगेच घरा समोर झाड लावायला तयार झालो.  महानगरपालिका कर्मचारींनी मी सांगितलेल्या जागी खड्डा खणला आणि लाल माती भरून नंतर रोप लावतो असे सांगून निघून गेले. 

आमच्या गल्लीत फार कमी लोकांनी याचा लाभ घेतला.  तदनंतर मी दुकानला निघून गेलो.  संध्याकाळी परत आलो तर त्या खड्यात रोप लावलेले होते.  कोणत्या प्रजातीचे होते हे काही मला नेमके आठवत नाही.  बहुधा बदाम, कॅशिया, टॅब्युबिया, सप्तपर्णी इ पैकी असावे.  गल्लीत जवळपास 7-8 जागी पण रोपे लावली होती.

दुसरे दिवशी त्यांनी ट्री गार्ड आणला. तो लावत असताना मी त्यांच्या सोबत आलेल्या अधिकारीला बोललो 'मला इथे दुसरे रोप लावायचे आहे, तर मी तुम्ही हे रोप काढून घ्या. मी दुसरे रोप लावतो' तो अधिकारी लगेच तयार झाला.

माझ्या बागेत तेव्हा मी फुलपाखरांसाठी कुंडीत लावलेले बेलफळ आणि वायवर्ण चे रोप होते. तसेच एका कुंडीत नैसर्गिकपणे आलेले जांभळाचे पण रोप होते.
मी तीनही रोपे त्या एकाच खड्यात लावली. 
एका वर्षातच तीनही रोपे छान जगली व 2-4 फुट वाढली.  वायवर्ण वर ग्रेट ऑरेंज टीप, चाॅकलेट अल्बाट्रोस, काॅमन गल या फुलपाखरांनी अंडी घालून आपला जीवनक्रम पुर्ण करत होते.  तर बेलफळावर लाईम स्वॅलोटेल हे फुलपाखरू भरपूर अंडी घालत असे, परंतु त्याचा जीवनक्रम कधीच पुर्ण झाला नाही.  पण का?  हे माझ्यासाठी एक कोडेच होते.

वर्षा मागून वर्षे गेली.  वायवर्ण व जांभुळ यांची झाडे खुप मोठी झाली.  परंतु बेलफळ मात्र तेवढेच राहिले.  ते काही केल्या वाढेच ना! 
झाडे लावलेला खड्डा व आमचे घर याच्या मधून गटार जात असल्याने वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध असे.  तसेच खतही आपोआपच मिळत होते.

एकदा या बेलफळाच्या न वाढण्या बाबतीत गल्लीतील मित्रा बरोबर चर्चा करत होतो, तेव्हा आमच्या घरासमोर रहात असलेले गृहस्थ हे ऐकून आले व म्हणाले 'अहो त्याला लोकांनी वाढू दिले तरच वाढेल ना हे झाड!' 
मी आशंकित होऊन त्यांना सविस्तर सांगा असे  म्हटले.  तसे ते म्हणाले 'फारूक काय सांगायच तुम्हाला! रोज सकाळी येथुन चालत जाणारे लोक याची पाने तोडुन न्हेतात' मग माझी ट्यूबलाइट एकदम पेटली, लाईम स्वॅलोटेल चे जीवनक्रम का पुर्ण होत नसावे याचे उत्तर मला सापडले होते!!! 
त्यानंतर लक्ष ठेऊन पाने तोडणार्यांना विनंती, समजावने, धमकीवजा इशारा सगळे देऊन देखील काहीएक फरक पडला नाही.

आज जांभुळ आणि वायवर्ण ची झाडे जवळपास 25-30 फुट उंच झालीत.  पण बेलफळ अजूनही 2-3 फुटच राहिलाय. 
गल्लीतील इतर झाडे एक एक करत तोडली गेली.  कोणाला दारात पडणारा पानांचा कचरा नको होता तर कोणाला दारात आपली गाडी पार्क करायची होती.
मध्यंतरी महानगरपालिकेने ट्री गार्ड काढून न्हेले. मग तर बिचारा बेलफळ पारच निराधार आणि लाचार झाला.  असो !!!
वायवर्ण वृक्षाला गेली 5-6 वर्ष फुले येताहेत. वायवर्ण फुलला की येणारे जाणारे लोक मुद्दाम थांबून त्याचा फोटो काढतात. 

दरवर्षी महावितरणवाले या दोन्ही वृक्षांवर कुर्हाड चालवतात.  पण वायवर्ण फुलत राहतो पण जांभुळाला कधीच फुले, फळे लागली नाहीत.  आम्ही दरवर्षी जांभळे कधी लागतील याची आतुरतेने वाट पहात होतो.  या वर्षी पण फुले दिसलीच नाहीत.  त्यामुळे थोडेसे नाराजच होतो.  पण अचानक दोन दिवसां पुर्वी 10-12 जांभळाचा एकच गुच्छ लगडलेला दिसला आणि आमच्या आनंदाला पारावारच राहिला नाही!!!
चांगली मोठ्ठी टपोरी जांभळे लागली होती. खालूनच खुप रसाळ आणि गरदार दिसत होती.
हे निरीक्षण चालू असतानाच एक ट्रान्सपोर्टचा ट्रक आमच्या दुकानचे मटेरियल घेऊन आला.  लगेच त्यातील एकास ट्रकवर चढवून तो गुच्छ काढवला आणि घरातील सगळ्यांना एक एक जांभुळ खायला दिले.
व्वा काय चव होती !!!
स्वतः लावलेल्या वृक्षांवरील फळे खायचा जो आनंद असतो तो काय वर्णनावा 😋


फारूक म्हेतर
वन्यजीव अभ्यासक, कोल्हापूर 

Comments

Popular posts from this blog

महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways

कारवी' एक नैसर्गिक चमत्कार

Myristica Swamp